नुसतीच बचत करणे हे कोणत्याही बचत गटाचे उद्दिष्ट असता कामा नये. थेंबे थेंबे तळे साचते तसे पै पै जमवून छोटया छोटया बचतीतून पैसे जमवायची चांगली सवय लागते. ही सवय जर मुरली, तरच टिकून राहते आणि परिणामी नुसतीच पैशाचीही जाणीव होते असे नाही, तर इतर व्यवहारामध्येसुद्धा डोळस वृत्ती निर्माण होते. महिला बचतगटांनी बचतीचा पैसा एकमेकींच्या कमी हा प्राथमिक उद्देश मानावा. पण बचतीची रक्कम जसजशी वाढत जाईल तसं या रकमेचा उपयोग अधिक चांगल्या पद्धतीने गटाच्या सर्व सदस्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी कसा करता येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे. महिला गट एकत्र आले तर चमत्कार घडवून आणू शकतात. आपल्या भागात होणारी पिके, आपल्या गरजा, उपलब्ध भांडवल तसेच या भांडवलावर गटाच्या आठीक ताकदीवर आधारित बाहेरून मिळवता येणारे अर्थसहाय्य यांचा एकत्रितपणे विचार करावा. यातून अनेक छोटया छोटया उदयोगसंधी, उत्पन्न देणारे मार्ग दिसून येतील. एक महत्त्वाचे सांगावेसे वाटते, की महिलांनी एकत्र येऊन उदयोग करायचा किंवा वैयक्तिक पातळीवर उदयोग करायचा म्हटले, की नजरेसमोर येणारे नेहमीचे उदयोग बाजूला ठेवा. ते म्हणजे पापड, लोणचे, मसाले, याच्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा विचार सुरु करा. आपोआपच महिला गट सुरु करू शकतील व त्यांना जमतील असे असंख्य उदयोग नजरेसमोर येतील. महिला गटाच्या प्रत्येक बैठकीमध्ये यावर विचार करा. बाहेरच्या लोकांचीही मदत घ्या व तुम्ही करू शकाल असा आत्मविश्वास वाटतो अशा उदयोगांची यादी बनवा. ही यादी पुढील विषयांवर तपासून पहा. - किती रुपये गुंतवावे ? - तेवढे रुपये जमा करणे (स्वतःचे पैसे, कर्ज) शक्य आहे का? उद्योगासाठीची बाजारपेठ कुठे आहे? (कोणत्या वस्तू किंवा सेवा तुम्ही पुरवणार आहात) - उदयोगासाठी आवश्यक मशिनरी, कच्चा माल व प्रक्रिया यांची माहिती मिळवा व ते आपल्या आवाक्यात आहे का, याचा विचार करा. - उदयोगासाठी आवश्यक प्रशिक्षण वरील बाबी या प्राथमिक स्वरुपात दिल्या आहेत. महिला बचत गटांना व सहभागी महिलांना अजून खूप अंतर जायचे आहे. सुरुवात आत्मविश्वासाने करा व यश मिळवा, हीच शुभेच्छा ! बचत केली पैशाची, कामी आली वेळेवर घरची लक्षुमी सुखी झाली, सगळी जण कामाला आली. लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट स्त्रोत : थेंबे थेंबे तळे साचे - पुस्तिका