कार्यालयात एखाद्या कागदपत्रासाठी जायचे म्हटले, की अनेकांच्या माथ्यावर आठ्या पडतात; मात्र याला जागतिक स्तरातील पर्यटन केंद्र असलेले लोणार तहसील कार्यालय अपवाद असल्याचे येथील कामकाज आणि वातावरणावरून दिसून येते. त्यामुळे लोणार तहसील कार्यालय आयएसओ मानांकन प्राप्त पहिले तहसील कार्यालय ठरले आहे. लोणार तहसील कार्यालयात कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेशद्वारावर प्रथम शुद्ध पाणी व प्रशस्त बसण्याची व्यवस्था केलेली आहे. कामासाठी लागणारी कागदपत्रे, कोणाला भेटायचे याचे माहितीफलक तसेच माहिती देण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. कार्यालय परिसरात वृक्ष लागवड केली असून इमारत परिसरात झाडांच्या कुंड्या लावल्याने आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे.

कागदपत्रे मिळण्यासाठी अवधी असल्यास नागरिकांना मनोरंजनासाठी टीव्ही संच लावलेला आहे. तसेच वाचनासाठी विविध वृत्तपत्रे, पुस्तके ठेवण्यात आलेली आहेत. भिंतीवर विविध योजनांची माहिती देणारे फलक लावण्यात आली आहेत. सुविचार तसेच थोर व्यक्तीच्या विचारांचे फलक लावण्यात आलेले आहे. कार्यालयीन कामकाजाच्या कागदपत्रांची व्यवस्थित मांडणी करून विविध विभागांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कामे करणे सोपे आणि सुलभ झाले असून, कामाची गती वाढल्याचे दिसून येत आहे. तक्रारपेटी, शौचालय, सुव्यवस्थित कागदपत्रे, विविध विभागांना दिलेली नावे व ओळखपत्र परिधान केलेले अधिकारी व कर्मचारी, पक्ष्यांसाठी घरटे व पार्किंग व्यवस्था अशा अनेक सुविधांमुळे लोणार तहसील कार्यालय लक्ष वेधून घेत आहे.

आपण सर्वसामान्य जनतेचे काही तरी देणे लागतो या सकारात्मक विचारांमुळे दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेली गोरगरीब जनतेची कामे अन् उत्कृष्ट प्रशासन राबवणाऱ्या लोणार तहसील जिल्ह्यातून आयएसओचा मानांकनाचा पहिला मान मिळाला आहे. नुकतेच तहसीलदार सुरेश कव्हळे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

मेहकर उपविभागातंर्गत येणाऱ्या लोणार तहसीलची स्थापना 1 मे 1981 रोजी झाली. या 37 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक तहसीलदारांनी पदभार सांभाळला आहे. परंतु बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेले व यवतमाळ जिल्ह्यातून 1 जानेवारी 2016 रोजी बदली होऊन लोणार तहसीलचा पदभार सुरेश कव्हळे यांनी सांभाळला. योजनांची पूर्ण माहिती, सुट्टीच्या दिवशी प्रमाणपत्रांचे वाटप, पाणीसाठा वाढवण्यासाठी तालुक्यातील अनेक गावांमध्ये केलेले नाला व नदीचे खोलीकरण, सरळीकरण तर आपद्ग्रस्त कुटुंबांना शासनाकडून दिली जाणारी तत्काळ मदत, तहसील परिसरातील दलालांचा बंद केलेला सुळसुळाट यासारख्या एक नव्हे तर अनेक समाजोपयोगी कामामुळे जनतेच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी अल्पावधीतच लोणार तहसीलला आयएसओ मानांकनाचा दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्यांनी दुर्गम भागातील कासारी मढी सारख्या गावात विविध अधिकाऱ्यांसह रात्र काढून गावातील समस्या जाणून घेत समस्या तत्काळ सोडवल्या. शेतकऱ्यांना लोक सहभागाचे आवाहन करीत शेकडो शेत रस्ते, नाला, नदीचे खोलीकरण, सरळीकरण करून शेतकऱ्यांचे तंटे सोडवले. जलपातळी वाढवण्यासाठी गावोगावी उपक्रम राबवले. तहसीलच्या भिंती बोलक्या करून शासनाच्या योजनांमुळे सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचवल्या. तर जागतिक दर्जाच्या सरोवराच्या स्वच्छतेसाठी जून 2017 मध्ये मी लोणारकर टीमच्या मार्फत सरोवराचा संपूर्ण परिसर स्वच्छ करीत त्याची गुढी दिल्लीमध्ये उभारली. तहसीलदारांच्या प्रयत्नामुळे लोणार तहसीलला आयएसओ होण्याचा मान मिळाला आहे.

शेतकऱ्यांना लोकसहभागाचे आवाहन करीत शेतरस्ते, नाला, नदीचे खोलीकरण, सरळीकरण करून सोडवले तंटे, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी काम केले आहे. त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे.

- निलेश तायडे

माहिती स्रोत: महान्युज