प्रस्तावना आज कुटुंबात इंटरनेट गरजेचे झाले आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य घरातील कॉँप्यूटर आणि मोबाइल फोन वापरत असतो, विशेषतः लहान आणि कॉलेजातली मुलेमुली. कॉँप्यूटर आणि इंटरनेटमुळे संपूर्ण जगच आपल्या घरात येते. ह्यातून आपल्याला बातम्या कळतात, माहिती शोधता येते, ऑनलाइन शॉपिंग करता येते, तिकिटे काढता येतात, गाणी ऐकता येतात, गेम खेळता येतात आणि मित्रमैत्रिणींना इमेलही पाठवता येते. इंटरनेटवरून शोधण्याच्या आणि शिकण्याच्या अनंत संधी मिळतात. परंतु नेटवरची सर्वच माहिती आणि संसाधने सुरक्षित आणि भरवशाची नसतात हे लक्षात ठेवा. आपला आणि आपल्या कुटुंबाचा इंटरनेटचा वापर सुरक्षित, नव्या गोष्टी शिकवणारा आणि आनंददायक असल्याची खात्री करून घ्या. ऑनलाइन शॉपिंग, सॉफ्टवेअर किंवा फाइल्स उतरवणे (डाउनलोड करणे) अशांसारख्या बाबींची सर्व कुटुंबियांसोबत चर्चा करा आणि ही कामे लहान मुले करत असल्यास त्यांच्यावर नजरही ठेवा. ह्यामुळे आपली वैयक्तिक तसेच आर्थिक माहिती सुरक्षित आणि गुप्त राहील. इंटरनेटची रचना मुळात माहितीचे स्त्रोत, संसाधने आणि लोकांना एकत्र आणण्यासाठीच केलेली असल्याने काही व्यक्तींचा आपल्या कॉँप्यूटर सिस्टिममध्ये प्रवेश होण्याचा धोका असतो. ह्याशिवाय धोक्याच्या इतरही शक्यता असतात, उदा. आपण इंटरनेटचा वापर कशासाठी करता ह्यावर काही कंपन्या लक्ष ठेवतात. आपला नेटवरचा वावर आणि वापर संपूर्णपणे सुरक्षित असल्याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही पण आपले आणि आपल्या कुटुंबाचा नेटवरील वावर सुरक्षित करण्यासाटी आपण बरेच उपाय करू शकता. इंटरनेट हा माहितीचा आणि सल्ल्याचा अतिशय चांगला स्त्रोत असला तरी त्यावरील प्रत्येक बाबीवर विश्वास ठेवायचा नसतो. इंटरनेटवर कोणीही कोणतीही माहिती ठेवू शकते आणि सगळीच माहिती खरी किंवा खात्रीची नसते. माहिती ठेवणार्या काही व्यक्ती आणि संस्था ती खरी असल्याची खात्री करून घेतात परंतु काही लोक मुद्दामच खोटी माहितीही नेटवर ठेवतात. आपण तसेच आपल्या कुटुंबियांनी, नेटचा वापर करताना, खालील मुद्दे ध्यानात ठेवणे महत्त्वाचे आहे: ऑनलाइन माहिती गुप्त किंवा व्यक्तिगत ठेवणे साधारणपणे अवघड असते. लोक त्यांच्या ऑनलिन प्रतिमेत जसे दिसतात तसे प्रत्यक्षात असतातच असे नाही. कोणीही व्यक्ती नेटवर माहिती ठेवू शकते. ऑनलाइन दिसणारी प्रत्येक बाब खरी किंवा विश्वासपात्र नसते. वेबवरील विघातक, अश्लील, लैंगिक (बाल-लैंगिक देखील), जातीय, अपमानास्पद किंवा हिंसक स्वरूपाचा मजकूर अनपेक्षितपणे आणि आपला तसा हेतू नसतानाही आपल्यासमोर तसेच आपल्या कुटुंबियांसमोर येऊ शकतो. म्हणूनच ISEA-जागृती कार्यक्रमामधून सर्व कुटुंबाला उपयुक्त असलेल्या सूचना आणि सल्ले नेहमीच दिले जातात. ऑनलाइन चॅटिंग, शॉपिंग, फाइल्स अथवा गेम्स किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करणे, सोशल नेटवर्कमध्ये सहभाग अशी कामे करताना सुरक्षित राहण्यासाठी खालील पायर्यांचे कृपया पालन करा. पायरी 1 : Secure your home Wi-Fi network. आपल्या घरात वायफाय असेलच आणि ते वापरून, घरातून कोठूनही, आपले कुटुंबीय इंटरनेटवर जाऊ शकत असतील. अशा वेळी नेट आणि त्यावरील माहितीवर नियंत्रण ठेवणे आपल्यासाटी अवघड असते. हे कनेक्शन पुरेसे सुरक्षित नसले तर नेटवरचे घुसखोर आपली बॅँडविड्थ वापरतील किंवा आपल्या उपकरणांमध्ये मालवेअर (घातक सॉफ्टवेअर) टाकून आपल्या नेटच्या सुरक्षेवर हल्ला करतील. ह्याशिवाय इतरांच्या सिस्टिम्स किंवा संसाधनांवर हल्ला करण्यासाठी ते आपल्या सिस्टिमचा किंवा उपकरणाचा वापर करू शकतात. मूळ (डीफॉल्ट) ऍडमिन पासवर्ड बदलून त्याजागी अधिक सुरक्षित पासवर्ड घाला. आपले वायफाय उपकरण अत्यंत सुरक्षित असल्याची खात्री करा आपल्या राउटरवर पोचण्यासाठी गुंतागुंतीचा पासवर्ड वापरा. अपरिचित व्यक्तींना आपले नेटवर्क वापरता येऊ नये ह्यासाठी वायरलेस एन्क्रिप्शन सक्रिय करा. काही विशिष्ट उपकरणांनाच आपल्या वायरलेस नेटवर्कवर पोचण्याची परवानगी द्या. नेटवर्कशी जोडल्या जाणार्या प्रत्येक उपकरणाला एक अद्वितीय असा मीडिया ऍक्सेस कंट्रोल (MAC) ऍड्रेस दिलेला असतो. त्यांचाच वापर करा. अयोग्य मजकूर असलेल्या तसेच गरज नसलेल्या वेबसाइट्सपासून दूर राहण्यासाठी फिल्टर्सचा वापर करा. पायरी 2 : कुटुंबातील मुले तसेच इतरांना कॉँप्यूटर वापरण्यासाठी सामाईक जागा ठरवा घरातील ज्या खोलीमध्ये कुटुंबीय नेहमीच जमतात तिथेच घरातील कॉँप्यूटर ठेवणे मुलांच्या आणि ज्येष्ठांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ह्यामुळे आपण त्या कॉँप्यूटरच्या वापरावर देखरेख करून इंटरनेटचे व्यवहार सुरक्षित ठेवू शकाल. मुलांनी किती तास कॉँप्यूटर वापरला हे तर ह्याद्वारे आपल्याला कळू शकतेच शिवाय कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना इंटरनेटसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या गोष्टी शिकता येतील. पायरी 3: कुटुंबियांनी इंटरनेट वापरण्याबाबतचे नियम ठरवून द्या कुटुंबियांना इंटरनेटच्या सुरक्षित वापराच्या संदर्भात मदत करण्याचा एक मार्ग म्हणजे काही नियमांचे पालन करण्यास स्पष्टपणे सांगणे. कॉँप्यूटर, स्मार्टफोन, टॅबलेट आणि अशीच इतर उपकरणे वापरताना खालील नियमांचा वापर केल्याने फायदा होऊ शकेल: आपल्या कुटुंबियांनी, विशेषतः लहान मुलांमुलींनी, इंटरनेट वापरण्यापूर्वी आपली परवानगी घेणे. कॉँप्यूटर आणि इतर उपकरणांच्या वापराचा कालावधी (दर दिवशीचा किंवा दर आठवड्याचा) तसेच दिवसाच्या कोणत्या वेळेत वापर करावा हे ठरवून देणे. लहान मुलांनी सोशल मीडियाचा वापर करण्यास आपली हरकत नसली तर त्यांना विशिष्ट साइट्स ठरवून देणे. आपली मुले वापरत असलेल्या सोशल नेटवर्किंग साइट्समध्ये आपणही सहभागी होणे. ह्यामुळे ते शेअर करीत असलेल्या बाबींवर आपले लक्ष राहील. ऑनलाइन भेटणार्या खूपश्या व्यक्ती अपरिचित असतात ह्याची कुटुंबियांना जाणीव करून द्या ऑनलाइन भेटणार्या फ्रेंडबरोबर कितीही वेळा चॅटिंग केले, त्याला नीट ओळखतो असे कितीही वाटले तरी शेवटी ऑनलाइन भेटलेली व्यक्ती आपल्याला अपरिचितच असते हे लक्षात ठेवावे. ऑनलाइन असताना स्वतःची ओळख लपवणे किंवा खोटी ओळख निर्माण करणे सहज शक्य असते. ही बाब विशेषतः लहान मुलांनी द्यानात ठेवावी कारण त्यांचा नवा ऑनलाइन फ्रेंड म्हणजे त्यांच्याच वयाचा मुलगा/मुलगी नसून एखादी चाळीसपन्नास वर्षाची व्यक्तीही असू शकते. ह्या गोष्टीच्या गांभीर्याची कुटुंबियांना जाणीव करून द्या पायरी 4 : ऑनलाइन सुरक्षेची गरज ध्यानात घेऊन त्याप्रमाणे मर्यादा आखून द्या कॉँप्यूटर आणि इंटरनेट वापरण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य वेगळ्या मार्गाचा अवलंब करू शकतो. ह्यासाठीच ह्या वापराबद्दलचे नियम आणि मर्यादा, विशेषतः खालील बाबींच्या संदर्भात, सर्व सदस्यांकडून स्पष्टपणे मान्य करून घ्या पाहण्यासाठी योग्य असलेल्याच वेबसाइट्सवर पोचणे, ज्यांवर देखरेख/नियंत्रण असू शकते अशा चॅटरूम्स किंवा फोरम्स वापरणे स्वतःची खरी ओळख उघड न करणारी किंवा सूचक नसलेली यूझरनेम्स तयार करणे ऑनलाइन खात्यांसाठी सुरक्षित, अद्वितीय आणि तरीही सहज लक्षात ठेवण्याजोगे पासवर्ड तयार करणे नावे, फोन नंबर ह्यांसारखी संवेदनशील आणि कुटुबियांची ओळख पडवणारी माहिती कधीही शेअर किंवा पोस्ट न करणे अयोग्य तसेच स्वतःची ओळख पटवू शकणारे (उदा. शहराचे नाव किंवा शाळेचे चिह्न दाखवणारे कपडे इ.) फोटो नेटवर पोस्ट न करण्याची खबरदारी सर्वांनीच घेणे) ऑनलाइन ओळख झालेल्या व्यक्तीची, कुटुंबियांना कल्पना न देता, प्रत्यक्ष भेट घेणे टाळणे अपरिचितांकडून आलेल्या इमेल्स तसेच ऍटॅचमेंट्स न उघडणे तसेच त्यांना प्रतिसाद न देणे नेटवरून नजर ठेवली जाणे (सायबर स्टॉकिंग), नेटवरून त्रास किंवा धमक्या दिल्या जाणे (सायबर बुलिइंग) अशांसारख्या त्रासदायक घटना किंवा इंटरनेटसंबंधी इतर काही विचित्र प्रसंग घडल्यास कुटुंबियांना लगेच त्याबाबत माहिती देऊन चर्चा करणे गुप्ततेचे नियम पाळा फेसबुक, गूगल+ ह्यांसारख्या वेबसाइट्स किंवा सोशल नेटवर्कवर आपणांस खाते उघडायचे असल्यास आपल्याबाबतची मूलभूत माहिती द्यावी लागते. अशा साइट्सचे स्वतःचे गुप्ततेचे नियम असतात, त्यांना प्रायव्हसी पॉलिसी असे म्हणतात. आपल्याला किंवा आपल्या कुटुंबियांपैकी कोणाला एखादे नवीन नेटवर्क जॉइन करायचे असल्यास त्याची प्रायव्हसी पॉलिसी काळजीपूर्वक वाचा, ज्यायोगे आपणांस कळेल की त्या नेटवर्कचे प्रवर्तक आपण दिलेल्या माहितीचा उपयोग करणार आहेत काय आणि केला तर कशाप्रकारे. त्याचप्रमाणे नेटवरील ओळख चोरली जाणे किंवा फिशिंगसारख्या – सुरक्षेला घातक असलेल्या – घटना टाळण्यासाठी त्यांच्याकडून कोणती खबरदारी घेतली जात आहे हेदेखील समजून घ्या पायरी 5: योग्य ऑनलाइन वर्तणुकीसाठी कुटुंबियांमध्ये करार आणि ऑनलाइन प्रतिज्ञाही करून घ्या ऑनलाइन वर्तणुकीबद्दल करार करून घ्या. ह्यामुळे सर्व कुटुंबियांदरम्यान कॉँप्यूटर आणि इंटरनेटच्या योग्य वापराबद्दल जाणीव निर्माण होईल व सर्वजण सुरक्षितपणे इंटरनेट वापरू शकतील. कुटुंबियांनी कॉँप्यूटर आणि इंटरनेट सुरक्षिततेची प्रतिज्ञा करावी अशी आम्ही शिफारस करतो. कुटुंबियांनी कॉँप्यूटर आणि इंटरनेट सुरक्षिततेची प्रतिज्ञा करावी अशी आम्ही शिफारस करतो प्रतिज्ञा कॉँप्यूटर व इंटरनेट ही साधने ज्ञान आणि माहिती मिळवणे, काम करणे, चॅट तसेच करमणुकीसाठी महत्त्वाची असल्यामुळे ती गमावण्याची वेळ येऊ नये ह्यासाठी आणि स्वतःच्या व कुटुंबाच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी मी खालील मुद्दे मान्य केले आहेत कॉँप्यूटर आणि इंटरनेट वापरताना मी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळीन मी माझी ओळख कोणालाही सांगणार नाही (फोन नंबर, पत्ता, पासवर्ड इ.) ऑनलाइन परिचय झालेल्या कोणालाही मी स्वतः कधीही प्रत्यक्ष भेटणार नाही. भेटण्याची वेळ आलीच तर कुटुंबियांसोबतच भेटेन कोणतेही साधन वापताना मला असुरक्षित वाटल्यास किंवा काही विचित्र अथवा असाधारण अनुभव आल्यास मी माझ्या कुटुंबियांना (आईवडील / पालक / शिक्षक) त्याबद्दल सांगून त्यांच्याकडून मदत मिळवेन मी स्वतःला, माझ्या कुटुंबियांना आणि देशालाही सायबर-सुरक्षित ठेवण्यासाठी ह्या प्रतिज्ञेचे पालन करेन. मुलाने / मुलीने अशी मदत मागितल्यास आईवडील / पालक / शिक्षक ह्या नात्याने आम्ही समस्या सोडवण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न करू पायरी 6 : आपला कॉँप्यूटर सुरक्षित बनवा घुसखोर (हॅकर्स), क्रॅकर्स आणि नेटवरची ओळख चोरणारे लोक आपली व्यक्तिगत माहिती आणि आपल्याकडील पैसेही चोरण्याचा प्रयत्न करत आहेत काय? हे टाळण्यासाठी आपण पावले उचलू शकता – उदा. ऑपरेटिंग सिस्टिमपासून ऍप्लिकेशन्सपर्यंतचे आपले कॉँप्यूटर सॉफ्टवेअर अद्यावत ठेवणे. असे लोक आपल्या कॉँप्यूटरवर हल्ला करण्याचे नवेनवे मार्ग सतत शोधत असल्यामुळे नवीन धोक्यांना अटकाव करण्यासाठी आपल्या कॉँप्यूटरची ऑपरेटिंग सिस्टिम आणि सिक्युरिटी सॉफ्टवेअर अद्यावत असणे आवश्यक आहे. पूर्वीच्या तुलनेमध्ये आजच्या ऑपरेटिंग सिस्टिम्स खूपच आधुनिक तसेच भरपूर सुविधा देणार्या आणि त्यामुळे वापरकर्त्याला अतिशय उपयुक्त आहेत हे खरे असले तरी त्या सायबर-हल्ल्याला चटकन बळी पडू शकतात. हे टाळण्याची पहिली पायरी म्हणजे आपण वापरत असलेल्या ऑपरेटिंग सिस्टिमसाठीच्या (Windows, Linux, MAC किंवा अन्य कोणतीही) नवीनतम सिक्युरिटी अपडेट्स आणि पॅच आपल्याकडे आहेत ना हे तपासणे. आपण आपल्या ऑपरेटिंग सिस्टिमसाठीच्या सिक्युरिटी अपडेट्स स्थापित (इन्स्टॉल) केल्यानंतर आपण इन्स्टॉलेशनसाठी रीस्टोअर पॉइंट तयार केल्याची खात्री करा. ऑपरेटिंग सिस्टिमची स्थापना तयार झाल्याबरोबर आपण हा रीस्टोअर पॉइंटही तयार करू शकता. ह्याला क्लीन इन्स्टॉलेशन असे नाव द्या. ह्या टप्प्यानंतर आपण ड्रायव्हर्सची तसेच ऍप्लिकेशन्सची स्थापना सुरू ठेवू शकता.एखाद्या ड्रायव्हरमुळे सिस्टिममध्ये समस्या उद्भवत असल्यास आपण क्लीन इन्स्टॉलेशन पॉइंटवर परत जाऊ शकता. पायरी 7 :आपले सॉफ्टवेअर अद्यावत ठेवा फक्त ऑपरेटिंग सिस्टिमच नाही तर आपण वापरत असलेले सॉफ्टवेअरही अद्यावत असणे गरजेचे असते. त्यामुळे मुख्य प्रोग्रॅम्स आणि ऍप्लिकेशन्सच्या अपडेट्स व सिक्युरिटी पॅच आपल्याकडे असल्याची कात्री करा. जावा, ऍडोब फ्लॅश, ऍडोब शॉकवेव्ह, ऍडोब ऍक्रोबॅट रीडर, क्विकटाइम ह्यांसारख्या लोकप्रिय सॉफ्टवेअर्समध्ये आणि क्रोम, मॉझिला फायरफॉक्स, इंटरनेट एक्स्प्लोरर इत्यादी लोकप्रिय वेब-ब्राउझर्समध्ये घुसण्याचा प्रयत्न हॅकर्स करतात ही वस्तुस्थिती आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचे लक्ष असा बाबींकडे नेहमीच असल्यामुळे स्थापन केलेला प्रत्येक प्रोग्रॅम किंवा सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी फक्त आपल्या स्मरणशक्तीवर विसंबून राहू नका. व्हायरस, हॅकर्स आणि स्पायवेअरपासून आपला कॉँप्यूटर सुरक्षित ठेवण्यासाठी त्यामध्ये सिक्युरिटी सॉफ्टवेअर असल्याची खात्री करा. हे सॉफ्टवेअर वारंवार अद्यावत करत रहा कारण नवीन धोके दररोजच उद्भवत असतात. स्वतःला आपोआपच अद्यावत ठेवणारे सिक्युरिटी सॉफ्टवेअर आपण वापरावे हे उत्तम पायरी 8 : मालवेअर आणि संभाव्य अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी ऍँटिव्हायरस व डेस्कटॉप फायवॉल सोल्यूशन्स स्थापन करा मालवेअर आणि अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी ऍँटिव्हायरस, डेस्कटॉप फायरवॉल सोल्यूशन्स स्थापन करा. सुरक्षेचे हे उपाय नामवंत आणि दर्जेदार उत्पादक किंवा विक्रेत्यांकडूनच खरेदी करा. ह्या सुरक्षा-यंत्रणेमध्ये रिअलटाइम स्कॅनिंग, ऑटो-अपडेट आणि फायरवॉल फंक्शनॅलिटीचा समावेश असल्याची खात्री करा कारण ह्यांमुळे आपल्या कॉँप्यूटरमधील अनधिकृत क्रियांवर नियंत्रण राहील आपला कॉँप्यूटर व त्यामधील माहिती (डेटा) च्या सुरक्षिततेसाठी आपण बसवलेल्या सिक्युरिटी सॉफ्टवेअरमध्ये कमीतकमी हे तीन घटक असलेच पाहिजेत – ऍँटिव्हायरस, ऍँटि-स्पायवेअर आणि फायरवॉल. पेरेंटल कंट्रोल चा वापर करा विक्रेत्यांकडील बर्याच सुरक्षा-यंत्रणांमध्ये पेरेंटल कंट्रोलची सोय असते. ही वापरून आपण नेटवरून कॉँप्यूटरमध्ये येणार्या अयोग्य मजकुराला आणि अन्य बाबींना चाळणी (फिल्टर) लावू शकता. ह्यामुळे मुलांचे ऑनलाइन हल्ले, अपरिचित व्यक्ती, अयोग्य मजकूर आणि इतर धोक्यांपासून संरक्षण होते. अर्थात ह्यामुळे सर्वच धोके नष्ट होत नसल्याने कुटुंबियांच्या नेटवरील व्यवहारांवर आपण वैयक्तिकरीत्या देखरेख ठेवणे आवश्यक आहेच पायरी 9 : सिस्टिमचा बॅकअप घ्या आपण ऑपरेटिंग सिस्टिम आणि सिस्टिम ऍप्लिकेशन अपडेट केलीत, सिस्टिम सुरक्षित ठेवण्यासाठी आणखी सुरक्षा-यंत्रणाही स्थापन केल्यात. ह्यामुळे घातक सॉफ्टवेअर्स आणि ऑनलाइन धोक्यांपासून आपण सुरक्षित राहाल परंतु आपल्या व्यक्तिगत माहितीला हार्डवेअरमधील समस्यांमुळेही धोका पोचू शकतो. माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आपण दुहेरी धोरण राबवले पाहिजे – ऑनलाइन बॅकअप सुविधा आणि एक्स्टर्नल हार्ड डिस्क ह्या दोन्हींचा वापर करणे. बॅकअप घेण्याला महत्त्व आहे कारण ह्यामुळे ऑनलाइन बॅकअप सर्व्हरशी आपल्या फाइल्स सिंक्रोनाइझ करून आपण आपल्याकडील माहितीला असणारे संभाव्य धोके टाळू शकता. ह्यामधून एन्क्रिप्शन ची क्षमताही मिळते. पायरी 10 : कुटुंबियांसाठी वेगवेगळे स्टॅँडर्ड यूझर अकाउंट वापरा आधुनिक ऑपरेटिंग सिस्टिम्सकडून आपणांस काही हक्क आणि फायदे मिळतात. हे आपल्या यूझर अकाउंटच्या स्वरूपावर अवलंबून असतात. आपले खाते स्टॅँडर्ड यूझर अकाउंट किंवा ऍडमिनिस्ट्रेटर यूझर अकाउंट प्रकारचे असू शकते. कुटुंबियांनी त्यांच्या कॉँप्यूटर-वापरासाठी शक्यतो स्टॅँडर्ड यूझर अकाउंट वापरावे. असे अकाउंटधारक कॉँप्यूटरच्या कार्यात बदल घडवून (उदा. सिस्टिममधील अत्यावश्यक फाइल्स डिलीट करणे इ.) इतरांच्या वापरावर परिणाम शकत नाहीत. उदा. आपण एखादे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्यापूर्वी किंवा सुरक्षा-व्यवस्थेत बदल करण्यापूर्वी सिस्टिम आपणांस ऍडमिनिस्ट्रेटर किंवा रूट अकाउंटची माहिती विचारेल स्टॅँडर्ड अकाउंट वापरल्याने, त्या विशिष्ट अकाउंटमध्ये घुसलेले मालवेअर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा रूट अकाउंटवर हल्ला करणार्या मालवेअरच्या तुलनेमध्ये, कमी नुकसान घडवू शकते. ह्यामुळे आपण कॉँप्यूटरच्या वापरकर्त्यांच्या व्यवहारांवर नजर ठेवू शकता तसेच कुटुंबियांना सॉफ्टवेअर्सवर मिळणारा प्रवेशही नियंत्रित करू शकता. पायरी 11 : आपल्या खात्यांसाठी ओळखण्यास अवघड तरीही लक्षात ठेवण्यास सोपे असलेले पासवर्ड तयार करा. आपण वापरत असलेला पासवर्ड अगदीच साधा-सोपा असल्यास हॅकरला आपल्या ऑनलाइन खात्यात घुसून त्यातील माहिती किंवा आपली ओळख चोरणे सोपे जाते. प्रत्येक ऑनलाइन अकाउंटसाठी मजबूत, अद्वितीय आणि तरीही सहज लक्षात राहण्याजोगा पासवर्ड वापरणे आणि तो नियमितपणे बदलणे हा इंटरनेटवरील सुरक्षिततेचा एक मूलभूत नियम आहे. ह्यासाठी हा पासवर्ड लांब (किंमान ८ वर्णाक्षरांचा), मिश्र अक्षरे – आकडे – चिह्नांचा असावा. त्याचप्रमाणे जिथे सुरक्षाविषयक प्रश्नाची (सिक्युरिटी क्वेश्चन) सुविधा पुरवलेली असते त्या प्रश्नाचे उत्तर त्यामध्ये असावे आणि ते उत्तर फक्त आपणांसच माहीत असावे. आपल्या कुटुंबियांना ही पद्धत शिकवा मजबूत, अद्वितीय आणि तरीही सहज लक्षात राहण्याजोगे पासवर्ड तयार करण्यासाठी प्रत्येक पासवर्ड कमीतकमी ८ वर्षाक्षरांचा असला पाहिजे अक्षरे, आकडे आणि चिह्नांचा एकत्रित वापर करा (कीबोर्डवरच्या सर्व कीज् वापरा, कॅपिटल आणि स्मॉल अक्षरांसहित). एखादा पासवर्ड दीर्घकाळाने ओळखू येण्याची शक्यता टाळण्यासाठी ते नियमितपणे बदलत रहा. सोपे तरीही मजबूत पासवर्ड बनवण्याच्या काही युक्त्या : सहज लक्षात राहणारे हे एक वाक्य पहा: "I love my child who always invites me with her great smile" (आय लव्ह माय चाइल्ड हू आल्वेज इन्व्हाइट्स मी वुइथ हर ग्रेट स्माइल)- Ilmcwaimwhgs" (वाक्यातील प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर घेतले आहे) आता ह्यामधील एकाआड एक अक्षरे कॅपिटल करा - ILmCwAiMwHgS (हा पासवर्ड आता अधिक सुरक्षित झाला) आता ह्यामध्ये पुढील अक्षरांच्या जागी इतर आकडे किंवा चिह्ने घाला - i=!, g=9, s=$, (ही चिह्ने आपणांस लक्षात ठेवावी लागतील). आता आपला ?IlmCwA!MwH9$ हा पासवर्ड अधिकच मजबूत झाला आहे$ वेगवेगळ्या खात्यांसाठी अद्वितीय पासवर्ड बनवण्यासाठी नेहमीच्या वापरातील शब्दांची रूपे बदला. उदा shopping - $h0pp!n9 (S =$, i=!, g=9, o=0) banking - bank!n99 (one more 9 is added as "banking" is with 7 letters) Social Network - $0c!alNetw0rK Windows -w!nD0W$9 GNULinux - 9NuL!NuX आपण वापरीत असलेली चिह्ने आणि बदललेले शबद् कोणालाही सांगू नका त्याचप्रमाणे आपले यूझरनेम देखील अपरिचितांना सांगू नका. अर्थात इतरांना आपले यूझरनेम माहीत नसून फक्त पासवर्डच माहीत असेल तर त्यांना त्याचा उपयोग नाहीच. आपल्या आयडी (IDs) अशा प्रकारे बनवा की त्यांमधून आपली ओळख स्पष्ट होणार नाही उदा. आपले नाव श्री. सी ए एस मूर्ती (Mr Ch A S Murty) असले तरchasmurty ह्या यूझर आयडीमधून आपली ओळख उघड होते. याउलट, murch9 अशी यूझर ID ठेवल्यास ओळख पटणार नाही. पायरी 12: इंटरनेटवर जाण्यापूर्वी आपला वेब ब्राउझर सुरक्षित करा आपण आणि इंटरनेटमधले संवाद-माध्यम (इंटरफेस) म्हणजे कॉँप्यूटरमधील इंटरनेट ब्राउझर. इंटरनेट वापरण्यापूर्वी हा ब्राउझर सुरक्षित करणे अतिशय महत्त्वाचे असते. आपण आपली ऑपरेटिंग सिस्टिम आणि ऍप्लिकेशन्स सुरक्षित केलीत परंतु ब्राउझरच्या सुरक्षेकडे लक्ष दिले नाहीत तर हे चोरांसाठी घराचा दरवाजा उघडा ठेवण्यासारखेच आहे कारण आपल्या कॉँप्यूटरमधून माहिती चोरण्यासाठी हल्लेखोर ब्राउझरचाच वापर करतात. ब्राउझरमार्फत सुरक्षितपणे इंटरनेट वापरण्यासाठी खालील गोष्टींचा पूर्णपणे अवलंब करा ब्राउझरचे नवीनतम (लेटेस्ट) किंवा अद्यावत (अप-टु-डेट) संस्करण (व्हर्जन) नेहमी वापरा ब्राउझर सेटिंगमधून सुरक्षिततेसाठी योग्य असलेलीच सेटिंग निवडा पॉपअप्स नेहमीच ब्लॉक करा आणि गरजेनुसार किंवा तात्पुरत्या स्वरूपात फक्त विश्वसनीय वेबसाइटसच उघडण्याची परवानगी द्या ज्या वेबसाइटसबाबत आपणांस खात्री नसेल तिच्यावरचे प्रायव्हेट ब्राउझिंग सेशन निवडू नका. पायरी 13:ऑनलाइन असताना सावध रहा आणि संशयास्पद लिंक्स उघडू नका आपण आपल्या कॉँप्यूटरचा माउस एकाद्या लिंकवर नेता आणि तिच्यावर तो दाबावा की नाही, ही लिंक आपल्याला योग्य स्थळावर घेऊन जाईल की नाही असा विचार करता तेव्हा...ती लिंक आपल्याला तसेच आपल्या कुटुंबियांना धोकादायक नाही ना हे तपासण्यासाठी लिंक नीट वाचा. उदा. आपणांस आपल्या पसंतीच्या "www.india.com", ह्या वेबसाइटवर जायचे असेल आणि लिंक "2wffer21.net", असे सांगत असेल तर ती क्लिक करण्याचा मोह टाळणेच उत्तम. बहुतेक वेळा लिंकसाठी लघुरूपे (शॉर्टनिंग सर्व्हिसेस) वापरली जातात – उदा. goo.gl किंवा tinyurl. परंतु काही वेळा अनोळखी लिंक क्लिक केल्याने आपण एखाद्या धोकादायक साइटवर पोचता आणि तेथून आपल्या कॉँप्यूटरमध्ये मालवेअर स्थापन केली जातात. पायरी 14: प्रत्येकाला सुरक्षित ब्राउझिंग मिळवून द्या, अगदी आजी-आजोबांनासुद्धा! ऑनलाइन असणार्यांना वेब ब्राउझिंग ही एक बाब नक्कीच चांगल्या प्रकारे करता येते. परंतु हे सायबर चोरांनाही माहीत असल्यामुळे ते तिचा फायदा घेतात. हे हल्लेखोर आपल्या सर्च रिझल्टमध्ये खोटे वेब-पत्ते बेमालूमपणे घुसवतात आणि आपण ह्या घातक वेबसाइट्सवर गेलात की एकतर आपली वैयक्तिक माहिती मिळवतात किंवा स्पायवेअर आणि मालवेअर डाउनलोड करण्यास भाग पाडतात. हे टाळण्यासाठीच आपण प्रभावी सेफ ब्राउझिंग यंत्रणा स्थापन करणे आवश्यक आहे पायरी 15 : फक्त विश्वसनीय स्त्रोतांकडूनच सॉफ्टवेअर डाउनलोड आणि इन्स्टॉल करा. इंटरनेटवर फुकट मिळणार्या (फ्री) गेम्स, म्यूझिक आणि सिनेमांची रेलचेल आहे. ही बाब कोणालाही – विशेषतः लहान मुलांना आणि अन्य कुटुंबियांना – मोहात पाडणारी असते. परंतु अशा काही फ्री वस्तूंमध्ये स्पायवेअर आणि इतर घातक सॉफ्टवेअर लपवलेली असतात आणि त्यांच्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाचेच इंटरनेटवरील व्यवहार धोक्यात येतात डाउनलोडिंग करण्यासाठीच्या विश्वसनीय स्त्रोतांची यादी करा आणि सर्व कुटुंबियांना तिचे पालन करण्यास सांगा. शिवाय कोणतेही नवीन सॉफ्टवेअर स्थापन करण्यापूर्वी त्यासोबतचे करारपत्र (लायसन्स ऍग्रीमेंट) नीट वाचा. तसेच कोणतीही नवीन बाब डाउनलोड किंवा इन्स्टॉल करण्यापूर्वी लहान मुलांना त्याबाबत आपली परवानगी घेण्यास सांगा. आपण ज्या वेबसाइट्सवरून ऑनलाइन व्यवहार करता त्यांच्या नावामध्ये (URL मध्ये) https:// हा मजकूर असल्याची खात्री करा. "https" मधील S चा अर्थ सेफ (सुरक्षित) असा आहे. बॅकेच्या किंवा दुकानाच्या ऑनलाइन ऍड्रेसमध्ये हा S असणे आवश्यक आहे. आपले कुटुंबीय किंवा कुटुंबातील आजी-आजोबा नेहमी ऑनलाइन खरेदी करीत असल्यास त्यांना इंटरनेट सुरक्षिततेचे हे प्रतीक नेहमी तपासण्यास सांगा आणि विश्वसनीय स्त्रोतांकडूनच खरेदी करण्याबाबत जाणीव द्या. त्यांना एखादे नवे भारी ऑनलाइन शॉप सापडले तर त्यांना त्या दुकानाची अधिक माहिती मिळवण्यास सांगा. https प्रमाणेच वेब-पत्त्यामधे दिसणारे कुलुपाचे चिह्न (लॉक सिंबॉल) आणि वैध क्लायंट सर्टिफिकेट देखील महत्त्वाचे असते. संदर्भ: - https://heimdalsecurity.com/blog/fresh-windows-installation-security-guide/- https://www.onguardonline.gov/articles/0009-computer-security#security- http://www.bullguard.com/bullguard-security-center/internet-security/security-tips/family-online-safety.aspx स्रोत : http://infosecawareness.in/family/