• जिल्हयातील 1929 स्वस्त धान्य दुकानापैकी 1924 दुकानात बसविण्यात आले पॉस मशिन

• जिल्ह्यात अंत्योदय योजनेतंर्गत कार्डधारकांची संख्या 1 लाख 37 हजार 543 आहे.

• पिवळे कार्डधारक (बीपीएल) लाभार्थ्यांची संख्या 4 लाख 64 हजार 974 तर

• केसरी कार्डधारक (एपीएल) लाभार्थ्यांची संख्या 2 लाख 79 हजार 284 इतकी आहे.

सार्वजनिक वितरण प्रणालीव्दारे होणारे धान्य वितरण हे योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचले की नाही. याचा माग घेणे कठीण असल्याने, अनेक लाभार्थी लाभापासून वंचित रहात असल्याच्या तक्रारी अनेक वर्षापासून आपण ऐकत होतो. यावर शासनातर्फे पॉस मशिनचा तोडगा काढण्यात आला आहे. जळगाव जिल्हयात सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक गतीमानता व पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. जिल्हयातील 1929 स्वस्त धान्य दुकानापैकी 1924 स्वस्त धान्य दुकानात पॉस मशिन बसविण्यात आले आहेत. हे मशिन लाभार्थ्यांच्या माहितीसह आधारलिंक केलेले आहे.

शासनाकडून लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरीत केली जाते. त्याआधारे एका कुटुंबाच्या शिधापत्रिकेवरील ज्या लाभार्थ्यांची आधार नोंदणी झाली असेल अशा लाभार्थ्यांपैकी कुणाचीही बायोमेट्रिक नोंदणी या मशिनवर करता येते आणि त्यांनतरच त्यास धान्य व अन्य लाभ दिले जातात. ही बायोमेट्रीक हजेरी झाल्यानंतर त्या कुटुंबाच्या शिधापत्रिके संदर्भातील सर्व माहिती डिस्प्ले होते. त्यानंतर संबंधित लाभार्थ्यास दिलेले धान्य व अन्य वस्तूंची नोंदही ऑनलाईन पध्दतीने होत असते. त्यामुळे प्राप्त धान्य साठ्यापैकी किती धान्य, किती लाभार्थ्यांना प्रत्यक्ष वितरीत झालंय यांची नोंद ठेवणे सोपे होणार आहे. साहजिकच बोगस लाभार्थ्यांना वितरीत होणारे लाभ आपोआपच बंद होण्यास मदत होत आहे.

मशिनची कार्यप्रणाली

शासनाकडील संगणकीय प्रकल्पातंर्गत जळगाव जिल्ह्यात 1924 पॉज मशीन बसविण्यात आल्या आहेत. या मशीनच्या माध्यमातून सर्व प्राधान्य गटातील व अंत्योदय गटातील रेशनकार्ड धारकांना ऑनलाईन पध्दतीने धान्याची विक्री होत आहे. या योजनेअंतर्गत या पॉज मशीनला आधारकार्ड लिंक करण्यात आले असून, त्यामुळे लाभार्थ्यांच्या हाताच्या अंगठयाव्दारे धान्य लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येत आहे. या संपूर्ण कामासाठी शासनाने मशीनची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ओएएसवायएस या कंपनीकडे सोपविण्यात आली आहे.

असे होते धान्य वितरण

जळगाव जिल्ह्यात अंत्योदय योजनेतंर्गत कुटुंबाची संख्या 1 लाख 37 हजार 543 आहे. पिवळे कार्डधारक (बीपीएल) लाभार्थ्यांची संख्या 4 लाख 64 हजार 974 तर केसरी कार्डधारक (एपीएल) लाभार्थ्यांची संख्या 2 लाख 79 हजार 284 इतकी आहे. अंत्योदय योजनेतील प्रत्येक कुटूंबाला 21 किलो गहू व 14 किलो तांदूळ देण्यात येतो. तसेच पिवळे व केसरी कार्डधारकांना प्रत्येक व्यक्तीमागे 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ उपलब्ध करुन दिला जातो. त्यानुसार लाभधारकांना ऑनलाईन पध्दतीने पॉज मशीनव्दारे धान्य वाटप करण्यात येत आहे. या सर्व लाभार्थ्यांचा डेटाबेस जिल्हा प्रशासनाकडे असून तो या पॉस मशिनव्दारे जिल्ह्याच्या सर्व्हरशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे लाभार्थिनिहाय धान्य वितरणाची स्थिती आता जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध राहणार असल्याने साहजिकच स्वस्त धान्य वितरण प्रणाली ही अधिकाधिक पारदर्शक होणार आहे.

प्रारंभीचा उद्देश हा केवळ लाभ वितरणाची नोंद इतकाच असला तरी भविष्यात कॅशलेस आर्थिक व्यवहारांसाठी याचा वापर होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने ऑनलाईन जोडली गेली असून त्याचा प्राथमिक टप्पाही पूर्ण झाला आहे. त्यामुळे जिल्हयातील सार्वजनिक वितरण प्रणालीची वाटचाल पारदर्शकतेकडे सुरु झाली आहे.

लेखक - जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव

माहिती स्रोत : महान्यूज