शेती फायद्याची करायची असल्यास त्याला पूरक व्यवसायाची जोड गरजेची ठरते. शेती क्षेत्रातील यशाचा हा मंत्र लक्षात आलेली विदर्भातील युवा शेतकऱ्यांची फळी आता त्याच रस्त्याने वाटचाल करु लागली आहे. चिंचोली बु. (ता. अंजनगावसूर्जी, अमरावती) येथील अमोल घोगरे यांचाही त्यामध्ये समावेश आहे. बॅंकेने कर्ज नाकारल्यानंतर मोठ्या हिमतीने स्वबळावर या युवकाने शेतमाल प्रतवारी आणि तूर प्रक्रिया उद्योगाची उभारणी केली. कमी भांडवल असतानाही या उद्योगात अमोलने रोवलेले पाय निश्चीतच इतरांसाठी एक नवी प्रेरणा ठरणार आहेत.

शेतकरी उत्पादक कंपनीची उभारी

चिंचोली येथील अमोल घोंगरे यांनी पारंबी फार्मर प्रोड्युसर कंपनीची उभारणी केली आहे. पाच जणांचे संचालक मंडळ त्यासोबतच तीनशे भागधारक आहेत. त्यावेळी शेतकरी उत्पादक कंपनी आणि वैयक्तीक अशा दोन्ही स्तरावर उद्योग उभारणीकरीता अनुदान होते. अमोलने वैयक्तीकस्तरावर दालमिल उभारण्याचा निर्णय घेतला. इंदू दालमिल नावाने त्यांचा हा व्यवसाय आहे. 2016-17 या वर्षात त्यांनी या उद्योगाची पायाभरणी केली. आपल्या आईच्या नावे त्यांनी हा उद्योग उभारला आहे.

स्वतःच उभारला पैसा

या युनिटच्या उभारणीवर यंत्रासाठी साडेतीन लाख रुपये तर मशीनसाठी असलेल्या शेडकरीता पाच ते साडेपाच लाख रुपयांचा त्यांचा खर्च झाला. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातून या उद्योगाकरीता अनुदानही मिळाले आहे. अमोलचा उत्साह पाहता आत्माचे प्रकल्प संचालक अंबादास मिसाळ तसेच कृषी पणन तज्ज्ञ गणेश जगदाळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

ग्रेडींग व्यवसायातून प्रक्रियेत भरारी

सुरवातीला त्यांनी डाळवर्गीय शेतमालाच्या ग्रेडींग व क्लीनींग व्यवसायात नशीब आजमावले. 50 किलोच्या बारदान्यात (पोत्यात) भरुन तो शेतमाल संबंधीला दिला जात होता. शेतकरी व व्यापारी अशा दोघांकरीता ही सुविधा होती. ग्रेडींग व क्लिनींग करण्याकरीता शेतमाल खरेदी केला जायचा. त्यानंतर त्या शेतमालाची क्लिनींग, ग्रेडींग करुन तो व्यापाऱ्याला विकण्यावर त्यांचा भर होता. प्रक्रियेवरील खर्च वजा जाता सरासरी तीन टक्के उत्पन्न यातून मिळत होते, असे अमोल सांगतो. काही व्यापाऱ्यांव्दारे चांगल्या प्रतीच्या धान्याची विक्री त्यांच्या दुकानातून होते. त्यांच्याकडून अशा शेतमालाला मागणी होती, असे अमोलने सांगीतले. वर्षाला तूर, हरभरा, सोयाबीन या शेतमालाचे प्रत्येकी 100 मेट्रीक टनापर्यंत क्लिनींग ग्रेडींग होत असे. यावर्षी देखील त्यांनी यावर भर दिला आहे.

तूरडाळ उद्योगासाठी पुढाकार

2016-17 या वर्षात महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प अंतर्गत कृषी उद्योजकता विकास कार्यक्रमातून त्यांनी अनुदानावर दालमिलची उभारणी केली. स्वयंचलीत पध्दतीची ही हायटेक दालमिल आहे. याची 19 लाख रुपयांची यंत्रसामुग्री आहे. वीज जोडणी, बांधकाम व इतर कामांवर सुमारे 25 लाख रुपयांचा खर्च झाला. काळीची जमीन असल्याने बांधकामापूर्वी त्यांना खालचा पाया मजबूत करावा लागला. त्यासाठी जास्त खर्च करावा लागला, असे ते सांगतात.

दरदिवशी प्रक्रिया

साडेतेरा टन तूरीवर दरदिवशी प्रक्रिया करण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. या माध्यमातून 120 क्विंटल दर दिवशी तूरडाळ मिळू शकते. त्याकरीता मजूर, वीजेची उपलब्धता हे घटक प्रभावी ठरतात, असे अमोल घोगरे यांनी सांगीतले.

तूर दया आणि डाळ घ्या !

ग्रामीण भागात त्यांनी अभिनव योजना राबविली. कच्चा माल शेतकऱ्यांकडून घेत शेतकऱ्यांना तूरडाळ दिली जात होती. व्यापाऱ्यांना विकलेल्या प्रक्रिया केलेल्या शेतमालाचे पैसे 30 दिवसानंतर मिळतात. याला धारा असे म्हटले जाते. व्यापाऱ्याला माल पोचल्यानंतर तो पेमेंट 30 दिवसांनी करतो. या काळात दालमिल उद्योग चालविण्यासाठी पैशाची सोय कशी करावी, असा प्रश्न त्यांना पडत होता. त्याकरीता त्यांनी अभिनव फंडा अवलंबीला. एका छोट्या मालवाहू वाहनावर त्यांनी बॅनर लावले. तूर दया आणि डाळ घ्या ! असे त्यावर नमुद होते. याच वाहनात तूरडाळ ठेवली जात होती आणि इलेक्ट्रॉनीक वजनकाटा ठेवला जायचा. शेतकऱ्यांकडून एक क्विंटल तूर घेऊपन त्यांना प्रक्रियेअंती मिळणारी 62 ते 63 किलो तूरडाळ दिली जात होती. चुरी आणि भुश्यावर मात्र त्या शेतकऱ्याचा अधिकार राहत नव्हता. चुरी आणि भुसा शेतकऱ्यांला हवा असल्यास त्याला 500 रुपये प्रती क्विंटल प्रमाणे पैसे दयावे लागत होते. या माध्यमातून प्रक्रियेकामी लागणाऱ्या कच्चा मालाची उपलब्धता होत होती आणि उद्योग बंद पडत नव्हता. 2600 क्विंटल तूर आणि हरभरा असा कच्चा माल त्यांनी या अभिनव फंड्यातून गत हंगामात उपलब्ध करुन घेतला. गेल्यावर्षी तीन वाहने या उपक्रमासाठी होती. यावर्षी त्यात दुप्पटीने वाढ करीत ही वाहने सहा राहतील, असे ते सांगतात. या वाहनावर चालकासह एक मदतनीस राहतो. याप्रमाणे 12 जणांना रोजगाराची उपलब्धता होईल. दालमिल उद्योगाच्या ठिकाणी पाच मजूरांना रोजगार उपलब्ध होतो. डिसेंबर ते जून या कालावधीत हा उद्योग चालतो.

शेतीतही प्रयोगशीलता

घोगरे कुटूंबीयांची 13 एकर शेती. या शेतीत कांदा लागवडीवर त्यांचा भर राहतो. सोयाबीन, कपाशी, तूर यासारखी पीकेही घेतात. सिंचनाकरीता दोन बोअरवेलचा पर्याय त्यांच्याकडे आहे. खारपाणपट्टयाच्या सिमेवर असल्याने त्यांच्या बोअरवेलला खारे पाणी आहे. त्यामुळे पिकाला पाणी देण्यावर देखील मर्यादा असल्याचे त्यांनी सांगीतले. कांदा दोन ते तीन एकरावर लावण्यावर त्यांचे सातत्य आहे. अडीच एकरात त्यांना 600 क्विंटल कांदा उत्पादकता मिळाली. परंतू कांद्याला दर नसल्याने त्यांनी पुढील वर्षीपासून कांदा पिकापासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला. चुरीला 14 ते 16 रुपये किलोचा दर मिळतो, स्थानिक पशुपालकांकडूनच पशुखाद्य म्हणून याला मागणी राहते. अंजनगासुर्जी, दर्यापूर आणि अकोट (ता.अकोला) या भागातील पशुपालक चुरी घेऊन जातात.

अनुकरण करण्यासारखे काही...

- वर्षभर कच्चा मालाच्या उपलब्धतेकरीता तूर दया आणि डाळ घ्या योजना.

- बॅंकेने नकार दिल्यानंतर स्वबळावर उभे केले भांडवल.

- गावशिवारातील 18 जणांच्या रोजगाराची झाली सोय.

- शेतकऱ्यांचाही वाढता प्रतिसाद

- हायटेक दालमिलमध्ये मजूरांची गरज कमी.

- मजूरांची संख्या जेमतेम असल्याने पैशाची बचत.

प्रयोगशील अमोल घोगरे यांचा संपर्क क्र. 9404338732 असा आहे.

शब्दांकन - दत्ता इंगोले, जुन्या ग्रामपंचायत जवळ, पो. मोठी उमरी, ता. जि. अकोला. 7588764056

माहिती स्रोत: महान्युज