सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेलेल्या इवल्याशा भिलार गावात चांगलीच लगबग होती. स्ट्रॉबेरीचं गाव अशी ओळख असणाऱ्या या गावाला आता नवी ओळख मिळाली. हे गाव देशातल पाहिलं पुस्तकाचं गाव झालं. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या पुस्तकाच्या गावाचं लोकार्पण झालं. या निमित्त या गावात अनेक साहित्यप्रेमी, साहित्यिक, मान्यवर आले होते. दिवसभर नुसती लगबग सुरू होती. प्रत्येकाच्या जणू घरचं कार्य असल्यासारखे गावकरी कामात व्यस्त होते, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुललं होतं.

देशात थंड हवेसाठी प्रसिध्द असणाऱ्या महाबळेश्वर - पाचगणी या हिलस्टेशनच्या जवळच सुमारे तीन हजार लोकवस्तीचे भिलार गाव वसले आहे. येथे पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या गोडीने इवल्याशा भिलारचं नाव जगाच्या नकाशावर उमटले आहे. त्यामुळे पाचगणी-महाबळेश्वरला येणाऱ्यांना भिलार हे गाव चांगलेच परिचयाचे झाले आहे. प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात येथे भरणाऱ्या स्ट्रॉबेरी महोत्सवाने अनेकांना भुरळ घातली आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना साहित्याची मेजवाणी मिळावी यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यातीने ही ‘पुस्तकाच्या गावाची’ योजना साकारली आहे.

पाचगणी पासून अवघ्या पाच-सहा किलोमीटरवर असणाऱ्या थोड्याशा आडवाटेच्या गावचा रस्ता बुधवार ३ मेला चांगलाच फुलला होता. पर्यटक, वाचनप्रेमींना नेण्यासाठी एसटी महामंडळाच्यावतीने विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. गावाच्या सुरुवातीला उभारण्यात आलेली कमान आपलेपणाने सर्वांचे स्वागत करत होती. ‘या पुस्तकं तुमची वाट बघताहेत’ असे फलक जागोजागी लावण्यात आले होते. गावातील प्रत्येक दारासमोरच्या रांगोळ्या गावात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करत होत्या. एखाद्या सणाला असणारा उत्साह गावकऱ्यांच्या अंगात संचारलेला दिसत होता.

स्थानिकांचा सहभाग असला तर काय किमया साधू शकते हे भिलारला आल्याशिवाय कळणार नाही. या पुस्तकाच्या गावाची संकल्पना साकारण्यासाठी गावातील साडे तीनशे घरांपैकी 25 घरांची निवड करण्यात आली आहे. या निवडलेल्या 25 घरात विविध विषयांवरील जवळपास 15 हजार पुस्तकांचा खजिना ठेवण्यात आला आहे, यामध्ये कथा, कादंबरी, कविता, बालसाहित्य, स्त्री साहित्य, संतसाहित्य, चरित्र आदी विविध साहित्य प्रकारांचा समावेश आहे.

परदेशी पर्यटनाच्या धर्तीवर ही संकल्पना तयार करण्यात आली आहे. या संकल्पनेनुसार या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले पर्यटक किंवा रसिक-वाचक निवडलेल्या घरांमध्ये जाऊन निवांत वाचन करु शकणार आहेत. या निवडलेल्या 25 घरांवर विविध प्रकारची चित्र रेखाटण्यात आली आहेत. ही चित्रेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या चित्रांच्याही संगती लावण्यात आल्या आहेत. चित्राच्या संगतीनुसार त्या घरात साहित्य वाचकाला उपलब्ध होत आहे. घरांच्या भिंतीवर निसर्ग चित्र काढण्यात आली आहेत, त्या घरात निसर्ग चित्रण अथवा प्रवास वर्णनपर साहित्य ठेवण्यात आले आहे. ऐतिहासिक चित्र रेखाटलेल्या घरात ऐतिहासिक साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले आहे. संतांची चित्र काढलेल्या घरामध्ये संतवाड:मय व अध्यात्मिक पुस्तकांची भेट वाचकांशी होत आहे.

या भन्नाट कल्पनेमुळे वाचनाचे वेड नसणाऱ्यांचीही वाचनाची इच्छा जागृत होते. प्रत्येक घरात मांडण्यात आलेली पुस्तके कुतुहलाने चाळणारी अनेक मंडळी येथे पहावयास मिळाली. एक प्रकारचे साहित्यिक वातावरणच येथे तयार झाले आहे. त्याच बरोबर गावाच्या कवी कट्यावर तर चक्क अशोक नायगावकर, रामदास फुटाणे बसले होते, अनेक साहित्यप्रेमी त्यांच्या सोबत फोटो आणि सेल्फी काढण्यात मग्न होते. गावकऱ्यांचा व साहित्यप्रेमींचा दांडगा उत्साह बघून कार्यक्रमाच्या निमित्त गावात आलेल्या साहित्यिकांच्या चेहऱ्यावर भरुन पावल्याचे भाव होते.

निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या या गावात एक नवचैतन्यच निर्माण झालं आहे. मराठी भाषेच्या साहित्याला एक चांगल्या प्रकारची उभारी मिळणार असल्याचं या निमित्ताने जरूर जाणवत होत. आता वाचत कोण? या प्रश्नाचं उत्तर भिलारमधील गर्दी, उत्साह बघितला की नक्कीच मिळतं. या पुस्तकाच्या गावातील गर्दी दिवसेंदिवस नक्कीच वाढेल यात शंकाच नाही.

लेखक: संग्राम इंगळे,

विभागीय माहिती कार्यालय,

पुणे.

माहिती स्रोत: महान्युज