फेब्रुवारी २०१६मध्ये शिर्डी इथे झालेल्या सरपंच परिषदेत राज्यातल्या एक हजार सरपंचांसमोर अहमदनगर जिल्ह्यातल्या एका उपक्रमाचं खूप कौतुक झालं. सांडपाणीमुक्त गाव अभियान हा तो उपक्रम. आजवर जिल्ह्यातली दिडेशेच्यावर गावं सांडपाणीमुक्त झाली आहेत. सांडपाणीमुक्ती म्हणजे आजारांपासूनही सुटका! हे कसं घडलं? अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या अभियानाला तत्कालीन मुख कायर्कारी अधिकारी शैलेश नवाल यांनी पाठबळ दिलं. लोकांचं आरोग्य, गावस्वच्छता यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निमर्लग्राम, अलिकडेच सुरु झालेलं निर्मल भारत अभियान वगैरे सरकारी कार्यक्रम आहेतच. पाणी व स्वच्छता विभागाचा कारभार हाती आल्यावर उज्ज्वलाताईंच्या लक्षात आलं की साथीचे आजार होतात डासांमुळे आणि डास तयार होतात सांडपाण्यात. तेव्हा सांडपाणी हे आजाराचं मुख्य कारण दूर केलं पाहिजे. दिवंगत कम्युनिस्ट नेते भि. र. बावके हे उज्ज्वलाताईंचे वडील. वडिलांकडून लाभलेला समाजसेवेचा वारसा प्रशासकीय सेवेत काम करताना त्यांनी जपला आहे. उज्ज्वलाताईंनी वैयक्तिक शौचालयाच्या कामाला प्राधान्य दिलं. नगरमधल्या अकोले तालुक्याच्या डोंगराळ आदिवासी भागातही शौचालय बांधणीची मोहीम सुरु केली. लोकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. कमी खर्चाचा, पीव्हीसी पाईपच्या शोषखड्डयाचा नगर पॅटर्न आता इतरत्रही वापरला जातो. बंदीस्त गटार योजने्त मुख्य गटारात पिव्हीसी पाईप टाकला जातो. त्याला परिसरातील सर्व सांडपाणी पाणी वाहून नेणारे पाईप जोडले जातात. सांडपाणी एकत्र यावे म्हणून जागोजागी अोटे केले अाहेत. गावांतील सगळं सांडपाणी गावाबाहेर एका जागी जमा करुन त्याचा विनियोग केला जातो. जागा उपलब्ध असलेल्या भागात प्रत्येक कुटुंबाने शोषखड्डा करुन त्यात सांडपाणी जिरवलं जातं. जागेचा अभाव असल्यास चार-पाच कुटुंबाचं सांडपाणी एकत्र करुन साठवलं जातं. वैयक्तिक, एकत्रित असे नगर जिल्ह्यात आतापर्यत चाळीस हजाराच्या वर शोषखड्डे झाले. ज्या गावांत अभियान पोचलं ती गावं स्वच्छ, चकाचक होत गेली. त्याबरोबर डास नाहीसे झाले, हे सांगायला नकोच. यापैकी सात गावांत गावांतल्या सांडपाण्यावर चक्क शेती केली जात आहे.बंदीस्त गटारातून गावांतील सांडपाणी बाहेर काढल्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवडगाव पहिल्यांदा सांडपाणीमुक्त झालं. तिथे एका शेतकरयाने सांडपाण्यावर दुष्काळातही शेती केली. शेवगाव तालुक्यातील अमरापूरला सांडपाणी एका शेततलावात साठवून सुमारे दोन एकर शेती करुन उत्पादन घेतलं. जामखेड तालुक्यातील पोतेवाडीसह सुमारे शंभर गावांत शौषखड्ड्यांमुळे पाणीपातळी वाढली अाहे. सांगवी भुसार (ता. कोपरगाव), टाकळीमियॉं (ता. राहुरी) इथे सांडपाण्यावर शेती आणि रायतेवाडी (ता. संगमनेर) इथे तर सांडपाण्यावर अळूचं पीक घेतलं जात आहे. हे राज्यात पहिल्यांदाच घडत आहे. गावांना मिळालेली बक्षिसांची रक्कम, १३ आणि १४व्या वित्त आयोगाने उपल्ब्ध केलेला निधी पिव्हीसी पाईप खरेदीसाठी वापरला जातो. या नगर पॅटर्नमुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनही खड्ड्यांची कामं करायला सरकारने सगळीकडेच परवानगी दिली आहे. लोकसहभाग तर आहेच. कमी खर्चात बंदिस्त गटारं, सामूहिक शोषखड्डे हे नगरचं वैशिष्ट्य ठरलं आहे. लेखक - सूर्यकांत पाटील, नगर