रोंडेलीशिया ओडोरॅटो : (इं. स्वीट स्मेलिंग रोंडेलीशिया; कुल-रुबिएसी). फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग बागेत शोभून दिसणारे एक सु. ०·९५ – २·५० मी. उंच झुडूप. याचे मूलस्थान क्युबा व मेक्सिको असून हे इतरत्र उद्यानांतून सामान्यपणे आढळते. रोंडेलीशिया या प्रजातीत एकूण सु. ८५ जाती असून त्यांचा प्रसार अमेरिकेच्या उष्ण भागात विशेष आहे; वेस्ट इंडीजमध्येही काही जाती आढळतात. रोंडेलीशिया प्रजातीचा अंतर्भाव हल्ली टारेना प्रजातीत केला असून त्यातील एकूण सु. ३५० जातींपैकी भारतात फक्त ९ ते १२ आढळतात.

रों. ओडोरॅटा हे सदापर्णी, केसाळ व कठीण झुडूप असून त्याला साधी, समोरासमोर, सोपपर्ण (तळाशी दोन देठांमध्ये लहान उपांगे दोन बाजूंस असणारी), वरच्या बाजूस गर्द हिरवी आणि खरबरीत व खालच्या बाजूस फिकट हिरवी, अंडाकृती-कुंतसम (भाल्यासारखी) व अत्यंत लहान देठाची पाने असतात. फुलोरे गुलुच्छ; पुष्पबंध सु. १० सेंमी. रुंद फांद्यांच्या शेंड्यांवर असून त्यांवर सु. १०-३० लालसर शेंदरी किंवा नारिंगी, काहीशी सुगंधी, सु. २·५ सेंमी. व्यासाची फुले जून ते सप्टेंबरमध्ये येतात. संवर्त घंटेसारखा आणि पाकळ्या ४-६, बाहेरच्या बाजूस गोलसर आणि खाली नलिकाकृती (पुष्पमुकुट) असतात. फुलाच्या मध्यभागी (कंठाशी) पिवळा ठिपका असतो. केसरदले पाकळ्यांइतकी असतात; किंजपुट अधःस्थ व त्यात दोन कप्पे असतात. छदे आणि छदके (फुलाच्या तळाशी असलेली उपांगे) असतात फूल. बोंडे (फळे) गोलसर व पुटकमिदुर (कप्प्यांच्या बाजूस तडकणारी) असतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे रुबिएसी अथवा मंजिष्ठ कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड छाट कलमे किंवा दाब कलमे लावून करतात.

लेखक - कमला श्री. हर्डीकर / शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश