(ईश्वर; हिं. बस्रा; गु. इसरी; लॅ. कॅलिकार्पा लॅनाटा; कुल-व्हर्बिनेसी). हा लहान शोभिवंत वृक्ष श्रीलंकेत व भारतात (तमिळनाडू, सह्याद्री घाट, कोकण, उ. कारवार) जंगलात आढळतो. कोवळ्या भागांवर तारकाकृती केसांची दाट रेशमी लव असते. पाने मोठी (१५ - २२ X ८ - १० सेंमी.), समोरासमोर, अंडाकृती किंवा दीर्घवृत्ताकृती, लांब टोकांची, दातेरी किंवा अखंड, वरून चकचकीत व खालून केसाळ असून फांद्यांच्या टोकांस गर्दीने येतात. फुले लहान व लालसर जांभळी असून पानांच्या बगलेत वल्लरीवर [पुष्पबंध] डिसेंबर - एप्रिलमध्ये येतात. त्यांची सामान्य संरचना व्हर्बिनेसी (सागकुल) कुलात वर्णिल्याप्रमाणे असते. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळे काळी, चकचकीत, लहान, चार मिमी. व्यासाची व गोलसर असतात.

सालीचा व मुळांचा काढा ज्वरनाशक असून यकृताच्या विकारांवर व कातडीच्या रोगांवर उपयुक्त; तोंड आल्यास पाने दुधात उकळून गुळण्या करण्यास देतात. केसाळ कळ्या वातीप्रमाणे दिव्यात वापरतात.

लेखक : शं. आ. परांडेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश