छोटीशी सुरुवात देखील मोठ्या परिवर्तनाचे निमित्त ठरते, हा विश्वास रुजविण्यात यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील भोयर कुटूंब यशस्वी ठरले आहे. शेवया, पापड या उद्योगाच्या बळावर कुटूंबाचे आर्थिक स्त्रोत बळकट करण्यात या कुटूंबातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील या कुटूंबाने केलेला हा प्रयत्न निश्चीतच इतर गावात लघुउद्योगाला बळ देणारा आहे. सासू सुनेचा व्यवसाय भोयर कुटुंबातील सून असलेल्या छाया यशवंत भोयर (पाटील) यांनी आपल्या सासू रत्नमाला यांच्या सहकार्याने हा व्यवसाय उभारला. सुरवातीला रत्नमाला भोयर यांच्याद्वारेच हा व्यवसाय चालविला जात होता. सुनेच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून अधिक बळकटी मिळाली. उद्योगात घेतली भरारी छायाताईंचे पती यशवंत भोयर (पाटील) हे लातूर येथील एका साखर कारखान्यात ऊस तोड अधिकारी आहेत. छाया व यशवंत भोयर यांना दोन मुली आहेत. परंतू खासगी कंपनीतील कामातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटूंबाचा गाडा हाकणे शक्य नव्हते. त्यासोबतच अनेक कुटूंबात सासू-सुनेचे वाद पहावयास मिळतात, परंतू या दोघींनी सामजस्यांतून गृहउद्योगाची उभारणी केली. एवढ्यावरच समाधान न मानता व्यवसाय वाढीसाठी सामूहिक प्रयत्न केले. या माध्यमातून कुटूंबाचा आर्थिक स्त्रोत बळकट करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न निश्चीतच कौतुकास्पद आहेत. चार वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरु करण्यात आला. त्याकरीता लागणाऱ्या मशीनची 16 हजार रुपयांना खरेदी करण्यात आली. औरंगाबाद येथून मशीन खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळा व दिवाळी या काळात शेवयांना अधिक मागणी राहते. 16 रुपये किलोप्रमाणे शेवया तयार करुन दिल्या जातात. त्याकरीता लागणारे साहित्य संबंधितांकडून घेतले जाते. ग्राहकांनी शेवया करीता लागणारे साहित्य आणून दिल्यानंतर त्यापासून मशीनवर शेवया तयार करुन त्या देतात. उन्हाळ्यात दररोज सरासरी 35 किलो शेवया तयार करुन ग्राहकांना विक्री होते. छायाताईंच्या सासू रत्नमाला बाबाराव पाटील यांचे देखील सहकार्य या व्यवसाय राहते. रत्नमाला यांचे पती बाबाराव यांचे 2006 साली निधन झाले. नांदेड येथे एका खासगी बॅंकेत ते नोकरीला होते. पतीच्या निधनानंतर कुटूंबाचा गाडा हाकता यावा या उद्देशाने त्यांनी या गृहउद्योगाची उभारणी केली. मुलगा यशवंतच्या विवाहानंतर या व्यवसायात सुनेचे देखील सहकार्य त्यांना मिळू लागले. या दोघींनी मिळून व्यवसायाला उभारी देण्याचे काम केले. सुरवातीला ग्राहकांचा प्रतिसाद कमी असला तरी एकापासून दुसऱ्याला असे करता करता त्यांच्या व्यवसायाविषयी प्रसार होत गेला. आज उन्हाळ्यात आणि दिवाळीच्या काळात ग्राहकांना ॲडव्हान्स बुकींग करावे लागते. उत्पादित पदार्थाचा दर्जा राखला जात असल्याने त्यांच्या गृहउद्योगातूनच पदार्थ तयार करण्यावर भर दिला जातो, असे छायाताई सांगतात. ग्राहकांकडून वाढती मागणी असल्याने उन्हाळा व सण उत्सवाच्या काळात घरची कामे सांभाळत व्यवसायाकरीता वेळ द्यावा लागतो. दैनंदिन कौटुंबिक कामे कधी सासू रत्नमाला या करतात तर कधी सून छाया या सांभाळतात. त्याविषयीचे नियोजन सामंजस्यातून होत असल्याने व्यवसाय करताना अडचण येत नाही, असेही छायाताई सांगतात. कांडप व्यवसाय कांडप यंत्रावर भरड, बेसन देखील दळून दिले जाते. उन्हाळ्यासोबतच दिवाळीच्या काळातही शेवयांना ग्राहकांची मागणी राहते. महागाव लगत अनेक खेडी आहेत. या खेड्यातूनही शेवया तयार करण्याचे साहित्य भोयर कुटूंबियांकडे पोचते. त्यामुळे सतत तीन ते चार महीने उद्योग मोठ्या जोमाने चालत असल्याची माहिती रत्नमाला यांनी दिली. महिन्याकाठी खर्च वजा जाता 50 हजार रुपयांचे उत्पन्न या व्यवसायातून होते. या माध्यमातून कुटूंबाच्या गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या पैशाची सोय होते. परिणामी कुटूंबातील कर्त्या महिला अशी ओळखही त्यांना मिळाली आहे. छायाताई आणि रत्नमाला भोयर यांनी एकमेकींशी समन्वय साधत गृहउद्योगाची उभारणी केली. हे इतर कुटुंबांसाठी देखील प्रेरणादायी उदाहरण असून अशा गृह उद्योगांद्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक घरात संपन्नता नांदू शकेल, यात शंका नाही. भोयर कुटूंबाचे हे घर कौटुंबिक वादांना अपवाद ठरत खऱ्या अर्थाने गोकुळ झाले आहे. लेखक : चैताली बाळू नानोटेनिंभारा, पो. महान, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला स्त्रोत - महान्युज