आजोळीच्या आमराईतून शुद्ध, नैसर्गिक पिकलेले रसाळ आंबे आज कुठेच दिसत नाहीत. हल्ली पैसा कमावण्याच्या उद्देशातून कार्बाइड टाकून पिकविलेले आंबे, ‘मागणी तसा पुरवठा’ या अर्थशास्त्रीय संकल्पनेनुसार बाजारात उपलब्ध होत आहेत. कार्बाइडयुक्त आंबे शरीरासाठी घातक असून त्यापासून कर्करोगासारखे आजारही होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी वेळोवेळी सांगितले आहे.आरोग्यासाठी हानीकारक असलेले आंबे सहज उपलब्ध होत असताना विषमुक्त आंबे उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम कृषी विभागाने सुरू केला आहे. जनतेकडून सुद्धा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

विभागीय आयुक्तालयाच्या परिसरात सध्या विषमुक्त आंबा महोत्सव सुरु आहे. आयोजक आहेत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजे आत्मा. हा महोत्सव आपल्यासाठी इतर महोत्सवांपेक्षा वेगळा आहे. सहभागी होणाऱ्या नागरिकांना आनंद तर मिळेलच सोबतच शारीरिक स्वास्थही. ‘उत्पादक ते थेट ग्राहक’ या संकल्पनेवर आधारित कृषी विभागाने आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. नैसर्गिकरित्या पिकविलेल्या फळांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विषमुक्त आंबा महोत्सवाची सुरुवात आहे. बाजारभावापेक्षा स्वस्त आंबे ग्राहकांना उपलब्ध करून देणे. त्याचप्रमाणे विदर्भातील आंब्यांना बाजारपेठ मिळवून देणे अशी दुहेरी भूमिका कृषी विभाग पार पाडत आहे. कार्बाइडयुक्त फळे कशी ओळखावी याचे प्रात्यक्षिक येथे दाखविण्यात येत आहे.

महोत्सवामध्ये ग्राहकांना विषमुक्त व नैसर्गिकरित्या पिकविलेली आंबा, चिकु, केळी, पपई यासारखी फळे खरेदी करता येतील. त्याचबरोबर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातील देशी वाणाची आंबे, दशहरी, केसर, नागीन, लंगडा, आम्रपाली, राना, तोतापूरी, चौसा, लाडू, पायरी अशा विविध प्रजातीच्या आंब्यांची या महोत्सवामध्ये ग्राहकांना चव चाखायला मिळेल.आंबा उत्पादकांकडून रास्त दरात मिळणारी फळे नैसगिकरित्या पिकविलेली असल्याची हमी मिळत आहे. यामुळेच आंब्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून गावठी आंब्यांना ग्राहकांकडून अधिक मागणी येत आहे.उत्पादक ते थेट ग्राहक माध्यमातून उत्तम दर्जाची फळे व आंबे मिळत आहेत. याद्वारे शेतकऱ्यांना देखील चांगल्याप्रकारे आर्थिक मिळकत प्राप्त होत आहे.

लाखांदूर तालुक्यातील बेलारी गावचे शेतकरी अनंत शिवणकर आंबा उत्पादक आहेत. लंगडा, दशहरी, नागीन प्रकारचे महोत्सवामध्ये विकायला आणलेले आंबे नैसर्गिकरित्या पिकविलेले आहेत. आंब्यांची ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. दर्जेदार आंबे ग्राहकांना मिळत असल्यामुळे फसवणूक विरहीत आर्थिक मिळकत प्राप्त होत असल्याचे ते सांगतात.मागील 25 वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील माडगी येथील कवडूजी शांतलवार आंब्यांचे उत्पादन करीत आहेत. आम्रपाली, रत्ना, केसर यासारख्या प्रजातीचे आंबे त्यांच्या शेतामध्ये नैसर्गिकरित्या पिकविल्या जातात. या आंब्यांची थेट ग्राहकांना विक्री केली जाते. त्यामुळे ‘विषमुक्त आंबे ही आजच्या काळाची गरज आहे, ही गरज आपण पूर्ण करीत असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवते. ‘ग्राहकाचे समाधान हीच खरी कमाई’ असल्याचे ते सांगतात.

आजच्या धावपळीच्या युगामध्ये कॅल्शियम कार्बाइडमध्ये पिकविलेली फळे बाजारामध्ये सहज मिळतात. परंतु, या फळांचा शरीरावर विघातक परिणाम होतो व मानवी स्वास्थ बिघडते. कॅन्सरसारख्या भीषण आजाराला कार्बाइडयुक्त फळे आमंत्रण देतात. सोबतच इतर प्रकारचे अनेक आजारदेखील यामुळे होतात. हे आजार टाळण्यासाठी व आपले आरोग्य स्वस्थ राखण्यासाठी विषमुक्त फळे खावयास हवी. अशी विषमुक्त फळे आंबा महोत्सवामध्ये ग्राहकांना मिळत आहेत.

आंबा महोत्सवामधील काही ग्राहकांच्या प्रतिक्रिया...

बंडू निंबोकार (व्यावसायिक): या आंबा महोत्सवामधील आंबे चवदार व कार्बाइडमुक्त आहेत. तसेच बाजारभावापेक्षा स्वस्त दरात आंबे मिळत आहेत. कृषी विभागाचा हा स्तुत्य उपक्रम असून यामुळे आम्हाला योग्य दरात विषमुक्त, गावरान व विविध प्रजातींच्या आंब्यांची चव चाखायला मिळत आहे.पवनराजे पवार (बांधकामगार व्यावसायिक): शेतकरी ते थेट ग्राहक या योजनेच्या माध्यमातून विषमुक्त आंबे, चिकू, पपई, केळी यासारखी फळे उत्पादक शेतकऱ्यांचा शेतातील आहेत. ही फळे विकत घेतल्यानंतर नैसर्गिकरित्या पिकवलेली असल्याची खात्री मिळाली. शिवाय बाजारभावापेक्षा स्वस्त व चांगल्या दर्जाची फळे विकत घेतल्याचे समाधान देखील मिळाले.

लेखन: गणेश गव्हाळे

माहिती व जनसंपर्क,नागपूर

माहिती स्रोत: महान्युज