(अर्जुन; हिं. मुरुथू, कहू; गु. अर्जनसादरो; क. केंपुमत्ति, होलेमत्ति; सं. अर्जुन; इं. व्हाइट मुर्दा; लॅ. टर्मिनॅलिया अर्जुना; कुल- काँब्रेटेसी). सुमारे २४ मी. उंच (व ३-४ मी. घेर) असलेला पानझडी वृक्ष. याचा प्रसार श्रीलंकेत व भारतात बहुतेक सर्वत्र, जंगलात आणि नद्या व ओढे यांच्या काठाने आहे. बुंध्याजवळ अनेक आधारमुळे व खोडावर आडव्या पसरट फांद्या असतात. साल जाड, गुळगुळीत, हिरवट पांढरी, क्वचित लालसर असून तिच्या पातळ कपच्या निघतात. पाने (१३–२० × ४–६ सेंमी.) साधी, अल्पसंमुख (काहीशी समोरासमोर), आयत-दीर्घवर्तुळाकृती, चिवट व गुळगुळीत असून देठावर पात्याच्या तळाशी दोन प्रपिंड (ग्रंथी) असतात [ ऐन]. फुले फिकट पिवळी, पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकास, परिमंजरीतील कणिशावर [ पुष्पबंध] एप्रिल-मेमध्ये येतात. त्यांची संरचना व इतर सामान्य लक्षणे काँब्रेटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. फळे चिवट, पिंगट, शुष्क, लंबगोल, पाच पंखांची व एकबीजी असून प्रत्येक पंखावर वर वळलेल्या शिरा असतात. ती पावसाळ्याच्या शेवटी किंवा थंडीत येतात.

अर्जुनाचे लाकूड बाहेर तांबुस-पांढरे व आत पिंगट असून त्यात गर्द रंगाच्या रेषा असल्याने शोभिवंत दिसते. मध्यकाष्ठ कठीण व साधारण टिकाऊ असते पण रसकाष्ठ (बाहेरचे) टिकाऊ नसते. घरबांधणी, बैलगाड्या, शेतीची अवजारे, लहान होड्या, ब्रशांच्या पाठी इत्यादींकरिता उपयुक्त. कर्नाटकात सोन्याच्या खाणीत आधाराकरिता वापरतात. सालीतील टॅनिनामुळे कातडी कमाविण्यास व रंगविण्यास ती उपयोगात आहे. सालीतून येणारा सोनेरी-पिंगट रंगाचा डिंक औषधी आहे. पाला गुरांना चारा म्हणून घालतात. साल शक्तिवर्धक, स्तंभक (आकुंचन करणारी), ज्वरनाशी, हृदयास बल देणारी आणि पित्तविकारावर व जखमांवर उपयुक्त आहे. फळ शक्तिवर्धक व शरीरक्रियेतील अडथळे दूर करणारे आहे. पानांचा ताजा रस कानदुखीवर वापरतात. सालीत अर्जुनीन, लॅक्टोन, अर्जुनेटीन, बाष्पनशील तेल, टॅनीन, रंगद्रव्ये इ. उपयुक्त पदार्थ असतात.

लेखक : उ. के. कुलकर्णी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश