संयुक्त महिला समिती आम्ही भोयरे येथील महिला. आमचे गाव अनेक वाड्यावस्त्यांमध्ये विखुरलेले आहे. कोणतेही काम करायचे म्हटले तर आमच्या महिला समाजसेविका ह्यांना सर्व वाड्यावस्त्या पायाखाली तुडवाव्या लागायच्या. आम्ही पण महिला सामुदायिक मिटिंग म्हटले की, टाळाटाळ करायचो. कोणताही निर्णय घ्यायचा असला तर त्यामध्ये निर्णय होण्याऐवजी गोंधळच जास्त व्हायचा व कोणताही निर्णय न होता महिला निघून जायच्या. त्या वेळी काही करू शकत नव्हतो. प्रत्येक वेळेस ह्या प्रश्नांना सामोरे जावे लागायचे. कामापेक्षा शारीरिक श्रमच भरपूर व्हायचे. ती म्हण आहे बघा ‘गाढव मेलं ओझ्यानं, अन शिंगरू मेलं हेलपाट्यानं’ अगदी तशीच गट व्हायची. एवढ करूनही आमच्या महिला काही एकत्र येत नसत व काही गटांना तर माहितीच व्हायची नाही. यावर काही तरी पर्याय करावाच लागेल. सुरुवातीचा गोष्ट वेगळी होती. आपण नवीन होतो बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या पण तसेच किती दिवस चालणार? आम्ही महिलांनी विचार केला की, आपल्या गटाला आपण स्वयंसाहाय्य गट म्हणवतो ना, मग आपल्या गटाची जबाबदारी आपणच घ्यायची. ह्या विषयावर चर्चा केली पण जबाबदारी घ्यायची म्हणजे नेमके काय करायचे? हेच काही कळत नव्हते. मग संस्थेच्या सर्व लोकामध्ये विचार झाला की, खरच काही तरी उपाय ह्या वर शोधलाच पाहिजे. त्यावर संस्थेने त्यांना सुचविले की, प्रत्येक गटाचे कामकाज पार पाडण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे प्रत्येक गटाची, त्याप्रमाणेच प्रत्येक गटातील कोणत्याही दोन जबाबदार व्यक्ती व संस्थेचा प्रतिनिधी (अथवा कार्यकर्ता) यांची एक समिती तयार करायची... ही कल्पना सर्वांनीच आवडली. सर्व गटांतील महिलांनी तयारी दर्शविली. ह्यामुळे वेळही वाचेल, निर्णय देखील लवकर घेता येतील व सर्वांचा त्रास वाचेल. प्रत्येक गटातील प्रतिनिधी गटाचा आढावा समितीच्या बैठकीमध्ये घेतील. गटाच्या अडीअडचणी मांडतील व ही समिती ते सोडविण्याचे काम करील. त्यानुसार आमच्या गावात पाच गट होते. त्या प्रत्येक गटातील २ व्यक्ती व १ संस्थाप्रतीनिधी (मार्गदर्शन करण्याकरिता) अशी ११ लोकांची संयुक्त समिती तयार करण्यात आली. ह्या समिती मार्फतच गावामध्ये सामाजिक व आर्थिक उपक्रम राबविता येतील, अशा रीतीने ही समिती काम करेल, परंतु समितीला नाव काय ठेवायचे त्यावर देखील चर्चा झाली. त्यामध्ये मग सर्व गट एकत्रित आल्यामुळे ह्या सर्व गटांचा त्यामध्ये सहभाग असल्यामुळे व संयुक्तपणे काम करण्याकरिता त्याचे नाव ‘संयुक्त महिला समिती’ असे ठेवण्यात आले, ह्या संयुक्त समितीच्या कल्पनेने जणू काही गावामध्ये महिलांची एक पत शक्तीच निर्माण झाल्या सारखी वाटते. आज ह्या संयुक्त समितीमुळे गावामध्ये आर्थिक व सामाजिक उपक्रम जोरात चालू आहेत. आपणही आपल्या गावात अशा प्रकारची महिला शक्ती उभारू शकता. अशी तयार झाली आमची संयुक्त महिला समिती. लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका