गाव - निमी
तहसील - जंबू आरामगड
जिल्हा - जयपूर (राजस्थान)

कच्च्या रस्त्यानं जयपूरहून दीड-दोन तासांचा प्रवास करत निमीला पोचलो. फुफाटा उडवत "तालाब‘ असलेल्या ठिकाणी आमची गाडी थांबली. एका बाजूला उंच मातीची टेकडी; तर दुसऱ्या बाजूला मोठमोठाले वृक्ष आणि त्याच्या पलीकडं शेती. त्या निर्जन निसर्गात खूप गूढ अशा ठिकाणी पोचल्याचा भास झाला.

जेव्हा ती मातीची टेकडी चढून आम्ही वरती गेलो, तेव्हा खरं दृश्य नजरेसमोर येतं. दूरवर दिसणाऱ्या टेकड्या आणि खोल, मोठ्या पसरट कढईसारखा दिसणारा "तालाब‘. ती टेकडी म्हणजे आहे या "तालाब‘ची भिंत! या तलावात उन्हाळ्याच्या तोंडावरही पाणी होतं आणि पाण्यातली पक्ष्यांची ये-जा सुरू होती...भक्ष्य टिपणं सुरू होतं.

1994-95 मध्ये जेव्हा हा "तालाब‘ बनला, त्याआधी तिथं एक वेगळीच समस्या होती. पावसाळ्यात या अरवरीच्या टेकड्यांवरून वाहणारा पाऊस संपूर्ण रेताड माती खाली वाहून आणायचा. त्यामुळे खाली असणाऱ्या शेतीवर संपूर्ण रेती पसरायची. जमीन नापीक व्हायची. गावकऱ्यांनी एकत्र येऊन पर्याय शोधला आणि बघता बघता "तालाब‘ तयार झाला. पाणी अडलं. जिरलं. शेतीसाठी उपलब्ध झालं आणि पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारी रेती पण तिथंच थांबू लागली. आता मोठ्या प्रमाणात टरबूज, खरबूज, काकडीसारख्या वेलभाज्यांची शेती केली जाते. गावात समृद्धी आली आहे.

लेखक - निलिमा जोरवर