२०१६ मावळताना ललिता नायर यांची घेतलेली भेट आणि त्यांच्यासोबत इंडियन कॅन्सर सोसायटीचं समजून घेतलेलं काम खरोखर उमेद वाढवणारं ठरलं. ललिता नायर, संचालक, प्रशासन आणि पुनर्वसन, इंडियन कॅन्सर सोसायटी, परळ, मुंबई. १९८१ पासून या संस्थेत काम करतायत. दोन वर्षांपूर्वी वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त झाल्या तरी त्यांना संस्थेने सोडलं नाही. टाटा उद्योगसमूहाच्या सामाजिक बांधीलकीतून जन्माला आलेल्या अनेक कामांपैकी एक टाटा कॅन्सर हॉस्पिटल. आणि त्याच्याशी संलग्न इंडियन कॅन्सर सोसायटी. कॅन्सर पेश त्याची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी स्थापन झालेली आशिया खंडातली ही पहिली NGO. १९५१ साली स्थापन झालेली. कॅन्सरविषयी माहिती कमी आणि भीतीच फक्त वाटण्याचा तो काळ. आजारी रुग्णाचं मन खचलेलं, नातेवाईक धास्तावलेले, ट्रीटमेंटचा मोठा कालावधी. हातावर पोट असणार्र्यांना औषधोपचार मोफत मिळाले तरी त्यांचं काम बंद झाल्याने घरसंसार चालवण्याची काळजी. अशा भारतभरातून येणार्याय गोरगरीब रुग्णांना, त्यांच्या नातलगांना पर्यायी व्यवसाय उभे करून देणं, त्यासाठी कौशल्यशिक्षण आणि जोडीला मानसिक आधार देण्याचं काम इथे चालतं. सहा महिन्यांच्या काळात हे व्यवसायशिक्षण दिलं जातं. संत गाडगेबाबा आश्रम, भारत सेवाश्रम, बोर्जेस होम वगैरेंच्या मदतीने शिकणार्यांची राहायची सोय होते आणि शंभर रु दैनिक भत्ताही मिळतो. कॅन्सर उपचारांत महत्वाची भूमिका बजावणारा रुग्णांचा डेटा जमा करण्याचं कामही इथे होतं. संस्थेच्या शाखा आता दिल्ली, कलकत्ता, बंगलोर, पटना, लखनौ, नागपूर वगैरे ठिकाणी आहेत.मुख्यालय परळ, मुंबई इथे आहे. संस्थेचे बहुसंख्य कर्मचारी पुनर्वसित कॅन्सर रुग्णच आहेत. खुद्द ललिताताईं १९९२-९३ साली स्वरयंत्राच्या कॅन्सरमधून पूर्ण बर्या झाल्या आहेत. विविध कॉर्पोरेट कंपन्या, दानशूर व्यक्ती संस्थेला मदत करतात. कितीही मिळाली तरी अपुरीच राहाते ही मदत. कारणं पेशंट्सची संख्या वाढतेच आहे. संस्थेला स्वयंसेवकही हवे असतात. वाढत्या पेशंट्सना सोयीसुविधा पुरवण्यासाठी पैसे, त्यांच्यासाठी कपडे, अंथरूण-पांघरूण, भांडीकुंडी, मुलांना खेळणी अशा पुरवठ्याची सतत गरज असते. आम्ही यापैकी काही घेऊन गेलोच होतो. अशी मदत द्यावीशी वाटली तर संपर्क करण्यासाठी: इंडियन कॅन्सर सोसायटी येथे क्लिक करा पत्ता: 74, जेरबाई वाडिया रोड, भोईवाडा, परळ, मुंबई: 400 012 फोन: +91-22-2413 9445 / 51Email: info@indiancancersociety.ललिता नायर यांचा मोबाइल क्र: 9819877962 लेखक - मेधा कुळकर्णी