एखादा गुन्हा करण्याकरिता जो साह्य, उत्तेजन किंवा प्रेरणा देतो, तो ‘अपप्रेरक’ होय. अपप्रेरित कृत्य न घडले, तरी अपप्रेरणा हा स्वतंत्र गुन्हा मानला जातो. अपप्रेरित कृत्य करणारी व्यक्तीदेखील एखादे वेळी निरपराध ठरू शकते; परंतु अपप्रेरिकाला मात्र कायदा दोषमुक्त मानीत नाही. उदा., अपप्रेरणेमुळे विषप्रयोग करणारे अज्ञान मूल निर्दोष मानले गेले, तरी अपप्रेरक दंडनीय ठरतो. प्रत्यक्ष गुन्ह्याला जी शिक्षा निर्धारलेली असते, तीच साधारणत: अपप्रेरकाला होते. अपप्रेरित गुन्हा न घडता अपप्रेरणोद्भव असा भिन्न गुन्हा घडला, तरी अपप्रेरक दंडपात्र गणला जातो.

लेखक : सुशील कवळेकर

माहितीस्रोत : मराठी विश्वकोश