काटेभोवरी (कृष्णसारिवा; हिं. काळी दुधी, श्यामलता; क.गोर्विबळळी; सं. सारिवा, गोपिनी; इं. ब्लॅक क्रीपर; लॅ. इक्नोकार्पस फ्रुटेसेन्स; कुल-अॅपोसायनेसी). ह्या मोठया वेलीसारख्या [महालता] झुडुपाचा प्रसार भारतात बहुतेक सर्वत्र असून श्रीलंका, जावा व ऑस्ट्रेलिया येथेही आहे. कोवळया फांद्यावर बारीक पिंगट लव असते. पाने संमुख (समोरासमोर), दीर्घवृत्ताकृती-आयतवरुन गुळगुळीत, खालून लवदार व फिकट; फुले पुष्कळ, हिरवट पांढरी; ती फांद्यांच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत, तांबूस, लवदार, त्रिपाद वल्लरीवर [→पुष्पबंध] नोव्हेंबर-डिसेंबरात येतात. पेटिकाफळ सरळ किंवा किंचित वाकडे, रेषाकृती, बारीक व दंडगोलाकृती; बिया लांबट, काळ्या व त्यांवर केसांचा तोकडा झुबका असतो. मुळांचे गुणधर्म ⇨ अनंतमुळाप्रमाणे, आरोग्यपुनर्स्थापक आणि पौष्टिक असून सार्सापरिलाऐवजी देतात. कातडीस फोड आल्यास किंवा ती फुटल्यास मूळ लावतात. पानांचा व देठांचा काढा तापावर देतात. शोभेसाठी ही वेल बागेत लावतात. खोडाचे दोर करतात. लेखक: ज. वि. जमदाडे स्त्रोत: मराठी विश्वकोश