(अंजनी, आंजण; क. कामरा, एण्णे; लॅ. हार्डविकिया बायनॅटा; कुल-लेग्युमिनोजी). हा सु. २५-३५ मी. उंचीची शोभिवंत, पानझडी वृक्ष भारतात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, दख्खनचे पठार, कारवार ते त्रावणकोरपर्यंत, बव्हंशी रूक्ष जंगलात आढळतो. खोडावर साधारणपणे १२-१५ मी. उंचीपासून पुढे अनेक आडव्या फांद्या फुटतात. पाने एकाआड एक, संयुक्त, लांब देठाची; दले फक्त दोन व ती बिनदेठाची, चिवट, गुळगुळीत, काहीशी तिरपी व अंडाकृती असून पात्यात ३-६ शिरा तळापासून निघतात. पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकास ऑक्टोबर ते जानेवारीत लहान, असंख्य हिरवट-पिवळ्या फुलांचा फुलोरा (परिमंजरी) येतो. फुलात पाकळ्या नसून फक्त संदले [फूल] असतात; केसरदले १०; इतर शारीरिक लक्षणे ðलेग्युमिनोजी कुलाप्रमाणे व सीसॅल्पिनिऑइडी ह्या उपकुलाप्रमाणे [लाल अशोक, आपटा, बाहवा इ.]. शेंग (शिंबा) ६-९ सेंमी लांब, चपटी, पातळ, लवचीक, दोन्हीकडे टोकदार; बी फक्त एकच व ते टोककडून बाहेर पडते.

गुरे व घोडे पाला आवडीने खातात व त्याचे खत चांगले होते. लाकूड गर्द लाल, टणक, जड व टिकाऊ असून घरबांधणी, पुलांचे बांधकाम, तुळ्या, खांब, शेतीची अवजारे, रेल्वेच्या रूळाखालील शिळेपाट हातमाग इत्यादींसाठी व कातीव आणि कोरीव कामास चांगले. सालीचे धागे दोऱ्याकरीता व साल कातडी कमाविण्यास उपयुक्त. डिंक, मुळांचा चीक अथवा पानांचा रस प्रमेहावर देतात.

लेखक : शं. आ. परांडेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश