झाडं लावणं, झाडं जगवणं, गावात स्वच्छता राखणं, गावातील कचऱ्याची चांगली विल्हेवाट लावणं ही तर सगळी गामपंचायतीची कामं, त्याच्याशी आमचा काय संबंध ? त्यांची कामे त्यांनी करावीत, आम्ही कशाला यात सहभागी व्हायचं, यातून आम्हाला काय मिळणार आहे ? ही गावातील लोकांची एकेकाळची मानसिकता. त्यामुळे ग्रामसभेला गावकऱ्यांची उपस्थितीही कमी. अशा परिस्थितीत लोकांची मानसिकता बदलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. यासाठी गावात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या झाल्या. गावातील चौका चौकात घोष वाक्यांचे फलक लावण्यात आले. त्यातून पर्यावरण संरक्षित समृद्ध ग्राम योजनेचे महत्व, स्वच्छतेचा संदेश आणि झाडं लावल्याने होणारे फायदे याची माहिती घरोघर पाहोंचवण्यात आली. प्रत्येक घरासमोर तुळशीच्या झाडाची लागवड करण्यात आली, ज्याच्या घरी शौचालय असून ते वापरात नव्हते अशा घरांना भेटी देऊन स्वच्छतेचे, शौचालय वापराचे महत्व पटवून देण्यात आले. हळुहळू गावाची मानसिकता बदलली. याचा परिणाम ग्रामसभेतील उपस्थिती वाढण्यात झाला. ग्रामसभेच्या आधी महिला सभा घेतल्याने ग्रामसभेतही महिलांची उपस्थिती वाढली. गावकरी, महिला आपले विचार ग्रामसभेत निर्भयपणे मांडू लागले, संवाद वाढला आणि विसंवाद कमी होऊन गावाच्या विकासाला गती मिळाली. ही गोष्ट आहे हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील कंजारा गावची. कंजारा गावच्या पुर्वेस नांदापूर, उत्तरेस टाकळगव्हाण दक्षिणेस जामगव्हाण आणि पश्चिमेला डोंगर आहे. 2001 च्या जणगणनेप्रमाणे गावाची लोकसंख्या अंदाजे 1171. गाव डोंगराळ, खडकाळ आणि काळ्या मातीचं. गावाच्या पश्चिमेला एक ओढा तर उत्तरेला कयाधू नदी आहे. गावात 12 वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे गावचा मुख्य व्यवसाय शेती असून गावात हळदीचे मोठ्याप्रमाणात उत्पादन घेतले जाते. गावात बचतगटांच्या माध्यमातूनही मोठ्याप्रमाणात रोजगाराला चालना मिळाली आहे. मानसिकता बदलली तसा गावानं अनेक योजनांमध्ये सहभाग घेतला एवढेच नाही तर नियमांचे नेटाने पालन केलं. त्यामुळे गाव विकासाच्या मार्गावर अग्रेसर झालं. गावात रस्ता आला, सांडपाणी व्यस्थापनासाठी शोषखड्डे झाले घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी कंपोस्ट खड्डे तसेच नॅडप पदधतीचा उपयोग करण्यात आला. गावानं घराघरात शौचालय बांधून त्याचा वापर सुरु केला. गाव 100 टक्के हागणदारीमुक्त झाल्यानं गावानं "निर्मलग्राम" पुरस्कार पटकावला. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाहु-फुले-आंबेडकर स्वच्छता अभियानात तालुक्यात पहिला क्रमांक नोंदवला. गावात पर्यावरण संरक्षित समृद्ध ग्राम योजनेची अंमलबजावणी करण्याचं निश्चित झालं आणि गावात अनेक समित्यांची स्थापना होऊन त्या कार्यरत झाल्या. योजनेतून गावात 15 हजार झाडं लावण्यात आली. गावात बंदिस्त नाल्या आल्या. गावात 10 सौरपथदिवे बसवण्यात आले. ग्रामपंचायतीमध्ये एक सौर अभ्यासिका निर्माण करण्यात आली. गावात 35 कुटुंबानी सौर कंदिलाचा वापर सुरु केला तर 25 कुटुंबानी घरात निर्धूर चुली आणि 35 कुटुंबांनी सुधारित चुलीचा वापर सुरु केला. गावाची कर वसुली 100 टक्के झाली आणि गावानं पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत पूर्ण करावयाचे तीन वर्षाचे निकष पहिल्याच वर्षी पूर्ण केले. त्यामुळे गावाचा "पर्यावरण विकासरत्न" पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण गावाला प्रेमाचा गुलाबी रंग देण्यात आला आहे. गावात तंटे नसावेत यासाठी देखील गावाने प्रयत्न केला आणि त्यातही त्यांना यश आलं. गावानं मुला-मुलीचा भेद मिटवण्यासाठी आणि बालकांमधील कुपोषण दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यासाठी "राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त ग्राम योजने" त गावानं सहभाग घेतला. गावातील एक ही मुल कुपोषित राहणार नाही यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याने आज गाव कुपोषण मुक्त झाले आहे. राज्यभर स्त्री भ्रृणहत्येची चर्चा होत असतांना ग्रामपंचायतीने पुढे येऊन यासाठी ठोस पाऊले उचलली. गावात ज्या घरात मुलगी जन्माला येईल त्या मातेचा ग्रामपंचायतीने साडी-चोळी देऊन आणि ओटी भरून सत्कार करण्यास सुरुवात केल्याने मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याची एक चांगली मानसिकता गावात रुजण्यास मदत झाली.मानसिकता बदलली, गाव सुधारलं पण आता यात सातत्य राखलं पाहिजे याची देखील गावकऱ्यांना जाणीव आहे. सौ. रेखा पांडुरंग कल्याणकर गावच्या सरपंच असून महमद कलीम महमद अयुब हे गावचे ग्रामसेवक आहेत. दोघांच्या नेतृत्वाखाली गावानं आपली पुढची विकासाची दिशा आखून ठेवली आहे. गावातील 100 टक्के कुटुंबांना अपारंपारिक उर्जा स्त्रोताच्या वापरास प्रोत्साहित करणे, गावात 100 टक्के निर्धूर चूलीचा वापर, छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संकलन आणि संवर्धन, गावात एक व्यक्ती 20 झाडं याप्रमाणे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम, कुऱ्हाडबंदी, नशाबंदी, गट पद्धतीने शेती आणि सेंद्रीय शेतीचे व्यवस्थापन, शेतीपूरक व्यवसायाची उभारणी, म.ग्रा.रो.ह.यो अंतर्गत अधिकाधिक जलसिंचनाची कामे करणे, गावात ठिबक सिंचनाचा आणि तुषार पद्धतीचा वापर वाढवणे, गाव 100 टक्के साक्षर करणे, यासर्व कामात 100 टक्के लोकसहभाग मिळवणे, घनकचऱ्यापासून गांडूळ खत तयार करणे, सांडपाण्यावर फुल शेती विकसित करणे यासारखी ग्रामविकासाची वाटचाल त्यांनी निश्चित केली आहे.... डॉ. सुरेखा मुळे