(कुल-बिग्नोनिएसी). ही फार शोभिवंत वेल [ महालता] मूळची ब्राझीलमधील असून इतर देशांत व भारतात सर्वत्र बागेत लावलेली आढळते. सदैव टवटवीत हिरवी दिसणारी पाने समोरासमोर असून प्रत्येक पान पुन्हा विभागलेले (द्विदली, त्रिदली) असते. पाने चुरगळली असता त्यांना लसणासारखा वास येतो. या वेलीची सच्छद [ फूल], मोहक, गुलाबी व तुतारीच्या आकाराची फुले पानांच्या पार्श्वभूमीवर फार सुंदर दिसतात. अॅ. कॅलिसिना व अॅ. निटिडम या दुसऱ्या जातींची फुले पिवळी असतात. उष्ण व दमट हवेत आणि सकस गाळाच्या जमिनीत या वेली चांगल्या वाढतात. दाब-कलमांनी किंवा छाट-कलमांपासून नवीन लागवड करतात. अॅ. पंक्टिफोलियम ह्या द. अमेरिकेतील वृक्षाची मुळे तेथील इंडियन लोक दम्यावर देतात.

लेखक :ज. वि. जमदाडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश