(अजवान; हिं. अजोवान, अजवैन; गु. अजमो; क. ओमा; सं. अजमोदा, तीव्रगंधा; इं. बिशप्स वीड, लोवेज; लॅ. ट्रॅकिस्पर्मम अम्मी, कॅरम कॉप्टिकम; कुल-अंबेलिफेरी). सु. ०·३—१ मी. उंचीची ही सरळ, वर्षायू (एक वर्ष जगणारी) व लवदार ओषधी [ओषधि] भारतात सर्वत्र लागवडीत आहे; तसेच बलुचिस्तान, इराण, ईजिप्त, यूरोप इ. भागांतही हिची लागवड करतात. महाराष्ट्रात मुख्यतः जळगाव जिल्ह्यात दुय्यम पीक म्हणून लागवड करतात. खोडावर अनेक फांद्या व अनेकदा विभागलेली पाने असतात; पानाचे अंतिम खंड रेषाकृती व सु. ०·५ सेंमी. लांब असते. फुले लहान, पांढरी व चवरीसारख्या [संयुक्त चामरकल्प,पुष्पबंध] फुलोऱ्यावर एप्रिलमध्ये येतात. फळ उभट (आंदोलिपाली), सिराल (शिरायुक्त) व बारीक असून बाजारात ‘ओवा’ नावाने विकले जाते.

ओवा : (१) फांदीवर पान व फुलोर्याचा दांडा, (२) फुलोरा, (३) फूल, (४) फळ.ओवा : (१) फांदीवर पान व फुलोर्याचा दांडा, (२) फुलोरा, (३) फूल, (४) फळ.

ओवा उष्ण, कडू व तिखट; आचके व पेटके बंद करणारा, दीपक (भूक वाढविणारा), वायुनाशी, सारक, उत्तेजक, पौष्टिक अतिसार, अग्निमांद्य, शूल (तीव्र वेदना), उदरवायू, अपचन, पटकी इत्यादींवर देतात. मूळ मूत्रल (लघवी साफ करणारे) व वायुनाशी. बियांत ४–५ टक्के बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असून त्यात ४५—५५ टक्के थायमॉल असते. इंग्लंड व जर्मनीत थायमॉलाच्या उत्पादनाकरिता ओव्याचा उपयोग करतात कारण ते औषधी (जंतुनाशक) असते. मसाल्यात व स्वयंपाकात ओवा वापरतात.

ट्रॅकिस्पर्मम रॉक्सबर्धियानम ही जातीही ओवा नावानेच ओळखतात; गुजरातेत व महाराष्ट्रात तिची लागवड करतात; स्वयंपाकात व मसाल्यात वापरतात. वांती व उचकीवर उपयुक्त असते. यूरोपमध्ये पाने पार्स्ले ऐवजी वापरतात.

लेखक : ज. वि. जमदाडे.

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश