कामकरी माहिलांना आपल्या आवडी निवडी जोपासायला पाहिजे तसा आणि तेवढा वेळ मिळत नाही. घर आणि कामाचा गुंता संपता संपता नाही. अशा परिस्थितीत काही स्त्रीया या आपले काम-कुटूंब सांभाळून आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असतात. असेच एक व्यक्तीमत्व म्हणजे सुजाता नंदेश्वर. सुजाता मुळच्या नागपूरच्या. त्यांनी नागपूरच्याच शासकीय रूग्णालयातून जनरल नर्सींग मीडवाईफ अभ्यासक्रम पुर्ण केला. त्यानंतर दिल्लीतील राममनोहर लोहिया या शासकीय रूग्णालयात 1995 ला रूजू झाल्या. सध्या त्या अतिदक्षता विभागात नर्सींग अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. सुजाताला लहानपनापासून नृत्याची आवड. कुठेही संधी मिळाल्यास उत्फुर्तपणे नृत्य करण्यात सराईत. घरी सहा भावंडांमधून सर्वात लहान सुजाताने नृत्यासारख्या क्षेत्रात 1990 च्या काळात करीयर म्हणून पाहणे म्हणजे न रूचण्यासारखेच. म्हणून त्यांनी नर्सींगचा अभ्यासक्रम पुर्ण केला. मात्र, नृत्याची आवड असल्यामुळे कॉलेजच्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात आयोजन, नियोजन आणि प्रस्तुतीकरणात त्या आघाडीवर असायाच्या. नोकरी लागल्यानंतर दिल्लीत आल्यावर पहिली काही वर्ष तर कामातच गेली. 2000 साली लग्न झाले. जीवनसाथीलाही नृत्यासारख्या क्षेत्रात फारशी आवड नसल्याचे लक्षात आल्यावर आपल्या आवडीला त्यांनी मनाच्या गाठोड्यात बांधून ठेवले. तथापि, वर्ष 2004 च्या परीचारीका दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर करण्याची संधी मिळाली आणि आवडीतून सवडीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. आवडीची सिनेअभिनेत्री ‘माधुरी दिक्षीत’ असल्यामुळे तिच्या प्रत्येक गाण्यावर नृत्याविष्कार करणे म्हणजे सर्वानंद असल्याचा अनुभव होतो, असे सुजाता सांगतात. माधुरीची गाणी वाजली की पाय आपोआप थिरकायला लागतात. यामुळे कॉलेजमध्ये माधुरी दिक्षीत हे टोपण नावच पडल्याची आठवण ताजी करतांना सुजाता प्रफुल्लित होतात. सुजाताच्या या आवडीच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश झाला तो 2010 पासून. केंद्र शासनाचे कर्मिक जनशिकायत व पेंशन विभाग वर्षातून पाच दिवसांचे आंतर-मंत्रालय स्पर्धेच्या माध्यमातून सांस्कृतिक, क्रीडा, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करते. त्यात केंद्र शासनाचे जवळपास 22 विविध मंत्रालय भाग घेतात. यामध्ये आरोग्य विभागाच्या सांस्कृतिक शाखेच्या समन्वयाचे काम मागील सहा वर्षापासून सुजाता सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वात आतापर्यंत आरोग्य विभागाने अनेक पदके पटकावली आहेत. सुजाताला त्यांच्या एकल नृत्यासाठी 2010 पासून सलग सहा वेळा सुवर्ण पदक मिळाले आहे. याशिवाय समुह नृत्यासाठी 3 रौप्य आणि 3 कांस्य पदक मिळाले आहेत. यावर्षीच्या स्पर्धेत तर सुजाता नंदेश्वर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाने एकूण 10 पदक आणि दुसऱ्या क्रमाकांची रनरअप ट्रॉफीही मिळविली आहे. सुजाताचे वय सध्या 44 वर्ष आहे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मात्र, संगीताच्या थापांवर आजही नृत्यविष्कार करतांना भान हरपल्यासारखे नृत्य करतात. त्यांच्या क्षेत्रात असणारी दगदग, दक्षता, सेवाभाव हे सर्व सांभाळून नृत्य ही आवड जोपासून त्यात आपल्यासह आपल्या विभागाचाही नावलौकीक करणाऱ्या सुजाताचे व्यक्तीमत्व प्रेरणा घेण्यासारखेच आहे. सुजाता अवयवदान अभियानातही हिरीरीने भाग घेतात. यासह त्यांना समाजकार्याची आवड आहे. दीनदुबळ्यांना कधीही मदत हवी असल्यास सुजाता नेहमीच पुढे असतात. अशा या सुजाताच्या कलागुणांच्या विकासासाठी सदिच्छा लेखक-अंजू निमसरकर-कांबळे स्त्रोत - महान्युज