(कचरा, कसारा; हिं. कसेरू कासूर; सं. कर्चुरक, गंधकचोर; लॅ. स्किर्पस किसूर; कुल-सायपेरेसी). या ओषधीचा प्रसार जवळजवळ सर्व भारतात असून, महाराष्ट्रात ती कोकणामध्ये नदीकाठी आढळते; तिची लागवडही करतात. भूमिस्थित (जमिनीतील) खोड (मूलक्षोड) तिरश्चरयुक्त [खोड], असून त्यावर कठीण गोलसर गाठी (ग्रंथिक्षोड) येतात व त्यावर लांब ताठर केस असतात. वायवी खोडे (जमिनीवरील खोडे) १.२५ — २ मी. उंच, सरळ व त्रिधारी असतात. पाने बरीच, खोडाइतकी लांब व १.२ – १.८ सेंमी. रुंद, निमुळती व खोडाच्या तळाशी येतात; फुले टोकाला चवरीसारख्या फुलोऱ्यात सप्टेंबरमध्ये येतात. कणिशके लहान व तपकिरी; छदे तीन पण सारखी नसून, मोठे ०.६ मी. व लहान ५.८ सेंमी. लांब व पानासारखी [ फूल]. फळ (कपाली) लहान, शुष्क, एकबीजी, न तडकणारे व पिवळे असते.

ग्रंथिक्षोड अतिसार व वांतीवर देतात; ते हिवाळ्यात खणून काढतात व त्याचे काप करून खातात; ते गोड, पिठूळ, थंड व पौष्टिक असते.

लेखक : ज. वि. जमदाडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश