महिला बचत गटाच्या सदस्यांनी घेतलेल्या पुढाकाराने आणि केलेल्या जागृतीमुळे दरी गाव हागणदारीमुक्त झाले असून ‘स्वच्छ भारत’ अभियानात गावाने चांगली कामगिरी केली आहे. अनेक उपक्रमांच्या माध्यमातून ही कामगिरी अधिक उंचावण्याचा प्रयत्न होत आहे. साधारण दोन हजार आदिवासी लोकसंख्या असलेल्या या गावात प्रत्येक घराजवळ शौचालय दिसते. यासाठी माजी सरपंच मोतीराम आचारी यांच्या मार्गदर्शनाखाली 2007 पासून प्रयत्न सुरू करण्यात आले. ग्रामपंचायतीने शौचालयासाठी बेस तयार करण्यास जनतेला प्रोत्साहित करण्याबरोबर अनुदानही दिले. गावात 10 बचत गट असून प्रत्येक कुटुंबातील किमान एक महिला बचत गटात सदस्य आहे. महिला बचत गट सदस्यांनी सर्वप्रथम याचा उपयोग करीत शौचालयाचे बांधकाम करून घेतले. स्वत: शौचालय उभारताना इतरही महिलांना त्यांनी शौचालयासाठी प्रोत्साहित केले. त्याचा अपेक्षित परिणाम होऊन आज गावात 100 टक्के कुटुंबांकडे शौचालय असून गाव हागणदारीमुक्त झाले आहे. गावात भूमिगत गटारींचे 50 टक्के काम झाले असून उर्वरित काम मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. याशिवाय सांडपाणी व्यवस्थापनासाठी 40 शोषखड्डे करण्यात आले आहेत. सहा लाख रुपये खर्च करून अंतर्गत पक्के रस्ते तयार करण्यात आले आहेत. घरात स्वच्छ पाण्याचा उपयोग, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व, सांडपाण्याचा उपयोग, लसीकरण आदी संदेश घरोघरी पोहोचविण्यासाठीही महिला बचत गटांनी पुढाकार घेतल्याने गावात गेल्या पाच वर्षांत संसर्गजन्य रोगापासून गाव मुक्त आहे. स्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण कमी झाल्याचे गावात शिबीरासाठी येणारे एनएसएसचे विद्यार्थी सांगतात. त्यांनीदेखील वार्षिक शिबीराच्या माध्यमातून गावात स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच पाण्याचे नमुनेदेखील दुषित आढळलेले नाहीत, अशी माहिती ग्रामसेवक डी.पी. गांगुर्डे यांनी दिली. गावातील सांडपाणी नालीद्वारे एका ठिकाणी आणून तेथे कर्दळ लागवड करण्यात आली आहे. त्या माध्यमातून तीन जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. राष्ट्रीय सण, गांधी जयंती आदी प्रसंगी महिला गावातून स्वच्छता फेरी काढतात. सार्वजनिक स्वच्छतेसाठी कंपोस्ट खड्डे आणि कचरा कुंडीचा उपयोग करण्यात येतो. गावाने यापूर्वीच निर्मलग्राम, पर्यावरण विकासरत्न, महात्मा गांधी तंटामुक्त गाव, यशवंत पंचायत राज, पंचायत सबलीकरण असे विविध पुरस्कार मिळविले आहेत. गावात डिजीटल शाळेची संकल्पना राबविताना संगणक आणि प्रोजेक्टरचा उपयोग करण्यात येतो. डिजीटल अंगणवाडीतही दृकश्राव्य माध्यमाचा उपयोग करण्यात येतो. गावाने हरियाली पाणलोट क्षेत्र आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाचेही चांगले काम केले आहे. यावर्षी लोकसहभागातून नाला खोलीकरण करण्यात आले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने कमी वजनाच्या मुलांसाठी आवश्यक वॉर्मरसारखे यंत्र उपलब्ध करून दिले आहे. केंद्राला आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला आहे. एकूणच गावाला स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने सुरू झालेले हे प्रयत्न आता गावाच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने अधिक व्यापक होत आहेत. गावाला प्लास्टिकमुक्त करण्याची इच्छा महिलांनी बोलून दाखविली. गावाचे नाव संपूर्ण राज्यात पोहोचविण्याचा त्यांचा निश्चय आहे. गजराबाई लहानगे, सरपंच गावात स्वच्छतेमुळे रोगराई, बालमृत्यु किंवा इतर आजार नाही. महिला गटांनी सर्वप्रथम शौचालय बांधून इतरांनाही बांधण्यास प्रोत्साहित केले. यापुढे अभियानात सातत्य ठेवताना गाव अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी प्लास्टिकबंदी करण्याचा विचार आहे. स्वच्छता आणि विकासाच्या बाबतीत महिला एक आल्याने हा बदल झाला आहे. इंदू पवार गावातील महिलांना पिण्याचे पाणी उंचावर का ठेवावे, शौचालय नसल्याने कोणते दुष्परिणाम होतात, परसबागेचा उपयोग आदी सर्व बाबी आता कळल्या आहेत. त्या इतरांनाही त्याचे महत्व पटवून सांगतात. याशिवाय शिक्षक दररोज शाळेत येतात का, मुलींचे शिक्षण याबाबतही महिला जागरूक असल्याने गावाचा शैक्षणिक स्तरही उंचावतो आहे. मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दरी गावाने चांगली कामगिरी करून इतरही गावासमोर आदर्श निर्माण केला आहे. या गावाप्रमाणेच इतरही गावात ‘स्वच्छ भारत’ अभियानाला गती देण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी तसेच त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. लेखक - डॉ.किरण मोघे,जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक. स्त्रोत - महान्युज