नाशिक जिल्ह्यात पेठ तालुक्यातील हनुमंतपाडा (ऊ) या आदिवासी बहुल गावात महिलांनी पुढाकार घेतल्याने गाव हागणदारीमुक्त झाले आहे. विशेष म्हणजे महिला बचतगटानेदेखील या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.

हनुमंतपाड्यातील बहुतांशी नागरिक शेती आणि मोलमजूरी करणारे आहेत. खरीप हंगाम संपल्यावर शेजारील नाशिक तालुक्यात मजुरीसाठी ग्रामस्थ स्थलांतरीत होतात. त्यामुळे स्वच्छता उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुरुषांची तयारी नव्हती. तत्कालीन सरपंच विमल भोये यांनी महिला ग्रामसभा घेऊन डिसेंबर 2015 मध्ये गाव हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार केला. सुरुवातीला ही कल्पना फारशी कोणाला आवडली नाही. मात्र नंतर महिलांची एकजूट झाल्यावर ग्रामस्थांचा सहभाग वाढू लागला. होळी सणापर्यंत गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला.

गटविकास अधिकारी बी.बी.बहिरम आणि ग्रामसेवक एस.वाय.नेहते यांनी गावात सभा घेऊन मार्गदर्शन केले. उघड्यावर शौचास न बसण्याबाबत आवाहन करणारे भित्तीपत्रके गावात लावण्यात आली. महिला मंडळाने जनजागृतीच्या कार्यात विशेष पुढाकार घेऊन घरोघरी जाऊन प्रबोधन केले.

भोये पाड्यावरील महिला बचतगटाने शौचालय बांधण्यासाठी अंतर्गत कर्जवाटप केले. ग्रामपंचायतीने दुकानदाराशी चर्चा करून शौचालय बांधण्यासाठी लागणारे साहित्य ग्रामस्थांना उधारीवर मिळवून दिले. 10-12 ग्रामस्थांनी गावातच वीटा तयार करण्यास सुरुवात केली. गवंडी प्रशिक्षणामुळे कुशल मजुरांची समस्या दूर झाली. प्रशिक्षण घेणाऱ्याने इतरांना प्रशिक्षित केले.

गावात 143 कुटुंबांपैकी 134 शौचालये विशेष मोहिमेअंतर्गत बांधण्यात आली. स्थलांतरीत कुटुंब शौचालय बांधण्यासाठी मजूरी सोडून गावात आले. त्यांनी स्वत: विटा तयार करून शौचालय उभारले. केवळ चार महिन्यात गाव हागणदारीमुक्त झाले. या मोहिमेमुळे गावातील महिलांचा गावातील विकासातील सहभागही वाढला आहे. महिला आता गावातील स्वच्छता, पाणी, वीज या मूलभूत सुविधांबाबत बोलू लागल्या आहेत.

ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गाव तलावातील गाळ काढणे, बंधाऱ्यातील गाळ काढणे, शेत बांधबंदिस्ती, इंदिरा आवास योजनेतून घरकूल वाटप, शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन आदी कामे करण्यात आली आहेत. गाव हागणदारीमुक्त झाल्याने गावातील 12 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळाला आहे. अन्यथा एका आर्थिक वर्षात केवळ 3 घरकुलांचा लाभ मिळणे शक्य होते. एकंदरीतच ‘स्वच्छ भारत मिशन’ मोहिमेमुळे गावाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे.

विमल भोये-पूर्वी महिलांना फार त्रास होत असे. गाव हागणदारीमुक्त झाल्याने त्याचा लाभ महिला आणि लहान मुलांना झाला आहे. गावचे आरोग्य चांगले राखण्यासही त्यामुळे मदत झाली आहे. गावातील महिलांच्या एकजुटीमुळेच हे शक्य झाले आहे.

- जिल्हा माहिती कार्यालय,

नाशिक

माहिती स्रोत: महान्युज