वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल याबाबत जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात विचारमंथन सुरु झाले आहे. याची तीव्रता व परिणामकारकता कमी करण्याचा भाग म्हणून शासनाचे विविध विभाग व जनतेच्या सहभागातून 2016 मधील पावसाळ्यात वन महोत्सव कालावधीत 1 जुलै, 2016 या एकाच दिवशी सुमारे 2 कोटी 81 लक्ष वृक्ष लागवड मोहीम यशस्वीपणे राबविली. या मोहिमेमध्ये मिळालेल्या यशाने 2017 मध्ये 4 कोटी, 2018मध्ये 13 कोटी व 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवड याप्रमाणे एकूण 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतलेला आहे. 50 कोटी वृक्ष लागवडीसाठी ग्रामपंचायत व इतर शासकीय यंत्रणांना उद्दिष्ट दिले असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर शक्य आहे. तसेच शहरी भागात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगर पंचायती क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचा उद्देश महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती याठिकाणी वाढत्या शहरीकरणामुळे झाडांची संख्या कमी झाल्यामुळे वातावरणामध्ये बदल तसेच प्रदुषणामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरी वस्ती असलेल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करुन वातावरणमध्ये होणारे बदल व प्रदुषण नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांना रोपे लागवडीसाठी सुलभतेने प्राप्त व्हावी जेणेकरुन सदर रोपे आपल्या घराच्या परिसरामध्ये लावतील. त्यामुळे तापमानाची तीव्रता कमी होवून प्रदुषण नियंत्रणाला मदत झाल्यामुळे परिसरातील वावर सुसह्य होईल. त्याचप्रमाणे नागरिकांचा या कार्यक्रमामध्ये थेट सहभाग वाढविणे हादेखील उद्देश आहे. या उद्देशाने वन विभागाकडून 25 जून ते 5 जुलै 2017 या कालावधीत 'रोपे आपल्या दारी' यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. कार्यक्रमाची व्याप्ती प्रत्येक जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यापैकी कोणत्याही तीन ठिकाणांची निवड संबंधित मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) हे करतील. कार्यक्रमाची अंमलबजावणी या योजनेमध्ये निवडलेल्या शहराच्या व्याप्तीनुसार 3 ते 5 ठिकाणी वनविभागाकडून रोपे पुरविण्यासाठी वन महोत्सव केंद्र उघडण्यात येतील. वन महोत्सव केंद्रावरील रोपे नागरिकांना पुढीलप्रमाणे उपलब्ध होतील. 25 जुन ते 5 जुलै-नागरिक त्यांच्या आवश्यकतेनुसार लागवडीकरीता रोपे (प्रत्येक घराकरीता जास्तीत जास्त 5 व प्रत्येक गृहनिर्माण संस्था, इतर संस्थांकरीता जास्तीत जास्त 25 रोपे शासनाकडून वन महोत्सव कालावधीकरीता ठरविलेल्या सवलतीच्या दरानुसार) वनमहोत्सव केंद्रावरुन घेवून जातील. 1 जुलै ते 5 जुलै- या कालावधीत रोपे वन विभागामार्फत नागरिकांनी सांगितलेल्या ठिकाणापर्यंत वृक्षमित्रामार्फत पोहोचवण्यात येतील. प्रत्येक घराकरीता जास्तीत जास्त 5 व प्रत्येक गृहनिर्माण संस्था, इतर संस्थाकरीता जास्तीत जास्त 25 रोपे शासनाकडून वन महोत्सव कालावधीकरीता ठरविलेल्या सवलतीच्या दरानुसार पुरवठा करण्यात येतील. रोपे पुरवठापासून प्राप्त होणारी रक्कम मनी रशीदद्वारे घेण्यात यावी. त्याकरिता आवश्यक मनी रशीदचा पुरवठा मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), उपवनसंरक्षक (प्रादेशिक), विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक), विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण), उपविभागीय वनअधिकारी, (प्रादेशिक) स्वतंत्र कार्यभार कार्यालयाकडून करण्यात यावा. प्रत्येक वन महोत्सव केंद्रावर 5 ते 10 हजार रोपांची वाहतूक केली जाईल. ज्या वन महोत्सव केंद्रावर यापेक्षा जास्त रोपांची मागणी आहे तेथे रोपांचा पुरक पुरवठा करण्याचा निर्णय मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) सबंधित उपवनसंरक्षक (प्रादेशिक), विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक), विभागीय वन अधिकारी (सामा.वनी.) उपविभागीय वन अधिकारी (प्रादेशिक) स्वतंत्र कार्यभार यांनी घ्यावा. रोपे कशी लावावीत व रोपे लावल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी याबाबतच्या सूचना असलेले माहितीपत्रक रोपे देतेवेळी संबंधितांना पुरविण्यात येईल. तसेच वृक्षमित्रदेखिल त्याबाबत मार्गदर्शन करतील. ज्या व्यक्तिला रोपे पुरवठा केला आहे त्याचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक व ती व्यक्ति, संस्था रोपे कोठे लावणार आहे इ. नोंदी वन महोत्सव केंद्रावर ठेवणे आवश्यक राहील. रोपे मिळण्याकरीता वन विभागाकडून देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधणे आवश्यक राहील. रोपांची वाहतूक पाहण्याकरीता प्रत्येक वन महोत्सव केंद्रावर 5 मोबाईलधारक वृक्षमित्र दुचाकी, रिक्षासह नेमण्यात येतील हे वृक्षमित्र दुचाकी, रिक्षावरुन रोपे संबंधितांना पुरवठा करतील. जर मोठ्या प्रमाणात मागणी असेल तर (गृहनिर्माण संस्था, इतर संस्था) इत्यादी ठिकाणी वनविभागाचे वाहनाव्दारे रोपांचा पुरवठा केला जाईल. प्रत्येक वृक्षमित्राला प्रतिदिन 1000 रुपये याप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. ज्या उपवनसंरक्षक (प्रादेशिक), विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक), विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण), उपविभागीय वन अधिकारी, प्रादेशिक) स्वतंत्र कार्यभार यांचे कार्यक्षेत्रात वृक्षमित्र काम करतील त्यांच्याकडून वृक्षमित्रांना प्रमाणपत्र देण्यात येईल. योजनेमध्ये स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेण्यात येईल. तसेच 25 जून ते 5 जुलै 2017 पर्यंत वन महोत्सव केंद्रावरुन वाटप करण्यात येणारी जास्तीत जास्त रोपे लोकप्रतिनिधींच्या, प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते वाटप करण्यात येतील. या कार्यक्रमाअंतर्गत रोपांचा पुरवठा वनमहोत्सव केंद्रामध्ये रोपे शिल्लक असेपर्यंत केला जाईल. प्रथम येणाऱ्यला प्रथम पुरवठा केला जाईल. योजनेची सविस्तर व्याप्ती खालीलप्रमाणे: 5000 ते 10000 रोपे प्रती वनमहोत्सव केंद्र- 10 हजार रोपे. 3 ते 5 वनमहोत्सव केंद्र जिल्ह्यात निवडलेल्या 3 शहराकरीता- 50 हजार रोपे. 3 शहरे प्रती जिल्ह्यामध्ये - 1 लाख 50 हजार रोपे. एकूण 36 जिल्हे- 54 लाख रोपे. अशाप्रकारे 'रोपे आपल्या दारी ' हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विशाल कार्लेकर, सर्वसाधारण सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे. माहिती स्रोत: महान्युज