(अंजनी कुल). फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग द्विदलिकित (बियांत दोन दलिका असलेल्या) वर्गाच्या मिर्टेंलीझ गणात ह्या वनस्पति-कुलाचा अंतर्भाव असून यामध्ये सु १५० प्रजाती व ३,५०० (ए. बी. रेंडेल यांच्या मते १७० प्रजाती व ३,००० जाती; जे. सी. विलिस यांच्या मते २४० प्रजाती व ३,००० जाती) आहेत. याचा प्रसार उष्ण, उपोष्ण व शीत कटिबंधात आहे. ह्या वनस्पती ओषधी, क्षुप (झुडूपे), वेली व क्वचित लहान वृक्ष असतात. कित्येक पाण्यात, दलदलीत किंवा दुसऱ्या झाडावर आधार घेऊन अपिवनस्पति वाढतात. लाखेरी नावाच्या या कुलातील वनस्पतीची फळे खाल्ली असता ओठ काळे होतात. ह्या क्षुपाचे लॅटिन प्रजातिवाचक नाव मेलॅस्टोमा असे पडण्याचे कारण ग्रीक भाषेत मेलान म्हणजे काळे व स्टोमा म्हणजे तोंड व यांवरून या कुलाचेही नांव पडले आहे. या कुलातील वनस्पतींच्या खोडाच्या अंतररचनेत प्रकाष्ठ (जलवाहक भाग), परिकाष्ठ (अन्नरसाची ने-आण करणारा भाग) आणि वाहक वृंदाचे बाबतीत वैचित्र आढळते.

शारीर, वनस्पतींचे. पाण्यातील जातींत वायूतक आढळते. पाने समोरासमोर, कधी मंडलित (दोन्हीपेक्षा अधिक एकाच पेऱ्यावर असलेली) व साधी; फुलोरे विविध किंवा फुले एकेकटी असतात. फुले नियमीत, द्विलिंगी, परिकिंज किंवा अपिकिंज; संदले ४–५ (क्वचित ३–६), प्रदले तितकीच व सुटी; केसरदले संख्येने प्रदलांइतकी अथवा दुप्पट, कधी संधानावर (परागकोश व तंतू यांना जोडणाऱ्या भागावर) उपांगे; किंजपुट पूर्ण किंवा अर्धवट अधःस्थ, कप्पे ३–६, क्वचित एकच व बीजके बहुदा अनेक असतात. फूल. फळ मृदुफळ किंवा शुष्क (बोंड); बिया लहान व अपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश नसलेल्या); लोखंडी (अंजना) व लाखेरी ही यातील सामान्य झाडे असून शिवाय इतर काही झाडे बागेत सुंदर फुलांकरिता लावतात. पॅचिसेंट्रिया नावाच्या अपिवनस्पतीच्या मुळावरील गाठीत स्वसंरक्षार्थ मुंग्यांचा ताफा असतो; हा एक सहजीवनाचा प्रकार आहे. ह्या कुलाला मेलॅस्टोमॅटेसी असेही नाव आहे.

लेखक - शा. दा. पाटील

स्त्रोत - मराठी विश्वकोश