गुलबुश (गुलबक्षी; हिं. गुल-अब्बास; गु. गुब्बुजी; क. चंद्रमल्लिगे; सं. चंद्रकली; इं. फोर-ओ-क्लॉक प्लँट, मार्व्हल ऑफ पेरू; लॅ. मिरॅबिलिस जलापा कुल-निक्टॅजिनेसी). ही ओषधी सु. एक मी. उंच वाढणारी, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) व शोभिवंत असून मूळची मेक्सिको व पेरू देशांतील आहे व त्यावरून इंग्रजी नाव ‘मार्व्हल ऑफ पेरू’ पडले आहे. भारतात सर्वत्र, बागेत व क्वचित जंगली अवस्थेत आढळते. हिचे मूळ ग्रंथिल, पिंगट असून खोड नरम व काहीसे जाड असते. पाने तळाशी हृदयाकृती, अंडाकृती व समोरासमोर असतात. फुले झुबक्यांनी येतात; ती पांढरी, लाल, पिवळी, गुलाबी किंवा मिश्ररंगी असून प्रत्येकास तळाशी हिरवे छदमंडल व नळक्यासारखे परिदलमंडल असते [→ फूल]. फळ शुष्क, काळे,सुरकुतलेले असून त्यावर परिदलाच्या तळाचे वेष्टन व आत एकच बी असते. फुले सायंकाळी उमलतात म्हणून त्याला फोर-ओ-क्लॉक प्लँट असे इंग्रजीत म्हणतात. पाने चुरगळून त्याचे गरम पोटीस सांध्यातील गाठींवर, गळवांवर बांधल्यास ती लवकर पुवाळतात. जखमा व खरचटणे यांवर पानांचा रस गुणकारी असतो. मूळ वाजीकर (कामोद्दीपक) व रेचक; तुपात तळलेले चूर्ण दूधातून घेतल्यास शक्तिवर्धक असते. चीनमध्ये पाने आणि खोडाचे तुकडे मांसाबरोबर शिजवून खातात. खऱ्या जलापा (एक्झोगोनियम पर्गा ) ऐवजी किंवा त्यात याच्या मुळांची भेसळ करून वापरतात. मुळांचे चूर्ण पाण्यात कालवून लावल्यास कातडी व श्लेष्मल त्वचेची (पातळ नाजूक त्वचेची) आग होते. बियांची काळ्या मिरीबरोबर भेसळ करतात [→ निक्टॅजिनेसी]. अभिवृद्धी (लागवड) बियांपासून अगर ग्रंथिल मुळ्यांपासून करतात. गुलबुश कुंडीत, ताटव्यांच्या मागे वा कडेला लावतात. बागेतील कोणत्याही जमिनीत वाढते. बी सरळ कायम जागी लावून ३० – ४० सेंमी. अंतराने रोपे विरळ करतात. पेरणी जानेवारी - फेब्रुवारी, मे – जुलै आणि सप्टेंबर - ऑक्टोबर आणि डोंगराळ भागात मार्च - एप्रिलमध्ये करतात. (चित्रपत्र). जमदाडे, ज. वि.; चौधरी, रा. मो. स्त्रोत: मराठी विश्वकोश