औरंगाबाद महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर हे मागील काही दिवसांपासून जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा घेत असून त्या माध्यमातून मराठवाडा विकासात्मक विविध कार्यक्रम विशेष मोहिम स्वरूपात राबविणेबाबत जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावरील प्रशासकीय यंत्रणेला दिशा दाखवून मार्गदर्शन करत आहेत. त्यातून प्रशासकीय यंत्रणा अधिक गतीमान करून ग्रामस्तरावरील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

लातूर शहरातील स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात नुकतेच विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांच्या हस्ते एक दिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन झाले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व यंत्रणाचे सुमारे आठशे ते एक हजार अधिकारी व कर्मचारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने स्वागताचा सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर डॉ. भापकर यांनी माईकचा ताबा घेतला आणि पुढील दीड तास राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनाच्या अनुषंगाने त्यांचे मार्गदर्शन सुरू झाले.

डॉ. भापकर यांचा प्रत्येक शब्द, वाक्य व समोर बसलेल्या अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना विषय व योजनांच्या अनुषंगाने विचारण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नातून शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळाला पाहिजे. तसेच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गतीने चालना मिळाली पाहिजे याबाबतची तळमळ डॉ. भापकर यांच्या मार्गदर्शनातून दिसून येत होती.

रोजगार हमी योजनंचे जनक असलेले महाराष्ट्र राज्य हे केंद्र शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांच्या अंमलबजावणीत खूप मागे असून यामुळे राज्यातील विशेषत: मराठवाडा विभागातील गरजू लोकांना याचा लाभ मिळत नसल्याची खंत डॉ. भापकर यांना वाटत आहे. त्यामुळे मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात 31 मार्च 2018 पर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत 10 हजार कोटीचा निधी खर्च करण्याचे नियोजन असून त्याकरिता प्रशासकीय यंत्रणेने याअंतर्गत ग्रामस्तरावरून जास्तीत जास्त कामे प्रस्तावित करून मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचे त्यांनी केलेले आवाहन हे या भागातील लोकांच्या सर्वांगीण विकासाला अत्यंत पोषक ठरणार आहे.

कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी ग्रामविकासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रशासकीय यंत्रणेने चांगल्या पद्धतीने योजना राबवून सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला पाहिजे त्यामुळे आपल्याला ही एक प्रकारचं समाधान मिळते व तेच समाधान नैसर्गिक असतं, या डॉ. भापकर यांच्या आवाहनातून प्रशासकीय यंत्रणेला आत्मिक गती देण्याचं काम झालेले आहे, असे मला वाटतं.

प्रत्येक ग्रामसंपर्क अधिकारी हा त्या गावाचा पालक अधिकारी असून त्यांनी त्या गावांतील सर्व लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या योजनांची माहिती देऊन त्या योजनांचा शंभर टक्के लाभ त्यांना मिळवून दिला पाहिजे. ग्रामसंपर्क अधिकाऱ्यांने त्या गावासाठी नोडल अधिकारी म्हणून आपली भूमिका पार पाडावी, याबाबत डॉ. भापकर यांनी केलेले मार्गदर्शनामुळे संबंधीत ग्रामसंपर्क अधिकारी यांना त्या गावांमध्ये काम करण्यास नक्कीच उत्साह निर्माण झाला याबाबत मला खात्री वाटत आहे.

ग्रामीण भागासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच ग्रामपंचायतींच्या सरपंचानाही प्रशिक्षण देण्याच्या केलेल्या नियोजनातून डॉ. भापकर यांची ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची ओढ दिसून आली.

समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान मनरेगा, सिंचन विहीर, स्वच्छ भारत मिशन, सातबारा संगणकीकरण, ईपॉज मशीद्वारे धान्य वितरण आदी योजनांची सविस्तर माहिती देऊन राज्यात मराठवाडा कोठे आहे व त्यात लातूर जिल्ह्याची स्थिती कशी आहे? व या सर्व योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना एक चांगली दिशा दाखवून त्यांच्या कामाबद्दल करून गतिमानता आणण्यासाठी डॉ. भापकर यांनी एकदिवशीय शिबिराच्या माध्यमातून केलेला हा प्रयत्न पुढील काळात यशस्वी होणारच याबाबत मला खात्री वाटत आहे.

लेखन: सुनील सोनटक्के

जिल्हा माहिती अधिकारी

लातूर

माहिती स्रोत: महान्युज