विनामूल्य अन्न मिळण्याचे ठिकाण. धर्मात अन्नदानाचे महत्व नेहमीच अधिक मानण्यात आले आहे. विशेषतः तीर्थक्षेत्री अन्नदान केल्याने महत्पुण्य लाभते अशी भावना आहे. या भावनेने प्रेरित होऊन काही दयाळू श्रीमंत लोकांनी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अन्नछत्रे उघडण्याची व ती व्यवस्थित चालविण्याकरिता कायम स्वरूपाची आर्थिक व्यवस्था ठेवण्याची जुनी प्रथा आहे. अशी अन्नछत्रे काही ठिकाणी आजही अस्तित्वात आहेत. अलीकडे धार्मिक वृत्ती कमी झाल्यामुळे अन्नछत्रे कमी होत आहेत; परंतु भूकंप, महापूर किंवा परचक्र यांमुळे झालेल्या आपद्ग्रस्त व निर्वासित यांच्याकरिता सरकार अगर इतर संस्थांमार्फत अन्नछत्रे आजही उघडली जातात.

अन्नछत्रांचा उपयोग विद्यार्थी, गोरगरीब, संन्यासी, साधू, यात्रेकरू, निराश्रित व इतर गरजू लोकांना नेहमीच होत आला आहे. या दृष्टीने अन्नछत्राची उपयुक्तता मान्य केली, तरी त्यामुळे परावलंबित्व व आळसाची प्रवृत्ती वाढते; त्याचप्रमाणे नेहमीच सत्पात्री दान पडेल याचीही निश्चिती नाही.

केवळ भूतदयेने प्रेरित होऊन अन्नदान केल्याने गरीब व निराधार लोकांचा प्रश्न कायमचा सुटणारा नाही ; त्यांच्यात स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न होण्याची जरूरी आहे, असे काही समाजधुरिणांचे मत आहे.

लेखक: पु. ल. भांडारकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश