बोर्निओ आणि सुमात्रा बेटांतील अरण्यांत राहणाऱ्या या कपीचे (अगदी आखूड शेपूट असलेल्या किंवा बिनशेपटाच्या माकडाचे)शास्त्रीय नाव पोंगो पिग्मियस असे आहे. याचे आकारमान गोरिलाच्या खालोखाल असते. नराचे वजन सु. ७५ किग्रॅ. व मादीचे ४० किग्रॅ. असते. हा केसाळ असून केस लाल रंगाचे असतात. चेहेऱ्यावर केस नसतात पण प्रौढ नराला लांब दाढीमिशा असतात आणि त्याच्या गालांच्या बाजूला पसरट गिरद्यांसारखे भाग असतात. कपाळ मोठे ; मुस्कट पुढे आलेले; डोळे अगदी जवळजवळ; हात व त्यांचे पंजे बळकट; पाय आखूड व सापेक्षतेने दुबळे असतात. कंठाजवळ एक मोठी हवेची पिशवी असून ती कंठात उघडते. याची चेहेरेपट्टी मंगोली वळणाची आहे.

हे एकेकटे, जोडप्याने किंवा कौटुंबिक गट करून असतात. हातांनी फांदीला लोंबकळत हा एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जातो. जमिनीवर हा ताठ उभा राहू शकतो, पण हातपाय टेकून चालतो; चालताना हाताची अंगुलिमूले (हाताच्या बोटांचे सांधे) जमिनीवर टेकलेली असतात. हा मुख्यतः फळांवर निर्वाह करतो पण पाने, बिया, अंडी व लहान पक्षीदेखील खातो. झाडावर फांद्या व पाला यांचा माचा तयार करून हा त्यावर झोपतो.

ओरँगउटान हा बुद्धिमान प्राणी असून शांत स्वभावाचा व गंभीर वृत्तीचा आहे. याच्या सगळ्या हालचाली मंदगतीने पण हेतुपूर्वक केलेल्या असतात. रानटी अवस्थेत हा ३० — ४० वर्षे जगतो.

लेखक : मीनाक्षी जोशी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश