किरमिरा (हिं. वन-निंबू; क. गुरूवेदे, मनिक्यान; सं. वननिंबुका, अश्वशकोत; इं. टूथब्रश प्लॅंट, लॅ. ग्लॉयकॉस्मिस पेंटाफिला; कुल-रूटेसी). हे एक सरळ वाढणारे क्षुप (झुडूप) असून त्याचा प्रसार भारतात सर्वत्र आहे; शिवाय श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, चीन, मलाया, बोर्निओ इ. प्रदेशांतही आहे. पाने संयुक्त, पिसासारखी तीन ते पाच दलांची क्वचित एकदली; फुले लहान, पांढरी व पानांच्या बगलेत लांब परिमंजऱ्यांवर येतात. मृदुफळ गोलसर, गुलाबी किंवा फिकट पिवळसर व फार लहान, एक सेंमी. व्यासाचे; बिया एक ते तीन; फळे खाद्य. इतर लक्षणे रूटेसी कुलवर्णनाप्रमाणे असतात. मुळे कुटून सारखरेबरोबर बारीक तापात देतात; मुळे व साल कफ, ज्वर, संधिवात, रक्तक्षय, कावीळ यांवर उपयुक्त; पानांचा रस नायटे व इतर चर्मरागांबर लावतात. ग्लॉयकॉस्मीन हे ग्लायकोसाइड पानांत असते. लेखक: ठोंबरे, म. वा. स्त्रोत: मराठी विश्वकोश