आभाळ ढगांनी गच्च भरलं होतं. कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल असं वातावरण असतांना लांजा तालुक्यातल्या वेरळच्या दिशेने निघालो. निमित्त होतं स्मार्ट ग्रामपंचायत पाहण्याचं.

लांजा तालुक्यातील वेरळ ग्रामपंचायत रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली स्मार्ट ग्रामपंचायत ठरली. या ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय 40 लाखांचे पारितोषिक जाहीर झाले. स्वच्छ गांव म्हणून वेरळची यापूर्वी ख्याती होती. त्यात हा एक मानाचा तुरा रोवला गेला. प्रत्यक्ष हे सर्व समोर दिसत होतं.

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे 9 स्मार्ट ग्रामपंचायतीपैकी वेरळने सर्वाधिक गुण मिळवले. या ग्रामपंचायतीला 100 पैकी 74 गुण पाहणीत मिळाले. मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि त्याच्या समितीने ग्रामपंचायतींना भेटी दिल्या होत्या. असेही लक्षात आले की, वेरळ गावात एलईडी बल्बचा वापर केला जातो. घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे देखील आहेत. वनराई बंधारे, विविध दाखल्यांसाठी ऑनलाईन सेवा-सुविधा, यासह शाळा डिजिटल देखील झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याने संपूर्ण गावात लक्ष ठेवले जाते हे विशेष होय. जिल्ह्यातील पहिली मोफत वायफाय सेवा देणारी म्हणून वेरळ ग्रामपंचायतीची ओळख आहे. पंचायतीची पाणपट्टी आणि घरपट्टीची वसुलीही शंभर टक्के आहे. सर्व शासकीय कार्यालयात स्वच्छतागृह आणि शंभर टक्के शौचालयांचा वापर केला जातो. वेरळ गाव स्मार्ट करण्यासाठी सरपंच सोनाली मेस्त्री, उपसरपंच दिनेश पातेरे, ग्रामसेवक प्रशांत डावरे, ग्रामपंचातीचे सदस्य तसेच ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान आहे. गावकऱ्यांची साथ मिळाल्याने गाव खरोखर स्मार्ट वाटते.

21 नोव्हेंबर 2016 पासून स्मार्ट ग्राम योजनेची सुरुवात झाली. पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेचे रुपांतर करून ही स्मार्ट ग्राम योजना सुरू झाली. त्यानुसार स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण पारदर्शकता व तंत्रज्ञान या साऱ्या बाबींचा विचार करुन तालुक्यात प्रथम येणाऱ्या स्मार्ट ग्रामपंचायतीला 10 लाखांचे, तर जिल्ह्यात प्रथम येऊन स्मार्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायतीला 40 लाखांचे पारितोषिक शासनातर्फे देण्यात येते.

लांजा तालुक्यात वेरळ ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकाविला व आता जिल्हास्तरावरही प्रथम त्यामुळे बक्षिसांचे 50 लाख रुपये ग्रामपंचायतीने मिळवले आहेत. वेरळ ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब आदींनी केलं.

स्मार्ट ग्रामपंचायत योजनामुळे आता गावागावात स्पर्धा सुरु झाली आहे. डिजिटल महाराष्ट्र, डिजिटल इंडिया हे स्वप्न आता गावपातळीवर दिसू लागले आहे. प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचे स्वप्न यामुळे साकार होतेय. रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. भविष्यात वेरळ ग्रामपंचायतीला भेट देणाऱ्यांची संख्याही यामुळे वाढीला लागणार आहे.

वेरळ स्मार्ट ग्रामपंचायत गावाला भेट देऊन परतीचा प्रवास सुरु केला तेव्हा पाऊस सुरु झाला होता. सार्वजनिक सुट्टी असल्याने पावसाचा आनंद घेत परत फिरलो! पुन्हा एक नवीन स्मार्ट ग्रामपंचायत पाहण्याच्या ओढीने.

लेखक: डॉ.गणेश व.मुळे

माहिती स्रोत: महान्युज