जैववायू निर्मितीसाठी संयत्र विकसित पुनःनिर्मितीय (नवीकरण) उर्जा स्त्रोतावर आधारित अखिल भारतीय समन्वयक प्रकल्प, अकोला केंद्र येथे पाण्याचा कमी वापर करून जैववायू निर्मितीसाठी संयत्र विकसित करण्यात आले. सयंत्राचे वर्णण यामध्ये मुख्यतः जनता जैववायू संयत्रामध्ये प्रवेश मार्ग भरण टाकी ऐवजी ३० सेमी. व्यासाचा ३ मीटर लांब आर.सी.सी.पाईप व दीनबंधू संयत्रामध्ये १० सेमी. भरण पाईप ऐवजी ३० सेमी. व्यासाचा ३ मीटर लांब आर.सी.सी.पाईप लावलेला आहे. सुरुवातीला शेण व पाणी याचे एकजीव मिश्रण १.१ या प्रमाणात घेऊन संयत्र पूर्ण भरावे लागते. ज्वलनशील वायू निर्मिती नंतर अंदाजे ३० ते ५० दिवस हे संयत्र शेण व पाणी यांच्या १:१ या प्रमाणात चालविल्यानंतर संयात्राच्या क्षमतेनुसार २५ कि. ग्रा. प्रति घनमीटर या प्रमाणात गोठ्यातील सकाळी जमा केलेले ताजे शेण या संयात्रात टाकावे. या प्रकारच्या जैववायू निर्मिती तंत्रज्ञानात शेण व पाणी मिश्रणाची आवश्यकता नाही. किंबहुना गरज भासल्यास कमीत कमी १० टक्के पाणी संयत्रात पाईपमधून शेणानंतर टाकावे. यामध्ये पारंपारिक संयत्रापेक्षा ३० टक्के जैववायू निर्मिती जास्त होते. या संयत्रातून निघालेली मळी एक आठवड्यात वाळते आणि ती कमी वेळ आणि श्रमात शेतात वाहून नेता येते. संयत्र उभारण्याचा खर्च प्रचलित संयत्रा एवढाच येते. आपलेकडे उपलब्ध असलेल्या शेणामधून सुधारित जनता जैवायू संयत्र हे कौटुंबिक तसेच सामुदायिक उपयोगासाठी २ घनमीटर ते ९० घनमीटर या क्षमतेची उभारता येतात. या तंत्रज्ञानाच्या अधिक माहितीसाठी : संशोधन अभियंता, नविकरनिय उर्जा स्त्रोतावर आधारित अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प, यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. स्त्रोत : अग्रो विदर्भ