परिचय लोकशाही प्रक्रियेमध्ये आपले मत अमूल्य आहे. त्यासाठी महिलांनी आपली जबाबदारी ओळखून मतदार यादीत नाव नोंदणी करणे गरजेची आहे. शिवाय मतदान करणे हेही आपले कर्तव्य आहे. ‘स्त्री शक्ती देशाची, ताकद लोकशाहीची...’ ही म्हण खऱ्या अर्थाने सार्थकी करण्याची वेळ आली आहे. मुलीच्या जन्माचेही आपण स्वागत करायला हवे. कारण दोन्ही घरांसोबतच आपला देश हेही आपले घर आहे. मुलींचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. तिला समान हक्क मिळावा. लोकशाही प्रक्रियेत महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढावा या उदात्त हेतूने 8 मार्च जागतिक महिला दिनी खास स्त्री मतदारांची नोंदणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख... जगातील सर्वात मोठे लोकशाहीप्रधान राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे. आज आपली लोकशाहीप्रधान राज्य व्यवस्था आहे. मतदानावर राज्य व्यवस्था चालणाऱ्या देशात आपला नेता निवडून देण्याचा अधिकार येथील प्रत्येक नागरिकाला आहे. या देशातील स्त्रीयांनाही पुरूषांबरोबर समान हक्क दिलेले आहेत, स्त्रियांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. आजची स्त्री सुशिक्षित आहे. अर्थार्जनासाठी ती उंबरठ्याबाहेर पडली आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे. असे एकही क्षेत्र नाही जिथे तिने आपल्या कर्तृत्वाचे दाखले दिले नाहीत. सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचे सक्रिय योगदान वाढत असताना मतदानाचा हक्क बजावण्यापासून तर, मतदार यादीत नावाची नोंदणी करण्यापर्यंत पुरूषांच्या तुलनेत महिलांची टक्केवारी कमी आहे. मतदार म्हणून आपले हक्क आणि कर्तव्याची जाणीव ठेवून मतदानाच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढायला हवा. स्त्रियांचे मतदान करणे हे तिच्या बुद्धी प्रगल्भतेचे द्योतक ठरणारे आहे. आपण आपले नाव मतदार यादीत नोंदवणे हे आपले लोकशाही व्यवस्थेतील प्राथमिक कर्तव्य असून ते पार पाडले तरच मतदानाचा ‘हक्क’ बजावता येतो. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात निदान 50 टक्के मतदार स्त्रिया असताना या सगळ्या वावटळीत त्या कुठे आहेत? त्यांचा आवाज का ऐकू येत नाही? सगळ्या क्षेत्रात मोठ्या संख्येने दिसणाऱ्या स्त्रिया या एकाच क्षेत्रात तुलनेत कमी प्रमाणात का आहेत. 73 आणि 74 व्या घटना दुरूस्तीनंतर स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33 टक्के आरक्षण मिळाले ते अलीकडेच 50 टक्के झाले. त्यामुळे समाजकारण आणि राजकारणातही महिला सहभागी होवू लागल्या आहेत. आपल्या समस्यांविषयी जागृत राहून जागरूक लोकप्रतिनिधीची निवड करणे ही काळाची गरज आहे. जिल्ह्यात वर्ष 2011 च्या जनगणणेनुसार 1 हजार पुरूषांमागे 931 स्त्रियांनी मतदार यादीत नोंदणी केली आहे. त्यामुळे महिलांचे मतदार यादीत प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. लोकसभेसाठी पुरूषांनी 59.18 टक्के तर महिलांनी 54.86 टक्के मतदान केले. ग्रामीण भागातही पुरूषांच्या तुलनेत 6 टक्के महिलांचे प्रमाण पुरूषांपेक्षा कमी आहे. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पुरूषांच्या 62.27 टक्के मतदानाच्या टक्केवारीत महिलांनी 57.76 टक्के मतदान करून आपला सहभाग नोंदविला. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत 53.28 टक्के मतदानाच्या टक्केवारीत महिलांच्या मतदानाची टक्केवारी केवळ 47.51 टक्के एवढी आहे. त्यामुळे महिलांनी मतदार होऊन लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभाग घेतलाच पाहिजे. महिला मतदार जागृतीसाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम महिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोग “स्वीप” SVEEP (Systematic Voters Education and Elector Participation) कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. महिला मतदारांची संख्या वाढविणे हा या अभियानाचा एक अविभाज्य घटक आहे. त्यासाठी अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यात होणार आहे. शिवाय उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्या माध्यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाचा हेल्पलाईन नं. 0712-2540094 हा आहे. अथवा www.ceomaharashtra.gov.in या संकेतस्थळाचा उपयोग स्वत: व मैत्रिणीचे नाव मतदारयादीत नोंदणी करण्याकरिता करू शकता. स्त्रियांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सर्वच क्षेत्र खुली आहेत. त्यात आपण आपला ठसा उमटवायचे ध्येय बाळगणे, हेच आपल्या महिला दिनाचे सार्थक असेल. माझे मत बहुमूल्यच पहिल्यांदाच मतदान केल्यानंतर आपण या लोकशाहीचे जबाबदार नागरिक झाल्याचा अभिमान वाटतो. आपले मत किती बहुमूल्य आहे याची जाणीव झाली. माझ्या एका मतामुळे नक्कीच चांगला उमेदवार निवडून येईल. असा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया दिपाली कराळे यांनी दिली. मतदान सर्वश्रेष्ठदान व्हावे ‘मतदान’ हे सर्वश्रेष्ठ दान व्हायला हवे. मी पहिल्यांदाच मतदान केले तेव्हा मला अनेक अनुभव आले. सर्वप्रथम आपण जागरूक नागरिक आहोत याची जाणीव झाली. मतदान करून समाजाला चांगल्या मार्गाकडे नेण्यास मदत करू शकतो, असे मत गौरी दाढी यांनी व्यक्त केले. लेखक - सारिका फुलाडी,माहिती व जनसंपर्क कार्यालय, नागपूर. स्त्रोत - महान्युज