आपला मुलगा खऱ्या अर्थाने कर्ता झालाय आणि आता राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवित आहे. याचा आनंद वाटतोय, आईने लेकराकडे मागणी करावी असा काहीसा सोहळा मूल येथे संपन्न झाला. राज्याच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचा सूर काहीसा वेगळा होता. मुख्यमंत्र्यांसाठीही हा सोहळा खऱ्या अर्थाने ‘होमकमिंग’ असाच होता.

विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या मुख्य सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री ‘मूल’ गावामध्ये आले होते. मूल आणि मुख्यमंत्री यांचे नाते खूप जुने अर्थात बालपणीचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आजोबा रावसाहेब फडणवीस यांनी 1992मध्ये या शाळेची सुरूवात केली होती.

शाळा सुरू झाली तेव्हा संसाधने कोणतीच नव्हती, छोटसे गाव असणाऱ्या मूल मधील फडणवीस वाड्यात पहिल्यांदा शाळा भरली प्रारंभी केवळ पाचवीची व आठवीची प्रत्येकी एक तुकडी या ठिकाणी सुरू झाली.

“इवलेसे रोप लाविले दारी, त्याचा वेल गेला गगनावरी” अशीच कथा या शाळेची आहे. शाळा हळूहळू सर्व वर्ग आणि तुकडयांनी सजली वर्ग भरायला लागले. शाळेच्या प्रांगणात किलबिल वाढली. आज गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून संपूर्ण विदर्भात या शाळेची ख्याती आहे. शाळेचा दहावीचा निकाल 90 ते 95 टक्यांपर्यंत असतो.

शाळेत अगदी गरीब आणि मोलमजुरीवर जगणाऱ्या कुटुंबातील मुलांनाही प्रवेश दिला जातो. या शाळेत गणित आणि इंग्रजी विषयात 100 पैकी 100 गुण मिळविणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी आहेत. त्यांचा सत्कार या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी थेट मुलांशी संवाद साधताना विवेकानंदाचे जीवनकार्य आणि त्यातील महत्वाच्या घडामोडी यावेळी सांगितल्या, विवेकानंद रेल्वेने प्रवास करीत असताना त्यांचा वेष बघून एका इंग्रजी महिलेने टीका केली त्यावेळी विवेकानंदांनी दिलेले उत्तर मोठे रोचक होते. ‘In your country people may be made by Tailor, but in India are people are made by culture’ असे सांगताना ज्ञान आणि संस्कृतीचे महत्व अधिक असल्याचे स्पष्ट होते असे ते म्हणाले.

अमेरिकेतील धर्मसभेत बंधू आणि भगिनींनो अशी भाषणाची सुरूवात केल्यावर स्वामी विवेकानंदांसाठी 3 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. यावर प्रतिक्रिया देताना एक अमेरिकन महिलेने सांगितले की, आपलेपणाची भावना त्यात दिसली यासाठी त्या टाळ्या होत्या.

कोणतीही तलवार किंवा बंदूक न चालवता स्वामी विवेकानंद यांनी आपल्या ज्ञानाच्या आधारे जगासमोर भारताची ओळख करून दिली होती. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ज्ञान सर्वांसाठी उपलब्ध असते, श्रीमंती किंवा गरिबी तेथे नसते.

मुख्यमंत्री भाषण करीत असताना नात्याने त्यांच्या काकू असणाऱ्या शोभाताईच्या चेहऱ्यावरील भाव खरोखरख कौतुकाचे होते. आपला मुलगा उत्तम वक्ता आहे, याची जाण असलेल्या शोभाताईंना कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणून बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतचा अभिमान स्पष्ट जाणवत होता.

दुर्मिळातील दुर्मीळ असा हा योग आज मूल नगरीत दिसला. या क्षणाचा साक्षीदार असण्याचा आनंद आम्हा सर्वांनाही होता कार्यक्रम संपला वाहने फडणवीस वाड्याच्या दिशेने निघाली, अन् हे क्षण मनात साठवत आम्हीही निघालो.

लेखक – प्रशांत दैठणकर

जिल्हा माहिती अधिकारी , गडचिरोली

माहिती स्रोत : महान्यूज