वारीचा सातबारा ! काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या षडरिपूंवर वार करणे म्हणजे वारी. षडविकारांच्या शक्तीचे नियमन व उन्नयन करण्याची साधना म्हणजे वारी. खाण्या-पिण्याच्या संयमाबरोबरच मनोबल, सहिष्णुता, सकारात्मक आचार-विचार-उच्चार अंगी धारण करण्यासाठीची कार्यशाळा म्हणजे वारी. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेसाठी, तन-मन-धन या त्रयीला सुचिर्भूत करण्यासाठी करायची असते वारी. शक्ती-संपत्ती-वेळ या त्रयीचे सृजनात्मक समर्पन म्हणजे वारी. शुद्ध, पवित्र, निर्मळ व समर्थ शरीरातील तितक्याच शुद्ध, पवित्र, निर्मळ व समर्थ अंत:करणातच पंढरीचा सावळा विठू वास करीत असतो. त्या जिवा-शिवाची भेट घडवण्यासाठीच करायची असते वारी. कुठल्याही उपक्रमांवर दूर बसून टिका करणारे घटक समाजात असतातच. रिकामटेकडे, ऐतखाऊ, अजागळ-अमंगळ, हौसे-गवसे-नवसे यांची भाऊगर्दी म्हणजे वारी, अशी टिका दबक्या आवाजात होत असते. परंतु असे घटक तर सर्वच क्षेत्रांत असतात. म्हणून वारकर्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे, असे मुळीच नाही. वारीच्या काळात वारकर्यांना अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेता येतील. आपापल्या वारी मार्गांवर वृक्षारोपन करता येईल. पांडुरंगाच्या नावाने लावलेल्या झाडांच्या संगोपन-संवर्धन-संरक्षणाची जबाबदारी त्या त्या पंचक्रोशीतील भाविकांवर सोपवता येईल. लावलेल्या १२ झाडांपैकी ७ झाडांची मालकी गावकर्यांकडे आणि ५ झाडांची मालकी वारकर्यांकडे ठेवता येईल. वारीच्या ७/१२ चा हा उपक्रम यशस्वी झाला तर (होणारच !) पालखीमार्ग वृक्षवल्लरींनी बहरुन जातील. इंद्रदेव धो धो वृष्टी करतील. विटेवरी उभा असलेला पांडुरंग चिखला-पावसात नाचत नाचत वारकर्यांना सामोरा येईल. भावभक्ती, कृतिभक्तीचा हा अनुपम्य सोहळा याची देही याची डोळा पाहाण्यासाठी जमलेले सुरासुर पुष्पवृष्टी करतील. अवघा आनंद कल्लोळ होईल. भूवरी खरेखुरे वैकुंठ अवतरेल. सोमनाथ देविदास देशमाने,अहमदनगर. भ्रमणध्वनी: ९७६३६२१८५६