संसार माझा उभा राहिला कांता : अग काय करतीस? झालं नाही का तुझ काम? मिटींगला उशीर होतौ चल लवकर. शांता : थांब झालंच बघ. कांता : किती बरं झालं! आपण स्वयंसाहाय्य गटाचे सभासद आहोत. गटामध्ये आपण आपल्या अडीअडचणी एकमेकींना सांगत असतो. चार गोष्टी बोलतो. मन मोकळे होतं बघ, अन् सुखदुःखाच्या वेळी एकमेकींना मदत देखील करतो. शांता : खरंच बाई दुखाच्या वेळी जर कुणी मदत केली तर माणसाचा कितीतरी भार हलका होतो. कांता : तुला वेहळे गावात घडलेली घटना माहीत आहे का? शांता : नाही ग बाई. कांता : भारतीबाईची परिस्थिती अगदी बेताचीच, रोज मोलमजुरी करून संसाराचा गदा चालवायची, त्यातून थोडीफार बचत पण करायची आणि विशेष सांगायचा म्हणजे ती सावित्री स्वयंसाहाय्य गटाची सदस्य होती. शांत : मग म्हणजे ती आपल्या सारखीच की, पण असे घडले तरी काय तिच्या बाबतीत, तवा तू मला सांगायला लागलीय? कांता : अग ऐकना सांगते, एक दिवस अचानक तिच्या घराला आग लागली. त्यामध्ये तिचा अख्खा संसार जळून खाक झाला की, ही बातमी गावामध्ये हा हा म्हणता वाऱ्यासारखी पसरली. सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन मदत केली. पण ती काही पुरेशी झाली नाही. शांता : आता एवढं नुकसान झाल्यावर मदत तर करायलाच पाहिजे. देवा कोणावर नको आणू बाबा अशी वेळ? कांता : खरचं, गावात मदत केली, पण ती ज्या स्वयंसाहाय्य गटाची सदस्य होती त्या गटाकडे ती गेली व घरातील जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तिने गटाकडून कर्ज घेतले. कमी व्याज दराने कर्ज ही मिळाले व कोणाकडे हात पसरण्याचीही तिच्यावर वेळही आली नाही. आणि गटाने ही स्वखुशीने त्यांच्या मानाने मदतीचा हात पुढे केला. शांता : खरंच ग बाई, अशा वेळी जर कुणी मदत केली तर माणसाला खूप मोठा आधार मिळतो. कांता : बघ बरं तिला मदत देखील मिळाली आणि तिने जी काही बचत केली त्याचा फायदा तिला संकटकाळी झाला. शांता : तिला मिळालेली मदत, शिवाय तिने केलेली बचत यामुळे तिचा संसार पुन्हा उभा राहिला. कांता : आता कळालं न तुला मी का तुला घाई करत होते ते, शांता : खरंच बाई कांता : अग हा गट नुसता बचतीचा ठेवा नाही तर अडीअडचणीमधून संकटामधून बाहेर पडण्याचा एक चांगला मार्ग आहे. शांता : अगोदर आपल्या महिलांमध्ये एक म्हण होती, “बाई आणि बैल सारखेच आहेत.” पण आता बैल नाही वाघिणी आहोत. ह्या गटाने आपल्याला एवढं धाडस दिलं, अन् एकमेकींच्या अनुभवांनी नवीन जीवनपण दिलंय बघ. आपल्या स्वयंसाहाय्य गटामुळे आपला संसार चांगला चालला आहे, त्याबद्दल स्वयंसाहाय्य गटाची जय !!! लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका