रेशीम उद्योगाला असणाऱ्या शासनाच्या पुरक धोरणामुळे तसेच माझे पती रेशीम उद्योगातच मागील पाच वर्षापासून कार्यरत असल्याने त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेने मी रेशीम व्यवसायाकडे वळले… आज तुती लागवड करून माझा रेशीम उद्योग सुरू झाल्याने घर चालविण्यासाठी हातभार लावत असल्याचा मला आनंद आहे… नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सातरगावच्या श्रीमती लतीका हरीदास काकडे सांगतात. दहावी पास असणाऱ्या या महिलेने सन 2014-15 या वर्षात 2 एकर क्षेत्रावर व्ही- 1 या जातीची तुती लागवड करुन रेशीम उद्योग सुरू केला आहे.

त्यांच्या कुटुंबात रेशीम उद्योग खुप दिवसांपासून सुरु आहे. लतिका सांगतात, पती हरिदास रामचंद्र काकडे हे गेली 5 वर्षापासून रेशीम उद्योग करीत असल्यामुळे त्यांची मला या उद्योगात नेहमीच मदत झाली. त्यामुळे या शेतीची मला ओढ निर्माण झाली. म्हणून मी माझ्या नावावर असलेल्या शेतात 2 एकर क्षेत्रावर नव्याने तुती लागवड करण्याचा निर्णय घेतला व रेशीम उद्योग सुरु केलेला आहे. माझे प्रेरणास्थान माझे पती व राज्यशासनाचे जिल्हा रेशीम कार्यालयातील कर्मचारी आहेत. माझे पती व कार्यालय नेहमीच रेशीम शेतीबाबत मला प्रोत्साहन देत असतात.

रेशीम शेती हा व्यवसाय तसा तांत्रिक मुद्यावर आधारीत असून यामधील बारकावे समजून घेणे गरजेचे असते. या उद्योगाच्या यशामध्ये दर्जेदार तुती पाला, तयार झालेल्या पाल्याचा वेळेवर पुरेपुर वापर करणे, पाल्याचा प्रमाणात अंडीपुंज संगोपनासाठी घेणे, अळ्यांच्या कातीच्या वेळा, तापमान, आर्द्रता, स्वच्छता, निर्जंतुकीकरण व कोष व्यवस्थापन अशा गोष्टींकडे गांभीर्याने मी या उद्योगात पाहत असते. त्यामुळेच मी या रेशीम शेतीत यशस्वी होऊ शकले असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

लतिका काकडे म्हणाल्या की, सन 2014-15 मध्ये मी 1000 अंडीपुंजाचे संगोपन केले असून त्यापासून मला 620 किलो रेशीम कोषाचे उत्पादन झाले. मी या कोषांची विक्री कर्नाटक राज्यातील कोष मार्केटमध्ये कोष विक्री केली आहे. सर्वसाधारण वर्षाचा सरासरी दर रु. 250/- प्रती किलो प्रमाणे मिळाला असून मला या कोषविक्रीपोटी 1,48,300 एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या कुटुंबात रोख रक्कम प्राप्त झाली. त्यामुळे माझ्या कुटुंबाची आर्थिक प्रगती झालेली आहे. 2015-16 मधील आज अखेर 600 अंडीपुंजाचे संगोपन केले आहे. त्यापासून कोष उत्पादन 465 कि.ग्र. त्यांची रक्कम रु. 67,500/- दोन पिकांमध्ये प्राप्त झाली आहे. यापुढे मी माहे मार्च 2016 पर्यंत तीन रेशीम कोष उत्पादन घेणार आहे.

मला असे वाटते की, ज्या शेतकऱ्यांच्याकडे ओलिताची शेती आहे, अशा शेतकऱ्याने आपल्याकडे किमान 1 एकर क्षेत्रावर तुती लागवड करुन रेशीम उद्योग सुरु करावा व आपली आर्थिक उन्नती करुन घ्यावी. याकरीता शासनाच्या विविध योजनांमधुन शेड बांधणी, तुती लागवड, ठिबक सिंचन, गांडुळखत, साहित्य पुरवठा प्रशिक्षण इत्यादी अनुदान दिले जाते. कोष विक्रीच्या उत्पन्नाबरोबर अनुदानाचाही लाभ शेतकऱ्यांना घेता येतो.

लेखक: सागर राणे, जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती

माहिती स्रोत: महान्यूज