सातारा जिल्ह्यात शिरवळ या सातारा-पुणे महामार्गावरील गावात गेली अनेक वर्षे ओढ्या-नाल्यावर राहणाऱ्या कातकरी कुटुंबाला शासनाच्या शबरी योजनेतून जिल्हा परिषदेकडून घरकुलं बांधून देण्यात आली आहेत. त्यावरील हा विशेष लेख…!

आम्ही कातकरी, आमचे पूर्वज कुठले याचे मूळ आम्हाला ठाऊक नाही. आम्ही मूळ जंगलातील विशिष्ट झाडा पासून कात काढणारे म्हणून कातकरी .... कोकण आमच्या भटकंतीचे मूळ स्थान पण कालांतराने आमचे कात काढण्याचे काम थांबत गेले तसे आम्ही उदरनिर्वाहसाठी गावोवाव भटकंती सुरु केली. मासे आणि खेकडे पकडणे हा आमचा आता व्यवसाय झाला आहे. इतर वेळी पडेल ते काम करणे, जसे वीटभट्टीवर... गवंड्याच्या हाताखाली आणि त्यातून चार पैसे आले की खाण्यापिण्यात खर्च करण्यावर आमचा भर असायचा. आम्हाला कधी घर मिळेल असं स्वप्नातही वाटले नव्हते. हातावर पोट घेऊन रानोमाळ भटकणारी आमची जमात. जिथं जागा मिळेल, तिथं पाल टाकून आमचा संसार सुरु असायचा. पण शिरवळमध्ये अनेक वर्षापासून राहतो इथल्या ग्रामसेवकाने आणि इथल्या गाव कारभाऱ्यांनी (सरपंच आणि इतर सदस्य) आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या घरासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला. त्यामुळेच गेल्या सहा महिन्यापासून आम्ही पक्क्या घरात रहायला आलो. शेकडो वर्षे उन्हातान्हात आमच्या मागच्या पिढ्या खपल्या त्यांच्या नशिबी हे सुख आल नाही. आमच्या नशिबी हे सुख शासनामुळे आलं याचा खूप आनंद असल्याची भावना काळू बारकू जाधव आम्हाला सांगत होते. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाच्या वतीने आदिवासींना पक्की घरे मिळावित म्हणून शबरी आवास योजना राबविण्यात येते. एक लाख २० हजार एवढी रक्कम घरकुलासाठी नरेगातून साडेबारा हजार. या रकमेतून २६९ चौरस फुटाचे घर एका कुटुंबाला दोन रुमचे घर, शौचालय यांचा यात समाविष्ट आहे.

शिरवळच्या पश्चिमेला ग्रामपंचायतीच्या २८ एकरच्या गायरानावर दोन एकर एवढ्या क्षेत्रात १९ घरकुल शबरी योजनेतून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बांधून देण्यात आली आहेत. देशात वंचितांना विविध घरकुल योजनेतून घर बांधून देण्यात सातारा जिल्ह्याची देशभरातून आघाडी घेतली असून त्यासाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचा पाठपुरावा आणि यंत्रणेची धडाडी यामुळेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांचा या कार्यासाठी केंद्र सरकारने गौरव केला आहे.

आज ही १९ कुटुंब यात रहायला आली आहेत. मागच्या पिढ्यांनी पक्क्या घराचं तोंडही बघितलं नव्हतं आता आम्हाला यात रहायला मिळत आहे ही आम्हाला खूप आनंद देणारी गोष्ट असल्याची भावना संतोषी विश्राम हेलम या कातकरी महिलेने बोलून दाखविली. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रुही आले.

आता या घराघरातील लेकरं शाळेत जात आहेत, पूर्वी ओढ्या नाल्यात खेकडे आणि मासे पकडणारे हे लहानपण गोजिरे अक्षर गिरवताना पाहून काळू जाधव या आजोबाला आपल्या नातवाचे मोठे कौतुक आहे. या गावच्या सरपंच छाया सुभाष जाधव याही आपण या वंचितांसाठी असे घर मिळवून देण्यात सहकार्य केले आणि आज त्यांचे आनंदी संसार पाहून खूप भारावून गेल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

जिथे स्थिरता येते तिथे हलक्या पावलांनी का होईना विकास येतो हे इथे दिसत आहे. त्यांचे राहणीमान सुधारले आहे. ते स्वच्छ रहायला लागले आहेत, असे एम.एस.डब्ल्यू. केलेल्या समाजसेविका स्वाती गोसावी सांगत होत्या. त्या रोज सकाळी चार तास इथल्या लहान लहान मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून शिकवत आहेत. जवळपास १५ लहानमुलांना त्या शिकवत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार यांचे आकलन खूप चांगले असून फार लवकर हे शिकतायत. या वंचितांच्या विकासातच पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दडलेली आहे हे खरे. म्हणूनच आज शेकडो वंचित गुणवंत विद्यार्थी शासनाच्या विविध योजनेच्या बळावर विविध क्षेत्रात आपले नाव कमावताना दिसत आहेत. हा लोककल्याणकारी राज्याचा मंत्र आहे. तोच हाताशी धरुन सातारा जिल्ह्यातील प्रशासन वंचितांना घरकुल देण्याचे काम करत आहे. ते काम आज देशपातळीवर गौरविले जात आहे. यातच या कार्याचे यश सामावले आहे.

लेखक: युवराज पाटील

माहिती स्रोत: महान्युज