कॅरोब वृक्ष (हिं. खरनूब; इं. लोकस्ट बीन, सेंट जॉन्स ब्रेड; ल. सेरॅटोनिया सिलीक्वा कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-सीसॅल्पिनि-ऑइडी). सु. १२ - १५ मी. उंचीचा हा सदापर्णी वृक्ष मूळचा द. यूरोपातील व भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील असून फार पूर्वी भारतात आणला गेला व आता पंजाब व इतर प्रदेशांत सुस्थित झाला आहे. शोभा, सावली आणि खाद्य फळे यांकरिता याची लागवड केली जाते. कॅरोब वृक्ष : (१) फांदी, (२) संयुक्त पान, (३) फुलोरा, (४)शिंबा. चांगली निचर्याची चुनखडीयुक्त किंवा खडकाळ जमीन याला मानवते. पाने संयुक्त पिसासारखी, एका-आड एक; दले सहा ते आठ,चकचकीत; फुलोरा पार्श्विक लाल मंजरी [→ पुष्पबंध]; फुले बहुधा एकलिंगी व भिन्न झाडांवर; क्वचित द्विलिंगी; संदले पाच; प्रदले नसतात; केसरदले पाच; किंजपुटाभोवती बिंब असते फूल इतर सामान्य लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलात वर्णिल्याप्रमाणे. शिंबा (शेंग) लालबुंद, ७ - २० सेंमी. लांब, जाड आणि गोड मगजयुक्त (गरयुक्त); बिया पिंगट आणि चकचकीत. बियांतील विपुल प्रथिनयुक्त मगजामुळे त्या मधुमेहाच्या रोग्यांना फार उपयुक्त; शिवाय त्यांतील पुष्कापासून (विकासावस्थेतील बीजाच्या पोषणास मदत करणार्या भागापासून) 'ट्रॅगॅसोल' किंवा 'कॅरोब गम' नावाचा डिंक काढतात. तो खाद्य असून कागद व रबर उद्योग, सौंदर्यप्रसाधने, खळ, तंबाखू, कुत्र्यांची बिस्किटे, कॅलिको छपाई इत्यादींत वापरतात. फळे व बियांपासून प्रथम साखर बनवितात व नंतर राहिलेल्या भागापासून एथिल अल्कोहॉल काढतात. बियांची पूड अमेरिकेत पावरोटीत घालतात कारण ती पौष्टिक व जीवनसत्त्वयुक्त (अ, ब, ड आणि इ) असते. गुरे व घोडे यांना फळे उत्तम खुराक म्हणून उपयुक्त आहेत पण माणसांनीही दुष्काळात त्यांचा भरपूर उपयोग केला आहे. फळे स्तंभक (आकुंचन करणारी) व कफनाशक असून बियांची टरफले रेचक व स्तंभक असतात. लाकूड जड व कठीण असल्याने कपाटे व पेट्यांकरिता वापरतात, तसेच त्यातील अल्गरॉबीन हे रंगद्रव्य कापडांना फिकट तपकिरी रंग देण्यास उपयुक्त ठरले आहे. लेखक: शं. आ.परांडेकर स्त्रोत: मराठी विश्वकोश