मुंबई विद्यापिठात पत्रकारिता विषयात आंतरवासिता हा एक भाग असतो. याअंतर्गतच मला मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात काम करण्याची संधी मिळाली आहे. आज मंत्रालयाच्या त्रिमुर्ती पटांगणात वेगळीच लगबग दिसली. उत्सुकतावश मी तिथे गेले. दिवाळीसाठी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तू तिथे ठेवलेल्या होत्या. अत्यंत सुबक कलाकुसर केलेल्या या वस्तू घेण्याचा मोह भेट देणाऱ्यांना आवरत नव्हता. मला कुतूहल वाटले. मी त्याबाबत अधिक माहिती घेतली असता मला असे कळले की, या सर्व वस्तू या मानसिक रुग्णांनी बनविलेल्या होत्या आणि या वस्तू तयार करणे हा त्याच्या उपचाराचा एक भाग आहे.

'मानसिक आरोग्य दिना' निमित्त सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येतात. यावर्षी मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमाचा विषय 'कामाच्या स्थळी मानसिक आरोग्य' हा आहे. या निमित्ताने मानसिक रुग्णांनी बनविलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले असून वस्तूंच्या विक्रीतून होणाऱ्या नफ्यातला काही भाग त्या रुग्णांना देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात चार मनोरुग्णालय आहेत- ठाणे, नागपूर, पुणे आणि रत्नागिरी. या चार मनोरुग्णालयांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमात प्रदर्शनामध्ये दिवाळीत लागणाऱ्या पणत्या, दिवे, कंदील, पेपर बॅग, पेपरची फुलं आदी स्वतः मनोरुग्णांनी बनवलेल्या आहेत व या वस्तू बनवणे हे ओक्यूपेशनल उपचार आहे. ओक्यूपेशनल थेरपिस्ट हे उपचार मानसिक रुग्णांना देतात. या उपचारामुळे त्यांच्यात उत्साह, आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्यांच्या कलांनाही वाव मिळते. याचे मुख्य उद्देश त्यांना काम देणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य कारण सगळ्यांना मानसिक आरोग्याबाबत माहिती देणे होते. कामाच्या स्थळी होणारा मानसिक त्रास व त्याचे उपाय यावेळी मानसोपचार तज्ज्ञ समजावून सांगत होते.

मनोरूग्णांकडून एकाग्रतेने आकर्षक वस्तू बनवून त्यांचे प्रदर्शन भरवने ही स्पृहनिय बाब आहे, मनोरूग्णालय बदलत असून लोकांनी आता त्यांच्याकडे सकारात्मक भावनेने बघणे आवश्यक आहे, असे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन करताना सांगितले.

आरोग्य मंत्री म्हणाले की, अशाप्रकारचे उपक्रम अत्यावश्यक आहे. जिल्हास्तरावरही असे उपक्रम भरवावे, या प्रदर्शनात मनोरूग्णांनी तयार केलेले विविध आकर्षक वस्तूंचे 20 स्टॉल्स लावण्यात आले आहे. यात पेपर बॅग, फाईल्स, पुष्प गुच्छ, आकाश कंदील, पणत्या, दागिने, पेंटींग, पेपर प्लेट्स, आदींचा समावेश आहे. यात ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयाचे 16, पुणे व रत्नागिरी रूग्णलयातील रूग्णांचे प्रत्येकी दोन स्टॉल लावण्यात आले आहे. यासह मानसिक तणाव, त्यांचे परिणाम, लक्षणे, काळजी यावर जनजागृती करण्यासाठी प्रदर्शनी स्थळी विविध पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांनी कार्यालयीन मनस्वास्थ यावर मार्गदर्शनपर पथनाट्य सादर केले. हे प्रदर्शन बघितल्यानंतर मी आणि माझ्या मैत्रिणींनी यंदाच्या दिवाळीत मनोरुग्णांनी तयार केलेल्या वस्तू विकत घेऊन साजरी करण्याचे ठरविले आहे. शासन मनोरुग्णांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नात आमचा खारीचा वाटा उचलायचा हा लहानसा प्रयत्न.

मनोरुग्णांविषयी..

गेल्या काही वर्षांत बदलती जीवनशैली तसेच स्पर्धेमुळे ताणतणाव वाढले आहेत. अगदी पाळण्यातील बाळापासून वयोवृद्धांपर्यंत, चार भिंतीत वावरणाऱ्या गृहिणीपासून ते कॉपरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांपर्यंत तणावाची पाळेमुळे खोल रुतल्याने दिवसागणिक मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. वैद्यकीय निकषानुसार एकूण लोकसंख्येच्या एक टक्के लोक हे मनोरुग्ण असतात. सध्या विविध कारणांमुळे हे प्रमाण वाढत आहे. आत्मविश्वास कमी असणाऱ्या, लहानपणापासून हिंसा, उपेक्षा, शोषण, गरिबी झेलणाऱ्या व्यक्ती नैराश्याने ग्रासलेल्या आहेत. याशिवाय उदासीनता, सततची निष्क्रियता, कामातील रुची कमी होणे, स्वभाव चिडचिडा किंवा संशयी होणे, शांत झोपेचा अभाव, भूक कमी होणे, सतत नकारात्मक विचारांचा प्रभावाखाली राहणे, मूड बदलत राहणे आदी मनोरुग्णपणाची लक्षणे आहेत.

लेखिका - जुईली घाडीगावंकर

आंतरवासिता

माहिती स्रोत : महान्यूज