कारंज-वृक्ष (क. निरुकायी; इं.स्कार्लेट-बेल ट्री, फौंटन-ट्री, आफ्रिकन टुलिप-ट्री; लॅ. स्पॅथोडिया कॅंपॅन्युलेटा; कुल-बिग्नोनिएसी). हा सुंदर वृक्ष मूळचा पश्चिम आफ्रिकेतील असून उष्णकटिबंधात सर्वत्र, शोभेसाठी व सावलीकरिता रस्त्यांच्या दुतर्फा व उद्यानांतून लावलेला आढळतो. पाने संयुक्त, पिसासारखी, विषमदली; दले ९–१९, संमुख (समोरासमोर), इंडाकृती व टोकदार असतात; फुले नारिंगी शेंदरी, मोठी, अग्रस्थ (शेंडयावरील) मंजऱ्यांवर डिसेंबर–मार्चमध्ये येतात. संवर्त हिरवट तपकिरी,सच्छद, नावेसारखा व कलिकावस्थेत इतर भागांस पूर्णपणे झाकतो; पुष्पमुकुट घंटेसारखा; केसरदले पिवळी, चार, बहिरागत व लोंबते परागकोश; बिंब वाटीसारखे,किंजपुटात अनेक बीजके [ →फूल]; फळे (बोंडे) पिंगट, भाल्यासारखी, कठीण व अनेकबीजी; बीजे सपक्ष व लंबगोल. कळी दाबली असता पाणी पिचकारीप्रमाणे बाहेर येते म्हणून त्या अर्थाचे इंग्रजी आणि मराठी नाव पडले आहे. शास्त्रीय नाव संवर्त वा पुष्पमुकुट यांच्या स्वरुपावरुन दिले आहे. यांचे लाकूड पांढरे, परम व सुतारकामास चांगले असते; नवीन लागवड बी किंवा मुळापासून येणाऱ्या अधश्चरांनी (जोरदार वाढणाऱ्या कोंबांनी) करतात. लेखक: सुधारक देशपांडे कारंज-वृक्ष स्त्रोत: मराठी विश्वकोश