विपश्यना एक पुरातन विद्या. सुमारे 2550 वर्षांहून अधिक जुनी ही ध्यान साधना. तथागत गौतम बुद्धांनी या विद्येचा प्रसार केला. कालांतराने भारतात ही विद्या लुप्त झाली. परंतु नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील धम्मगिरी विपश्यना आंतरराष्ट्रीय संस्थेत या विद्येचे ज्ञान प्रात्यक्षिकांसह दिले जाते. यासाठी 14 दिवसांच्या परिवर्तीत रजांची सवलत राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचारी यांना मिळते. या संस्थेत प्रशिक्षणाचा घेतलेला अनुभव, यावर आधारीत हा लेख.

विपश्यना हा पाली शब्द. याचाच अर्थ जसं आहे तसं पाहणे. ही विद्या तशी पुरातन. कालांतरानं भारतातून लुप्त झाली. त्यात सोयीनुसार पुढे बदलही झाले. परंतु तथागत गौतम बुद्धांनी शिकविलेली विद्या शास्त्रशुद्धपणे इतर देशात जतन झालेली. त्या विद्येचे ज्ञान अथक परिश्रमातून गुरूजी सत्यनारायण गोयंका यांनी ब्रम्हदेशातून मिळविले. पुढे चालून त्यांनी भारतात या विद्येचा प्रचार आणि प्रसाराचा वसा घेतला. आजही तो चालू आहे. जगातील पहिले पॅगोडा त्यांनी इगतपुरीतच स्थापन केले, हे विशेष. याच ठिकाणाहून अनेक साधकांनी या विद्येचे अमृत रसग्रहण केले. त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी या विद्येचा प्रसार करण्यात येतो. याच परिसरात तपोभूमीचा परिसर आहे, तिथेही दुसरा पॅगोडा मनाला मोहून टाकणारा असाच आहे. या तपोभूमीत दीर्घकालीन शिबिरे चालतात.

औरंगाबादपासून रेल्वेने 237 कि.मी. अंतरावर असलेला इगतपुरीतील धम्मगिरी हा डोंगररांगातील परिसर. मनाला मोहून टाकणारा. निसर्गरम्य असा. त्यातच पावसाळा. त्यामुळे सर्व डोंगर हिरवीगार. डोळ्यांची पारणंच फेडतात. त्यामध्येच 10 दिवसांची मौन साधना. आजच्या धकाधकीच्या जीवनात, स्पर्धेच्या युगात, मोबाईल क्रांतीच्या जमान्यात मौन, विना संपर्क, गृहत्याग, तंत्रज्ञानापासून दूर राहण्याचा विचार तसा धाडसीच ठरणारा. तरीही अनेक हजारो साधक या ठिकाणी हे शिवधनुष्य पेलतात. सुरूवातीला तंत्रज्ञान आणि नातेसंबधांशी ॲडिक्ट झालो असल्याने सुरूवातीचे दोन-तीन दिवस थोडे कठीण, त्रासदायक वाटू लागतात. परंतु शास्त्रशुद्धपणे असलेल्या या विद्येची प्रचिती कालबद्ध अशा मर्यादेत यावयास सुरूवात होते. पण त्यासाठीही लागते मनाची तयारी आणि योग्य प्रात्यक्षिक.

पहाटे 4 पासून सुरू होणारे अध्ययन रात्री 9.30 पर्यंत चालते. दिवसातील जवळपास 17 तासांमध्ये केवळ आणि केवळ विपश्यनेचे धडे सत्यनारायण गोयंका गुरूजींच्या वाणीतून (ऑडिओ कॅसेटच्या सहाय्याने) दिले जातात. मात्र, वेळेचे पालन यथायोग्य पद्धतीने आणि दररोज करणे अनिवार्य असते. त्यासाठी संस्थेतील अधिकारी-कर्मचारी कार्यरत असतातच. परंतु त्याचबरोबर धम्मसेवकही ही जबाबदारी पार पाडतात. तेही अत्यंत तळमळीने. नवीन विद्यार्थ्यांसाठी शिस्तीचे पालन व्हावे, यासाठी अत्यंत नम्र भावनेने त्यांना ते सूचित करत असतात. शिवाय संस्थेच्या कामातही मोठ्याप्रमाणात हातभार लावतात. नवीन विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींवर तोडगाही सांगतात. परंतु कमी शब्दात बोलूनच.

विद्येचे ज्ञान देण्यासाठी गटनिहाय शिक्षक मार्गदर्शन करतातच. योग्य ज्ञानार्जन व्हावे,यासाठी केवळ साधनेबाबत या शिक्षकांशी विद्यार्थी मोजक्या स्वरूपात संवाद साधू शकतो. मात्र नंतर केवळ प्रात्यक्षिक आणि प्रात्यक्षिकच. यामध्ये मग आनापान (श्वासोच्छवास निरीक्षण), चित्त शुद्धी, मनावर नियंत्रण, मनाची शुद्धी याबाबत गुरूजी सत्यनारायण गोयंका यांच्या वाणीतून प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार प्रात्यक्षिक केले जातात. वयोगटानुसार पॅगोडातील शुन्यागाराची सुविधाही साधकांना अनुभवयास दिली जाते. 3 बाय 6 च्या र्निजंतुकीकरणीय रूमलाच शुन्यागार म्हणतात. अत्यंत शांत असलेल्या शुन्यागारात श्वासाचा आवाजही सहज अलगदपणे अनुभवता येतो, अभ्यासता येतो.

दहा दिवसांच्या काळात शील, सदाचाराचे पालन करत या विद्येचे ज्ञानार्जन करणे, आवश्यक आहे. त्याचबरोबर संस्थेने घालून दिलेल्या शिस्तीचे पालन होणेही अत्यावश्यक असेच आहे. किंबहुना स्वउपयोगी आहे. याठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, कार्पोरेट क्षेत्रातील उद्योजक, इंजिनिअर, डॉक्टर, विद्यार्थी असे आदी क्षेत्रातील देशविदेशातील मोठ्याप्रमाणातील तरूण तरूणी, ज्येष्ठ येतात. संस्थेत परदेशातील नागरिकांसाठीही त्यांच्या भाषेत ज्ञान देण्याचे कार्य देखील होते. त्यामुळे देशविदेशातील साधक या वातावरणात मनाची शांती अनुभवतात.

शासकीय अधिकारी-कर्मचारीही याठिकाणी येतात. प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळाल्यास रजेच्या अर्जासोबत प्रशिक्षण प्रवेशपत्राची झेरॉक्स जोडावी. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संस्थेकडून त्यांना कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येते. सदरील प्रमाणपत्र सादर करून शासनाच्या या सवलतीचा राज्य शासनाचा अधिकारी आणि कर्मचारी लाभ घेऊ शकतो.

कार्यालयीन कामासह वैयक्तिक जीवनात या विद्येचा मोठ्याप्रमाणात उपयोग इतरांना झाला असल्याचे गुरूजी गोयंका त्यांच्या प्रवचनात उदाहरणासह सांगतात. दररोज दीड तासांच्या प्रवचनातून शास्त्रशुद्ध विपश्यना विद्येच्या तंत्राबरोबरच जीवनातील आचरणाबाबतचे त्यांचे विचार व्हीडिओच्या माध्यमातून दाखविण्यात येतात. जे, की जीवन जगताना उपयोगी पडतात.

मनाची शांती, शुद्धीचे कार्य विपश्यना करते. कार्यालयीन कामासाठी आणि दैनंदिन जीवनात जगताना त्याचा निश्चितच उपयोग होतो. ते याठिकाणी अनुभवयास येते. म्हणून प्रत्येकाने हा अनुभव घेतल्यास निश्चितच उपयोगी, फलदायी राहील, एवढे मात्र निश्चित !

प्रशिक्षणासाठी आवश्यक

1. ऑनलाईन नोंदणी (http://www.dhamma.org)

2. संस्थेचा कोर्स निश्चित झाल्याचा इ-मेल (कन्फर्मेशन)

3. ओळखपत्र, दोन पासपोर्ट फोटो

4. गजर घड्याळ

5. टॉर्च

6. पावसाळ्यात छत्री, रेनकोट

7. हिवाळ्यात गरम शाल

8. लागणारी औषधी (मात्र शिक्षकांची परवानगी घ्यावी)

लेखक: श्याम टरके

माहिती स्रोत: महान्युज