सातपुड्याचा दुर्गम भागात आज देखील केवळ आदिवासींचे वास्तव्य आहे. यावल अभयारण्याचा एक भाग असलेल्या या दुर्गम भागात जाऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुक्काम करीत आदिवासींसोबत दिवाळी साजरी केली. मंत्री महाजन यांनी भेटी दिलेली जामन्या, गारखेडा, उसमळी, लंगड्या आंबा या आदिवासी पाड्यांना भेट दिली. भेटी नंतर तेथील परिस्थिती पाहून हे पाडे विकासासाठी दत्तक घेत असल्याचे श्री. महाजन यांनी जाहीर केले. आणि सातपुड्याच्या दुर्गम भागात दिवाळी साजरी करणारे गिरीश महाजन हे अशा रितीने पहिलेच मंत्री ठरले.

श्री. महाजन यांनी गतवर्षीची दिवाळी पालघर तालुक्यातील आदिवासींसोबत साजरी केली होती. तेथील कुपोषणाचे व इतर प्रश्न यानिमित्ताने जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. यंदा निसर्ग संपन्न लेणं लाभलेल्या सातपुड्यातील यावल अभयारण्यातील गारखेडा, जामन्या, उसमळी, लंगड्या आंबा परिसरातील दुर्गम भागात जाऊन तेथील वाड्या पाड्यावरील आदिवासींसोबत दिवाळी साजरी केली आणि आदिवासींची दिवाळी संस्मरणीय ठरली.

गारखेडा येथे श्री. महाजन तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी जामनेरच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन व कुटूंबियासमवेत आगमन झाले. यावेळी तेथील आदिवासींनी पारंपरिक नृत्य करीत महाजन परिवाराचे स्वागत केले. सौ. महाजन यांना आदिवासी महिलांनी औक्षण केले. त्यानंतर आदिवासींनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्यात महाजन परिवारही सहभागी झाला. तसेच मंत्री महाजन यांनी यावेळी ढोल वाजविण्याचाही आनंद घेतला. त्याचबरोबर तीरकामठा हाती घेत अचूक नेमबाजी करीत महाजनांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्क्का दिला. या चारही पाड्यांना महाजनांनी भेटी दिल्यानंतर आदिवासींशी चर्चा केली. व तेथील प्रश्न जाणून घेतले. शासकीय योजनांचा लाभ मिळतो की नाही याची देखील महाजनांनी पाड्यांना दिलेल्या भेटीत विचारणा केली. रस्ते नसल्याने या भागात फिरणे कठीण असल्याचे आदिवासींनी सांगताच वन विभागात पक्के रस्ते करताना येणाऱ्या अडचणीवर मात करण्याचेही यावेळी श्री. महाजन यांनी सांगितले.

श्री. महाजन यांनी रात्री उसमळी येथे मुक्क्काम केला. रात्री आदिवासींसोबत डाळ -भाकरीचे जेवण घेतले. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचा सर्वांनी आनंद घेतला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी सर्व आदिवासींना दिवाळी निमीत्त मिठाई भेट दिली. यावेळी आपण भेट दिलेली चारही गावांचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईल रेंज देखील नसलेल्या सातपुड्याच्या दुर्गम भागात जाऊन तेथे दिवाळी साजरी करणारे श्री महाजन हे पहिले मंत्री ठरले.

लेखक - विजय पाठक, जळगाव (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

माहिती स्रोत : महान्यूज