कांगणी (कामोणी, कांगोणी; हिं. मकोइ; गु.पिलुडी; क. काकमुंची, काचिगिड; सं. काकमाची, कागांगी; इं. ब्लॅक नाइटशेड, हौंड्स बेरी; लॅ. सोलॅनम नायश्रम; कुल-सोलूनेसी). सु.३०-४५ सेंमी. उंचीची व अनेक फांद्यांची ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) ओषधी [→ ओषधी] भारतात सर्वत्र, विशेषतः शेतजमिनीत तणासारखी वाढते; शिवाय श्रीलंकेत व सर्व उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांत आढळते. खोड सरळ; पाने अनेक, एकाआड एक, साधी, अंडाकृति कुंतसम (भाल्यासारखी), थोडीफार खंडित किंवा अखंड, दोन्ही टोकांस निमुळती होत गेलेली; फुले लहान, पांढरी असून पानांच्या बगलेजवळ ३ ते ८ फुलांचे लोंबत्या चवरीसारखे झुबके सप्टेंबर-जानेवारीत येतात. मृदुफळे (०.६ मिमी. व्यास) पिवळी, लाल किंवा गर्द जांभळी, गुळगुळीत व चकचकीत. बिया अनेक, चकतीसारख्या व पिवळया. ह्या वनस्पतीत सोलॅनीन व सॅपोनीन ही अल्कलॉइडे असतात. तिचा फांट (एक प्रकारचा काढा) आमांश, ज्वर व पोटाच्या तक्रारीवर देतात. वनस्पतीचा रस जखमांवर व चर्मरोगावर वापरतात; पोटात घेतल्यास, पाण्यासारखे ढाळ होतात व लघवी भरपूर होते. यकृतवृध्दी, रक्तमिश्रित थुंकी येणे, मूळव्याध, आमांश इत्यादींवरही रस गुणकारी; पानांचा काढा मूत्रल (लघवी साफ करणारा) व सारक; पक्व फळे ज्वर, अतिसार, नेत्ररोग व जलव्देषावर (पिसाळलेले कुत्रे चावल्याने होणाऱ्या रोगावर) देतात. तसेच ती सारक, पौष्टिक, क्षुधावर्धक असून दमा, चर्मरोग, अतिशय तहान लागणे व मूत्रविकार इत्यादींवर चांगली. कच्ची फळे विषारी असून त्यांचा लेप नायट्यांवर लावतात. लेखक: शं. आ. परांडेकर स्त्रोत: मराठी विश्वकोश