मध्य ऑस्ट्रेलियातील अरांडा बोली बोलणारी एक जमात. अन्नसंशोधनार्थ सतत भटकत असल्यामुळे या जमातीचे पाच उपविभाग झाले आहेत. या उपजमातींच्या बोली, समाजसंघटना व धर्मविधी यांत बरीच भिन्नता आढळते. प्रत्येक उपजमात आपणास मूळ जमात समजते. या जमातीत बूमरँग, लाकडी भाला व भाला फेकण्यासाठी एक विशेष प्रकारचे आयुध ही हत्यारे प्रमुख्याने आढळतात.

सामाजिक संघटनेत वर्गात्मक नातेपद्धती प्रामुख्याने आढळते. आतेमामेभावंड विवाह होतात. बहुपत्नीविवाह प्रचलित आहे. जमातीत वेगवेगळ्या कुळी असतात व त्यांची वेगवेगळी गणचिन्हे असतात.

आरूंटांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. त्यामुळे गणचिन्हांशी व पूर्वजपूजेशी संबंधित बरेच धर्मविधी प्रचलित आहेत. धर्मविधींत भाग घेण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते व ती केवळ पुरुषांनाच देण्यात येते. जमातीच्या प्रमुखाला इंकाटा म्हणतात. हे पद वंशपरंपरागत असते. इंकाटाजवळ चुरिगा नावाची एक विशेष अतिमानवी शक्ती असते, अशी आरूंटांची समजूत आहे.

आरूंटांची कला प्रामुख्याने भौमितिक व सांकेतिक स्वरूपाची आहे. धार्मिक उत्सवप्रसंगी त्यात भाग घेणार्यांच्या अंगावर वरील प्रकारचे विविध आकार रेखाटतात. आधुनिक काळातील आरूंटा कलाकारांनी जलरंगांतील निसर्गचित्रे रंगविण्यातही प्रावीण्य मिळविले आहे.

आरूंटा प्रेताचे दफन करतात. लहान मुलांचे, वृद्ध माणसाचे किंवा हत्यारांच्या आघातांनी आलेले मृत्यू सोडले; तर इतर मृत्यू जादू किंवा तत्सम करणीमुळे झाले, अशी त्यांची समजूत आहे.

गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांत आरूंटांची संख्या घटत होती, पण १९६० पासून वैद्यकीय सोयीमुळे ती थांबली आहे.

लेखक : रामचंद्र मुटाटकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश