(कुल-अॅनोनेसी). हा लहान सदापर्णी वृक्ष सह्याद्रीचा घाट, कारवार, हातखंबा, मलबार इ. ठिकाणी १,०५० मी. उंचीपर्यंत आढळतो. साल मऊ,गुळगुळीत; शाखा लांब, नाजूक व लोंबत्या; कोवळे भाग लवदार; पाने साधी, एकाआड एक, अनुपपर्ण (उपपर्णे नसलेली), भाल्यासारखी, क्वचित दीर्घवृत्ताकृती, प्रकुंचित (निमुळती), ५·९–१०·४ × २–४ सेंमी., वरून गुळगुळीत, खालून लवदार, पातळ व पारदर्शक ठिपके असलेली; लहान देठाची, सच्छद, पिवळसर पिंगट, लवदार फुले पानांच्या बगलेत किंवा फांदीच्या टोकास मार्च-ऑक्टोबरात येतात. बाहेरच्या पाकळ्या प्रत्येकी ४ – ५ सेंमी लांब, आतील आखूड; किंजपुटे आठ ते बारा; बीजके बहुधा दोन ते सहा [ फूल]; घोसफळातील प्रत्येक फळाला देठ असून ते लांबट, थोडे फार गाठाळ व सु. १·८ सेंमी. लांब असते; बिया १–३, मोठ्या व चकचकीत. झाडाच्या सालीपासून मजबूत धागा मिळतो; तो दोर व कागद निर्मितीस उपयुक्त असतो.

लेखक : प्र. भ. वैद्य

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश