(कोष्ठ, पेंव; हिं. केऊ; गु. पकरमूल; क. चिक्के; सं. कुष्ठ, पुष्करमूल; लॅ. कॉस्टस स्पेसिओजस; कुल झिंजिबरेसी). ही सु. १.२ – २.७ मी. उंच सरळ वाढणारी ओषधी मूळची ईस्ट इंडीजमधील असून भारतात सर्वत्र व चीन, मलेशिया, श्रीलंका इ. देशांत आढळते.बंगाल व द. भारतात ही बागेत शोभेकरिता लावतात. मूलक्षोड (जमिनीत आडवे वाढणारे खोड) ग्रंथिल (गाठाळ); वायवी (हवेतील) खोड तळाशी काहीसे काष्ठयुक्त. पाने एकाआड एक, साधारण बिनदेठाची, लांबट, खालून लवदार आणि तळाकडे चिवट असतात; छदे (फुले वा फुलोरा ज्यांच्या बगलेत येतात अशी पाने) लाल आणि पांढरी फुले मोठी व पुष्कळ असून दाटीने कणिशात ऑगस्ट व ऑक्टोबरात येतात. केसरदलाची योजी पाकळीसारखी व त्यावर लांबट परागकोश; ओष्ठ अंतर्वक्र [→ फूल], पांढरा आणि त्यावर मधे पिवळा डाग असतो. बोंड त्रिधारी व लाल; बी काळे व त्यावर पांढरे अध्यावरण असते [→ फळ; सिटॅमनी (झिंजिबरेसी)]. मूळ, कडू, स्तंभक (आकुंचन करणारे), कृमिनाशक, वाजीकर (कामोत्तेजक), पाचक, उत्तेजक, रेचक, पौष्टिक असून कफज्वरावर व त्वचारोगांवर गुणकारी; त्यात स्टार्च भरपूर असतो. मूलक्षोड शिजवून साखरेच्या पाकात टाकतात; ते पथ्यकर खाद्य असते. लेखक: जमदाडे, ज. वि. स्त्रोत: मराठी विश्वकोश