(भुतकेस, टमरूज; हिं. बाक्रा; गु. अलन; सं. भुतफल लॅ. एलिओडेंड्रॉन ग्लॉकम; कुल-सेलॅस्ट्रेसी). हा मध्यम आकाराचा व ९-१५ मी. उंचीचा वृक्ष भारतात बहुधा सर्वत्र (हिमालयात १,८०० मी. उंचीपर्यंत), तसेच श्रीलंकेत व मलायात आढळतो. महाराष्ट्रात पानझडी जंगलात सापडतो. शिवाय शोभेकरिता बागेतही लावतात. साल जाड, करडी किंवा गडद रंगाची; पाने सोपपर्ण [पान], साधी, समोरासमोर, दीर्घवृत्ताकृती, चिवट, कोवळेपणी निळसर हिरवी; फुले लहान, असंख्य, पिवळसर किंवा हिरवट पांढरी असून पानांच्या बगलेत किंवा जवळपास द्विपाद वल्लरीवर [पुष्पबंध] फेब्रुवारी ते ऑगस्टमध्ये येतात. फुलांची संरचना व इतर सामान्य लक्षणे सेलॅस्ट्रेसी कुलाप्रमाणे. फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त), कठीण व गोलसर, १-३ सेंमी. लांब असून मेमध्ये पिकते. पानांच्या भुकटीने शिंका येतात. स्त्रियांना उन्मादमूर्च्छेतून सावध होण्यास याची धुरी उपयुक्त; डोकेदुखीवर भुकटी तपकिरीप्रमाणे वापरतात. ताज्या मुळांच्या सालीचा लेप सुजेवर लावतात. फांट (थंड पाण्यात काढलेला मुळांचा रस) वांतिकारक असतो.

लेखक : ज. वि. जमदाडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश